२४ मार्च २०१०

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ५

दि: ५ जानेवारी - च्यायला.... माती खाल्ली परत... कोण कुठला समरवीरा न कसला थरंगा.... भज्जी, झहीर, युवी, माही.. काही काही कामाचे नाहीत. एक तर ह्या रावणांची तोंडं किती वेळा बघायची? किती वेळा खेळताय श्रीलंकेशी? ही काय दशावतारी आहे का? एक प्रयोग मुंबई, एक दिल्ली,३ ढाका... होपलेस साले. बंद करा यार हे क्रिकेट !

दि: ६ जानेवारी (पहाटे ६:३० वा.) - नको तो पेपर.... कुणी सांगितलंय परत समरवीराचं तोंड बघायला? मरूदे ना... हा...आता उठलोच आहोत तर एकदा ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा स्कोअर बघू.... च्यायला... हसी आणि सिडल अजून खेळतायत??? लीड किती झालं?? १२३??? दिडशे करायला सुद्धा नाकात दम आणतील पाकड्यांच्या हे ऑझीज.... बघू तर...

आणि अगदी महंमद यूसुफ गेल्यावर जेव्हा पाकिस्तानला "पोचवण्यासाठी" लोकांनी टापश्या बांधायला घेतल्या तेव्हाच टीव्ही समोरून हालायचं सुचलं. काय गेम आहे कळत नाही राव. कितीही शिव्या घाला....चिडचिड करा... ह्या खेळाबिगर जगणं मुश्किल आहे ! श्रीलंकेकडून हारलो म्हणून मुंबई - दिल्ली मॅच मध्ये लक्ष घालायचं. हे म्हणजे मी स्कॉच सोडली... सध्या रम घेतो पथ्याला असं म्हणण्यासारखं आहे. क्रिकेटचं ना बायको सारखं आहे. बायको तणतणते धुसफुसते म्हणून आपण लगेच घटस्फोट थोडेच घेतो? हा.. तुम्ही खरंच क्रीडाप्रेमी असाल तर जून-जुलै मधे टेनिस, प्रीमियर लीग.. कधीमधी युरो, वर्ल्डकप फुटबॉल अशी extramarital affairs झाली तरी शनिवारी दुपारी आफ्रिका-इंग्लंड टेस्ट बघताच ना?? तेव्हा ह्या जन्मात तरी दुसरा जोडीदार मिळणे नाही.

असो. ह्या मालिकेत आपण आपल्या आवडत्या खेळाच्या (मी पाहिलेल्या) काही कलाकारांच्या अदाकारीचा आणि त्यांच्या काही खूबींचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या तेंडल्यापासून, लारा, पिजन, वॉर्नी, फ्रेडी पर्यंत बरीच मांदियाळी झाली. आता एक खतरनाक जोडी ! बोलर्स हंट इन पेअर्स ह्या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण.... हॉल, ग्रिफिथ, गार्नर, रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल अश्या कर्दनकाळ गोलंदाजांचा वारसा सांगणारे.... संघासाठी जीव तोडून बोलिंग करणारे, वेगाबरोबरच स्विंग आणि टप्प्यावरच्या नियंत्रणाने भल्याभल्या फलंदाजांची परीक्षा बघणारे... खर्‍या अर्थाने क्रिकेटमधले "कॅरेक्टर्स" (वल्ली) म्हणता येतील असे दोघे महान गोलंदाज.... "कर्टली एलकॉन लिनवॉल अँब्रोज" आणि "कोर्टनी अँड्र्यू वॉल्श".

ह्यांची नावं जोडीनंच घ्यायला हवीत. ह्यांचा उल्लेख ह्या शेवटच्या लेखात करण्यामागे पण एक कारण आहे. मला असं वाटतं की "पारंपरिक" क्रिकेटचे हे शेवटचे शिलेदार. सध्या आपण ज्याला क्रिकेट म्हणतो त्याचा आणि ट्रंपर, ब्रॅडमन, जार्डीन, लिंडवॉल पासून सोबर्स, गावसकर, लिली, रिचर्डस, झहीर अब्बास वगैरे उत्तुंग लोकं जो खेळ खेळायचे त्या क्रिकेटचा संबंध खर्‍या अर्थाने संपला तो अँब्रोस - वॉल्श गेल्यावर. थोडक्यात त्यांच्यानंतर क्रिकेट "व्यावसायिक" झालं. जेंटलमन्स गेम "पजामा क्रिकेट" झाला तो ह्यांच्या नंतर. म्हणजे कोपर्‍यावरचं आपलं काणेमामांचं "हाटेल" पाडलं.... आणि त्याजागी "मल्टीक्विझीन रेस्तराँ अँड बार" सुरू झाला. "३ नंबरवर एक कोथिंबीर वडी २ पोहे...१ वर सायबांना एक पेश्शल" अश्या 'आर्डरी' बंद झाल्या. आता गिर्‍हाइकापेक्षा चकचकीत कपडे घातलेले वेटर्स नोटपॅडवर ऑर्डर्स लिहून घेताघेता "व्हाय डोंच्यू ट्राय ऑर शेफ्स स्पेशल ठुडे" म्हणतात तशी परिस्थिती झाली.

अँब्रोस आणि वॉल्शच्या शैली म्हणाल तर बर्‍याचश्या सारख्या आणि वेगळ्याही. दोघेही "ओपन चेस्ट" बोलिंग करणारे... अँब्रोस ६ फूट ७ इंच तर वॉल्श ६ फूट ६ ! अँब्रोसचा हुकमी एक्का आउटस्विंगर तर वॉल्शचा इनकटर. अँब्रोस टिपिकल फास्ट बोलर - आक्रमक मानसिकतेचा... तर वॉल्श बहुधा दर मॅचच्या आधी आसारामबापूंचा "सत्संग" अटेंड करत असावा. स्टीव वॉ शी मैदानात खुन्नस काढणारा... आक्षेप घेऊन रिस्ट बॅंड काढायला लावल्यानंतर खवळून उठून ऑझीजची वाताहात करणारा तो अँब्रोस. आणि वर्ल्डकप सेमीफायनलचा प्रवेश दाव्यावर असताना सलीम जाफरला "मंकडेड" न करणारा तो वॉल्श. दोघांत मिळून तब्बल ९०० पेक्षा जास्त कसोटी बळी मिळवणारी ही जोडगोळी.... निर्विवादपणे क्रिकेटमधली दोन महान व्यक्तिमत्त्वं.

क्रिकेटच्या माझ्या अगदी पहिल्या आठवणी म्हणजे १९८७ चा वर्ल्डकप. तो ही पुसटसा आठवतो. डिफ्रेटसनी गावसकरची काढलेली दांडी, अझरनी (बहुधा मॅक्डरमॉट्चा) तोंडासमोर घेतलेला 'कॉट अँड बोल्ड' आणि मार्टिन क्रो नी मिडऑनवरून मागे पळत जाऊन घेतलेला अफलातून झेल... हे मात्र पक्के आठवतात ! मुद्दा हा की ह्या मालिकेत आपण केवळ गेल्या वीसेक वर्षांतल्या निवडक महान खेळाडूंबद्दल बोलू शकलो. त्यातलेही अगणित हिरे राहून गेले (नाही हो... अमेय खुरासिया, नरेंद्र हिरवाणी बद्दल नाही बोलत मी Smile )!

अर्थातच क्रिकेट म्हणजे क्रिकेटर्स आणि क्रिकेटर्स म्हणजे क्रिकेट असं थोडेच आहे? गाणं तरी फक्त गायकाचं थोडंच असतं? संगीतकार, गीतकार, ध्वनीमुद्रकही आलेच की. मग आपण तरी क्रिकेटच्या ह्या 'पडद्यामागच्या कलाकारांना' कसे विसरू? खरं तर हा खेळ आमच्यापर्यंत पोचवला तो आधी रेडियो मग दूरदर्शन आणि नंतर सॅटेलाईट टेलिव्हिजनने. समालोचक दूरदर्शनवरचे तेव्हा सगळ्यात जास्त भावलेले समालोचक म्हणजे डॉ. नरोत्तम पुरी. .
अतिशय मृदुभाषी आणि "चार्मिंग" व्यक्तिमत्व. तेव्हा फारसं कळायचं नाही, पण नरोत्तम पुरींइतकं अजून कोणीच लक्षात राहिलं नाही. खूपदा टीव्हीवरची कॉमेंटरी इतकी रटाळ असायची की टीव्हीचा गळा आवळून आम्ही रेडियो लावून ऐकायचो. रेडियोवरची दोन नावं आठवतात ती म्हणजे रवी चतुर्वेदी आणि आकाश लाल ! "नमश्कार - कानपुरके ग्रीन पार्क इस्टेडियमसे मैं रवि चतुर्वेदी .... " वगैरे वगैरे सुरू झालं की खरोखरंच तिथला "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहायचा. "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर.. और बहोsssतही उम्मदा तरीकेसे ये खेल दिया है कव्हर्स क्षेत्रमेंसेचार्रर्रर्रर्रर्रन..." हा प्रकार केवळ लाजवाब ! ह्या रेडियो समालोचकांची शब्दसंपदा अगाध असायची. एकदा तर चतुर्वेदीसाहेब सिद्धूनी सिक्सर मारल्यावर "... ये छे रन और दर्शक आंदोलित" असं ओरडले होते. मज बालकाला नंतर बरीच वर्षं लोकं कसली कसली आंदोलनं वगैरे करतात म्हणजे एकत्र येऊन टाळ्या - शिट्ट्या मारत घोषणा देतात आणि एकंदर कल्ला करतात असंच वाटत होतं. दोन बॅट्समन "विकेट के बीच में विचार-विमर्श और वार्तालाप करते हुए" ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर दोघेजण हेल्मेट वगैरे घालून स्मिता तळवलकर आणि चारूशीला पटवर्धन स्टाइलमध्ये कागद वगैरे हातात घेऊन गंभीर डिस्कशन करतायत असं चित्र उभं राहिलं होतं. पण रेडियो कॉमेंटेटर्स मैदानावरच्या घडामोडी जिवंत करायचे हे नक्की. अर्थात आकाशवाणी अथवा दूरदर्शननी सुधारायचं नाहीच असं ठरवल्यामुळे बाकी स्टार वगैरे लोकं येऊ शकले.

क्रिकेट मैदानापेक्षा टीव्हीवरच जास्तं बघितलं गेलं. अहो मलातर पुण्याच्या (तेव्हाच्या) थंडीत, दुलई पांघरून, पहाटे गजर लावून उठून बघितलेल्या ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंडमधल्या आपल्या मॅचेस माझ्या पहिल्या चुंबनापेक्षा ठळकपणे आठवतात ! स्टंप माईकमुळे स्पष्ट ऐकू येणारे 'निक्स'.... स्टंप कॅम... कृत्रिम वाटावं असं हिरवंगार आउटफील्ड... आणि अर्थातच चिरतारुण्याचं (खरंतर चिरवार्धक्याचं) वरदान घेऊन आलेला रिची बेनॉ.

"ग्लोsssssssssरियश शनशाईन हीर अ‍ॅठ दि गॅबा ठुडे... अँड वीssss आर इन फॉर शम फँठॅश्टिक डेज ख्रिखेट" हे शब्द अजून माझ्या कानांत आहेत. बेनॉ म्हणजे क्रिकेटचे चंद्रकांत गोखले... पस्तिशीतच "ज्येष्ठ नागरिका"चं काम करणारे ! हजारो वर्षांपासून हा माणूस तस्साच दिसतो अन बोलतो. बोलण्यात अगदी योग्य चढाव उतार, मोजून मापून वापरलेले शब्द आणि चक्क "बोबडेपणा"...... बेणो हे एक वेगळंच रसायन होतं. म्हणतात ना 'झाले बहु, होतील बहु'... अगदी त्यातला प्रकार. बाकी काही म्हणा राव... कॉमेंटरी करावी तर ऑस्ट्रेलियन्सनी ! ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसचा माहौलच वेगळा असतो. ती थंडी, अर्धवट झोपेची ग्लानी, अफलातून मैदानं, ते रंगीत कपडे, ते सुंदर सुंदर प्रेक्षक... त्यातून त्यांचा उन्हाळा. आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे त्यांचे कॉमेंटेटर्स! त्यांचा अ‍ॅक्सेंट ऐकायला मी प्रियांका चोप्रा बरोबरची माझी "डेट" कॅन्सल करीन ! विशेषतः "एकारान्त" शब्दांचा "आय" असा जो उच्चार करतात ना... जियो ! ! ! "टुडे" चं "ठुडाय"..."ऑस्ट्रायलिया"... "गेम" चं "गायम"..."मॅक्ग्रा"चं "मक्ग्रार"... असं काय काय करतात ना... अहाहाहा ! माझं 'स्पोकन इंग्लिश' चाटे क्लासेसला न जाता देखील चांगलं आहे ते ह्यांच्यामुळेच.

बेनॉचं नमन झालं की मी वाट बघायचो (अजूनही बघतो) माझ्या सर्वांत आवडत्या कॉमेंटेटरची.... बिल लॉरी ! ! ! नाकातला गेंगाणा आवाज.. पुन्हा तो ऑस्ट्रेलियन अ‍ॅक्सेंट... टीव्ही प्रेक्षकांत excitement निर्माण करण्याची प्रचंड ताकद.... एक्सक्लेमेशन्स.... "गॉठिम"... "गॉssssssन".. नुसतं "ohhhhhhh" पण तितकंच उत्कंठा निर्माण करणारं. यूट्यूबवरचा हा व्हिडियो बघा !

टोनी ग्रेगची energy, बॉयकॉटची खेळाची समज, गावसकरचा critical acclaim, हर्षा भोगलेचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व अगदी रवी शास्त्रीचं रोखठोक बोलणं, मंदिरा बेदीचे ड्रेसेस ... सगळं सगळं मान्य... पण आमच्या बिल लॉरीची किंवा फॉर दॅट मॅटर मार्क टेलरची सर ह्यांना नाही. एखाद्या गायक / गायिकेचा गळा "प्लेबॅक"चा आहे म्हणतात ना... तसा लॉरी, टेलर, मायकल होल्डिंग, हेन्री ब्लोफील्ड, न्यूझीलंडचा इयन स्मिथ... ह्यांचा गळा "कॉमेंटरी"चा आहे ! होल्डिंगच्या bounce ह्या शब्दाचा उच्चार लिहीताना "ऊ"चा उकार ७ इंच वाढवावा लागेल. कॅरिबियन अ‍ॅक्सेंटमध्ये क्रिकेट कॉमेटरी ऐकायचा मझा काही औरच! तसाच बॉयकॉटचा टिपिकल यॉर्कशायर अ‍ॅक्सेंट. ह्या लोकांचा इंग्रजीचा लहेजा म्हणजे जिनच्या मार्टिनीला स्कॉच चा "डॅश" मारावा तसा क्रिकेटसारख्या आधीच नशील्या खेळाला पुरती बेहोषी देतो.

खेळाडू आणि समालोचकांइतकेच क्रिकेटचे आमचे देव म्हणजे पंच ! डिकी वर्ड विशेष आठवत नाही पण ही मूर्ती कुठला क्रिकेटप्रेमी विसरेल?

प्रेमळ आजोबांनी नातवाला दटावावं तसं फलंदाजाला बाद देणारा डेव्हिड शेफर्ड (नेल्सन वरची उडी तर अजरामर आहे), आधी डोकं हालवून मग हात वर करणारा (आणि आपल्या डोक्यात जाणारा) स्टीव्ह बकनर, "स्लो डेथ" रूडी कर्ट्झन, पहिल्या बाकावरचा शहाणा विद्यार्थी वाटणारा सायमन टॉफेल, "एंटरटेनिंग" बिली बॉडेन... हे सगळे खेळाडूंइतकेच लक्षात रहाणारे.

शेवटी काय हो मंडळी...... क्रिकेट आपल्या नसानसांत भिनलंय. खरंतर किती क्लिष्ट खेळ? पण प्रेमात पडल्यावर पोरीच्या १२वीच्या मार्कांकडे थोडेच बघतो आपण? क्रिकेट आवडण्यासाठी तुम्ही आयुष्यात कधीतरी पॅड्स बांधले असायची गरज नसते.... पण जर कधी तुम्ही जर ते पांढरे फ्लॅनेल्स घातले असतील... कधी तुम्हाला तो लालबुंद गोळा आडवताना हाताला झिणझिण्या आल्या असतील.... कधी तुमचा चेंडू सीम वर पडून आउटस्विंग झाला असेल... कधी वेगवान गोलंदाजाचा चेंडू तुमच्या नाकासमोरून जातानाचा सर्रर्रर्रर्र असा आवाज तुम्ही ऐकला असेल, ग्लव्हज् वर चेंडू बसून बोटं शेकली असतील तर हे भूत तुमच्या मानगुटीवरून उतरण केवळ अशक्य !

शेवटी क्रिकेट काय, फुटबॉल, टेनिस, बॅड्मिंटन, हॉकी, व्हॉलिबॉल काय...सगळेच खेळ आपल्याला आनंदच देतात ना? आपण सकाळी पेपर उघडताना मागल्या पानापासून सुरू करणारी लोकं. आयुष्याच्या भ्रष्टाचार, गरिबी, महागाई, नैराश्य, असहायता वगैरे असंख्य गोष्टींनी भरलेल्या दलदलीतून काहीतरी पॉझिटिव्ह, प्रेरणादायी, उत्साहवर्धक, आनंददायक वाचायला, ऐकायला, बघायला आपण आसुसलेले असतो. आणि वर्तमानपत्राचं शेवटचं पान हे माणसाच्या जिद्दीचं, विजिगीषु वृत्तीचं, बंधनं तोडण्याचं.... citius, altius, fortius - अजून वेगवान, अजून उंच आणि अजून शक्तिमान बनण्याच्या माणसाच्या प्रयत्नांच साक्षात द्योतक असतं. विजेत्यांच्या कर्तृत्त्वाचं आणि न जिंकलेल्यांच्या जिद्दीचं कागदाच्या एका पानावर अवतरलेलं प्रतीक असतं. म्हणूनच जेव्हा एक तेंडुलकर एका शोएब अख्तरला षटकार मारतो तेव्हा तो एक अब्ज लोकांना "आपण" कोणा शत्रूवर विजय मिळवल्याचा आनंद देत असतो. एक द्रविड जेव्हा ६ तास किल्ला लढवतो तेव्हा "आपण" एका संकटाचा यशस्वी सामना केल्याचं समाधान देतो, एक झहीर जेव्हा ३ आउटस्विंगर्स टाकून चौथ्या इनकटर वर बॅट्स्मनचे स्टंप्स फाकवतो तेव्हा "आपण" पूर्ण नियोजन करून आपलं लक्ष्य साध्य केलेलं असतं ! आपल्याला वैयक्तिक आयुष्यात ह्यातल्या सगळ्या गोष्टी नेहेमी करता येत नाहीत. आपल्याला गरज असते ती एका हीरो ची, जो शत्रूवर मात करेल, संकटांचा सामना करेल आणि आक्रमण करून यशस्वी ठरेल. पण असे "सुपरहीरोज" आपल्याला आपल्या आजुबाजुला बघायला मिळत नाहीत. आणि म्हणून आपण आपल्या खेळाडूंच्या प्रत्येक अचीव्हमेंटमध्ये "आपलं" यश बघायला लागतो. म्हणूनच क्रिकेट आपला धर्म होतो आणि क्रिकेटर्स आपली दैवतं !

पुढे लिहीत राहीनच - (आधीची वाक्यं नम्रपणे मागे घेतली आहेत Smile )!
(सर्व छायाचित्रे / चलतचित्र जालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: