२४ मार्च २०१०

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य मध्ये आपण आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हचा आस्वाद गेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा म्हटल्याप्रमाणे खेळांमध्ये असे अनेक महान कलाकार होऊन गेले आणि आहेत की ज्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. आमच्यासाठी खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट ! बालपणच जिथे चेंडूची एक बाजू घासून वकारसारख्या 'रिव्हर्स स्विंग'ची आराधना करण्यात गेलं (ते आयुष्यात जमलं नाही हा भाग अलाहिदा) आणि संजय मांजरेकरचं टेक्नीक ३ नंबरला कॉपी करण्यात (ह्यात हेल्मेट मध्ये त्याच्यासारखी पट्टी घालण्याचा पण समावेश आहे) गेलं, तिथे अन्य कुठल्या खेळाच्या प्रेमात पडायला खूप वेळ लागला !

आण्णांच्या यमनसारखा आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हबद्दल बोलल्यानंतर आता अन्य काही कलाकारांच्या खासियतींबद्दल बोलुया ! अर्थात हे कलाकार मी पाहिलेलेच आहेत आणि ह्याआधी देखील जे अनेक महान कलाकार होऊन गेले त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडेल ! तर देवाचं नाव घेऊन सुरुवात करू.. स$$$$$चिन.. स$$$$$$$चिन !

तर महाराजा आमच्या क्रिकेटच्या साम्राज्याचे अनेक रथी-महारथी आहेत ! पहिला आत्ताच्या काळातल्या अजिंक्य संघाचा झुंजार कर्णधार रिकी पाँटिंग - आणि त्याचा केवळ हेवा करावा असा हुक !

पाँटिंगचा पदन्यास एखाद्या बॅले नर्तकीसारखा (आणि हरभजनला खेळताना कोकणच्या बाल्यासारखा !). वेगवान गोलंदाजानी चेंडू शॉर्ट आपटला की गडी पुल / हुक मारायला सरसावलाच ! किंचित खाली वाकून हा माणूस झकासपैकी आपला उजवा पाय तोडा मागे अन अ‍ॅक्रॉस करून रोवतो. आणि गोलंदाजाच्याच वेगाचा पुरेपूर उपयोग करत चेंडू मिडविकेट / स्क्वेअरलेगला भिरकावून देतो ! बॅलन्स असा की आइस स्केटिंग करणार्‍या पोरींनी धडा घ्यावा !

नंतरचा आमचा "नजाफगढचा नवाब". ह्याच्या खेळाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे "आम्हा काय त्याचे". नाजुकपणा, संयम, शांतता वगैरे गोष्टी ह्याच्या वाटेला फारश्या जात नाहीत ! मागच्या बाकावर बसणार्‍या, एका इयत्तेत ३ वर्ष मुकाम केलेल्या विद्यार्थ्याच्या चेहेर्‍यावर मास्तर "छांदोग्योपनिषद" शिकवत असताना जे भाव असतील, साधार॑ण ते भाव चेहेर्‍यावर. चेंडू हा सीमेबाहेर पाठवण्यासाठीच टाकण्यात येतो अशी त्याची प्रगाढ श्रद्धा ! त्याच्या स्क्वेअरकटचं खूप कौतुक होतं. पण मला विचाराल तर त्याची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे "षटकार" ! मग तो कुठल्याही फटक्यानी आणि कुठेही मारलेला का असेना. "नो हाफ मेझर्स" !

वरच्या फोटोत आणि पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्यात मला खूप साम्य वाटतं ! आवेष तर बघा ! चेंडूची काय बिशाद सीमेच्या आत पडायची !

अहो नंतरचा आमचा कलाकार तर वेगवान गोलंदाजांचा शिरोमणी. हा धावत आला की फलंदाजांच्या उरात धडकी भरायची ! "खेलमें एकही गुंडा होता है और इस मॅच का गुंडा मैं हूं" हाच अ‍ॅटिट्यूड ! त्याच्या "इनकटर" फलंदाजाला भोसकायचा. इम्रान, अक्रमच्या तालमीतला हा खंदा वीर. वकारचा यॉर्कर हा त्याच्या देशाच्या "होम मेड" शस्त्रांइतकाच घातक ! रिव्हर्स होताना ह्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सुरुवात करून लेगस्टंपच्या बुंध्यावर आदळायचा. "सुलतान ऑफ स्विंग" ही उपाधी ह्याच्याइतकी कोणालाच लागू झाली नाही (माझ्या पाहाण्यात).

आता हेच बघा ना.. अश्या यॉर्करवर यष्ट्या उधळल्या गेल्यावर फलंदाजाला "धरणीमाते मला पोटात घे" वाटणार नाही तर काय?

सुलतान ऑफ स्विंग नंतर अर्थातच "शेख ऑफ ट्वीक". सर्वकाळचा वादातीत सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर - शेन वॉर्न. किती वेळा असं घडलं असेल की लेगस्पिन म्हणून फलंदाज त्याला कट करायला गेला आणि वेषांतर केलेल्या हारून अल रशीदइतक्या बेमालूमपणे तो चेंडू बाहेर जाण्याऐवजी सरळच घुसला ! जादूगाराने अचानक टोपीतून ससा काढावा तसा वॉर्नचा फ्लिपर अचानक आणि अनपेक्षित यायचा आणि अजून एक वि़केट घेऊन जायचा !

बघा बरं - लांडग्यांसारखे शिकार टिपायला वखवखलेले "क्लोझ इन" क्षेत्ररक्षक... फलंदाजाच्या दिशेनी पाठमोरा धावत अपील करणारा वॉर्न आणि "आयला गंडलो परत" असा भाव असलेला आणि अंपायरच्या केवळ इशार्‍याची वाट पहाणारा फलंदाज.. हे दृश्य आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे !

आणि ह्या लेखातला शेवटचा कलाकार म्हणजे आमचा "दादा". राहुल द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होता "When playing on the off-side first there is God and then there is Sourav Ganguly".... आणि त्यावर इयान चॅपल म्हणाला... "And God was a right-hander". आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा... काहीतरी जादू घडायची आणि ७-७ क्षेत्ररक्षकांमधून तो चेंडू सुसाट वेगाने सीमेबाहेर जायचा !

बघा - असा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात बघायला मिळणार नाही. "कुठे तंगडं हालवायचं... त्यापेक्षा उभ्याउभ्याच खेळू". काय बॅलन्स आणि 'हेड ओव्हर द बॉल' घेऊन बसलात राव ... जा रे कोणीतरी त्या बाउंड्रीपलिकडचा बॉल घेऊन या !

आमच्या मनाच्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस. अजून कितीतरी आहेत... त्यांच्याबद्दल कधीतरी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: