२४ मार्च २०१०

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स)

Reading poetry and watching cricket were the sum of my world, and the two are not so far apart as many aesthetes might believe.
Donald Bradman

आपलीही गोष्ट फारशी वेगळी नाहीच काय हो मंडळी. क्रिकेट हा मुळात आपल्यासाठी खेळ आहेच कुठे? ती तर गायन, वादन, काव्याइतकीच महत्प्रयासानी साध्य होणारी आणि तितकाच आनंद देणारी कला आहे. "अहाहा" "क्या बात है" अशी दाद मैफिलीत आणि क्रिकेटच्या मैदानावरच मिळू शकते ! एखाद्या कसलेल्या गवयाच्या तानेत आणि एका अव्वल स्पिनरच्या फिरकीत फरक असा तो काय? द्रविड जेव्हा ऑस्ट्रेलियात कसोटी शतक काढतो तेव्हा त्याची फलंदाजी ही एखाद्या रागाचे पैलू उलगडून दाखवणार्‍या मातब्बर गायकाइतकीच मनमोहक वाटते. फलंदाजीच्या तंत्राचं, त्यातल्या सौंदर्यस्थळांचं इतकं नेटकं उदाहरण क्वचितच सापडेल. आमच्या साहेबांच्या काही इनिंग्ज तर अश्या कलाकृती आहेत की त्याबद्दल त्यांना "ज्ञानपीठ" द्यायलाही हरकत नसावी.

असो. आज आपण परामर्श घेणार आहोत ते काही अश्या कलाकारांचा जे ह्या क्रिक-कलेच्या सगळ्याच प्रांतांत आपली छाप सोडून गेले. आजकाल "ऑलराऊंडर" हा शब्द लोकांनी पाणी घाल-घालून पार बेचव आणि पुचाट करून ठेवलाय. अहो जिथे करीना कपूर "सौंदर्यवती" ठरते तिथे पॉल कॉलिंगवूडला 'ऑलराऊंडर' म्हणणारच ! पण आपण आज ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत ते असे "बिट्स अँड पीसेस" खेळाडू नाहीत. तर बॅट आणि बॉल दोन्हीवर हुकुमत राखणारे खंदे वीर आहेत. साक्षात सोबर्स, बेनॉ, मंकड, हॅडली, बोथम, इम्रान आणि कपिलची परंपरा सांगणारे हे वीर कोण आहेत ते पाहूया.

पहिला आमचा वसीमभाई. आजतागायतचा निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट डावखुरा जलदगती गोलंदाज. जेमतेम ८-१० पावलांच्या रन-अपने सुद्धा आरामात १४० कि.मी चा वेग गाठणारा आमचा वसीमभाई. 'ओव्हर द विकेट' ने मिळणारा अँगल वापरून फलंदाजाला मोहात पाडणारा.... आणि दगाबाज प्रेयसीप्रमाणे त्याच्या धारदार 'इनकटर' ने त्याचा खून करणारा वसीमभाई..... सामन्यातल्या काट्याच्या क्षणी फलंदाजाला जेरबंद करून नामोहरम करू शकणारा वसीमभाई आणि वेळप्रसंगी बॅट परजत, समोरच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत मॅचचा नूर पालटणारा वसीमभाई.

broken image

वसीम अक्रमचं वैशिष्ट्य म्हणजे जलदगती गोलंदाजाकडे असणारी आक्रमकता तर त्याच्याकडे होतीच. पण तरीही वसीमभाई "जेंटलमन" होता. बॅट्समनला शिव्या घालण्याची... टोमणे मारून त्याची एकाग्रता भंग करण्याची.. नजरेनी 'खुन्नस' देऊन काही 'कॉमेंट्स' मारायची त्याला कधी गरजच पडली नाही. ही सर्व कामं करायला त्याची बोलिंग पुरेशी होती. वसीमभाईच्या ४१४ टेस्ट विकेट्सपैकी ११९ LBW आणि १०२ बोल्ड आहेत. परत साथीला त्याचं 'टेंपरामेंट' होतं. तो मोठ्या स्टेजचा खेळाडू होता. १९९२च्या वर्ल्डकप फायनल मध्ये आधी बॅटीने त्यानी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. आणि मग भेदक मारा करून इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. 'नेहरू कप'च्या फायनलमध्ये २ चेंडूंत ६ धावा हव्या असताना आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची १२३ धावांची खेळी क्रिकेटरसिकांच्या कायम स्मरणात राहील. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक काढणारा तो एकमेव "ऑलराऊंडर".. पण तरी त्याने आपल्या बॅटिंगला न्याय दिला नाही असंच वाटतं. वसीमभाई लक्षात राहातो ते त्याच्या टाचतोड्या यॉर्कर्ससाठी... वकारभाईबरोबरच्या त्याच्या भन्नाट जोडीसाठी.

"ऑलराऊंडर्स" आणि दक्षिण आफ्रिका हे एक समीकरणच झालं आहे. मुळातच कुठल्याही खेळ उत्तम खेळण्याची 'जाण' (एखाद्याला गाणं येतं तसं ह्यांना "खेळणं" येतं), भरपूर संधी उपलब्ध असल्यामुळे त्या त्या खेळातलं कौशल्य शिकण्याचा त्यांचा IQ खूप जास्त असतो. क्रोनए, क्लुसनर, कॅलिस, पोलॉक, मॅक्मिलन असे अनेक दर्जेदार ऑलराऊंडर्स आफ्रिकेनी दिले. ह्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे जाक्स कॅलिस. खरंतर ऑलराऊंडर म्हणजे बोलिंग करू शकणारा बॅट्समन अथवा बॅटिंग करू शकणारा बोलर. पण कॅलिसच्या बाबतीत हे दोन्हीही निकष चुकीचे ठरतात. बॅटिंग आणि बोलिंगमध्ये तितक्याच भरवशाचा आणि सातत्याने चमकदार कामगिरी करणारा कॅलिस हा बहुधा एकमेव खेळाडू आहे. वन डाऊन ही कसोटी क्रिकेटमधली सर्वांत 'ग्लॅमरस' पोझिशन. ब्रॅडमन, सोबर्स, रिचर्ड्स, झहीर अब्बास, द्रविड, पाँटिंगसारखे दिग्गज वन डाऊन खेळले. आणि ह्या दिग्गजांच्या पंक्तीत कॅलिस तसूभरही कमी पडत नाही. शिवाय गोलंदाजीतही पठ्ठ्या अव्वल आहेच. ह्या कॅलिसचे खांदे बनवताना देवानी तिघांचे खांदे एकाच 'चासी'वर बसवलेकी काय असं वाटतं. कॅलिसकाकांचं (जाक्सच्या वडिलांचं) शेत वगैरे असतं तर त्यांना नांगरणीसाठी बैल घ्यायची गरजच पडली नसती. त्यांच्या कुलदीपकानी एरवीच जू मानेवर घेऊन शेत झक्कपैकी नांगरून दिलं असतं.

कॅलिसचा बॅकफुट कव्हरड्राईव्ह खूप प्रेक्षणीय असतो. आपल्या उंचीचा पुरेपूर उपयोग करून तो बॉलवर येऊन कव्हर्समधून सुरेख ड्राईव्ह करतो. बॅटलिफ्ट आणि फॉलोथ्रू..... दोन्ही अतिसुंदर. बॉल फारसा 'शॉर्ट' नसला तरी चालेल...बस थोडीशी 'विड्थ' मिळण्याचा अवकाश....उजव्या पायावर बॅलन्स साधत बाबाजी आरामात चौकार हाणतात.

ह्याचाच सहकारी शॉन पोलॉक. पीटरबाबांकडून गोलंदाजी आणि ग्रॅएमकाकाकडून फलंदाजीची इस्टेट ह्यांना आंदण मिळालेली. एक वेळ अशी होती की शॉनभाऊंनी आपल्या अचूक गोलंदाजीने दुनियेतल्या तमाम बॅट्समनचं जगणं मुश्किल केलं होतं. लाइन लेंग्थमध्ये मॅक्ग्राचा भाऊ शोभावा ! ऑफस्टंपवर गुडलेंग्थच्या थोडा अलिकडे टप्पा पडायचा आणि बॉल बाहेर जायचा. बरेचदा ह्या मानसिक छळामुळे बॅट्समन समोरच्या बोलरला मारायला जाऊन बाद व्हायचा. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेट्स जरी ८००+ असल्या तरी खरंतर तो आकडा बराच जास्त आहे.

त्याची बोलिंग अ‍ॅक्शन थोडी विचित्र होती. त्याच्या उंची आणि ताकदीच्या मानाने तो तितका वेगवान देखील नव्हता. पण ती कसर तो अचूकतेने भरून काढायचा. "bowlers hunt in pairs" ह्या उक्तीला जागून त्याने आणि अ‍ॅलन डोनाल्डने एक काळ आफ्रिकेसाठी निश्चितच गाजवला. अगदी लिली-थाँप्सन, मार्शल-होल्डिंग, वसीम-वकार, वॉर्न-मॅक्ग्रा ह्यांच्याबरोबर नाव घ्यावं इतका.

ह्यानंतर परत एक आफ्रिकन. लौकिकार्थानी तो ऑलराऊंडर नव्हता.. कारण तो गोलंदाजी करायचा नाही. पण ह्याचं कर्तृत्त्व असं की त्यानं ऑलराऊंडरची व्याख्या बदलायला लावली. १९९२ ची गोष्ट.... पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या सामन्यात आफ्रिकेनी बॅकफुट पॉइंटला एक विचित्र प्राणी उभा केला होता... विचित्र अश्यासाठी की त्याचं रूप तर माणसासारखं होतं, पण हालचाली चित्त्याच्या, नजर घारीची.... त्याची हाडंही बहुतेक रबराची... आणि तो उडूही शकायचा. आमचा इंझी बिचारा... नेहेमीप्रमाणे पॉइंटला बॉल ढकलून बुलडोझरसारखा पळायला लागला... पण इम्राननी त्याला परत पाठवला....आता तो जेसीबी ब्रेक मारून, उलटा फिरून, परत अ‍ॅक्सिलरेटर मारून, पिकप घेऊन पोहोचेपर्यंत हा पॉइंटचा प्राणी बॉल घेऊन स्टंपपाशी धावत आला...एकच स्टंप दिसत होता...आणि जणूकाही समोर पाणी आहे अश्या रितीने स्वतःला स्टंप्सवर झोकून देऊन त्यानी इंझीला धावबाद केलं. आणि क्रिकेटप्रेमींना त्यांचा पहिला "फील्डिंग ऑलराऊंडर" मिळाला.... जोनाथन नील र्‍होड्स.

पहिल्या 'गुगली'नी जेवढा गहजब झाला असेल... पहिल्या 'रिव्हर्स हिट'नी जितकं आश्चर्य वाटलं असेल.. पहिल्या 'दिलस्कूप'नी जितक्या भुवया उंचावल्या असतील त्यापेक्षा जास्त नवल जाँटीच्या फील्डिंगनी वाटलं होतं. क्रिकेटनी ह्या आधी चांगले फील्डर्स बघितले नव्हते असं थोडंच आहे? कॉलिन ब्लँड, बॉब हॉलंड, सोलकर, सिम्प्सन, मार्क वॉ, अझर... नावं तरी किती घ्यायची. ही सुद्धा खरंतर अपवादच. एरवी अहो आम्हाला सवय ते आमच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूला एकटं वाटू नये म्हणून सीमारेषेपर्यंत सोबत करण्याची.... फार फार तर "घालीन लोटांगण" म्हणत डाइव्ह मारण्याच्या नावाखाली आडवं होणार्‍यांची. पण हे पाणी नक्कीच काहीतरी वेगळं होतं. चेंडूवरची इतकी स्थिर नजर, चपळता, विजेसारखे 'रिफ्लेक्सेस', सीमारेषेजवळ 'स्लाइड' होऊन चेंडू अडवून त्एकाच 'अ‍ॅक्शन' मध्ये बॉल परत यष्टीरक्षककाकडे टाकणं, बिनधास्त झोकून देण्याची तयारी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे डाईव्ह मारून निमिषार्धात पुन्हा उभं राहून अचूक फेकीनी स्टंप्सचा वेध घेण्याची क्षमता... छे ! सगळंच विचित्र ! ! ! बॅकफुट पॉइंटचं ग्लॅमर जाँट्यानी शतपटीनी वाढवलं. तो उपयुक्त फलंदाज होताच. पण फलंदाजीत शुन्यावर बाद झाला तरी क्षेत्ररक्षणात २५-३० धावा आरामात वाचवायचा. ह्या धावा जर त्याच्या सरासरीत मोजल्या तर जॉंट्या सच्या आणि पाँटिंगबरोबर जाऊन बसेल ! आणि ह्यानी घेतलेले 'नसलेले' झेल पकडले तर १०० विकेट्स पण झाल्याच की !

अहो हा असा आचरटपणा केल्यावर कुठल्या फलंदाजाची अक्कल गहाण पडलीये ह्याच्या जवळपाससुद्धा बॉल मारायची? हा आणि गिब्ज शेजारी शेजारी उभे राहिले की ऑफला बूच लागलंच !

ह्यानंतरचा आपला ऑलराऊंडर पण साधारण जाँट्याच्याच जातकुळीतला... म्हणजे फलंदाज-गोलंदाज नाही तर यष्टीरक्षक फलंदाज ! अर्थातच अ‍ॅडम गिलख्रिस्ट ! उत्कृष्ट यष्टीरक्षक... आणि अत्युत्कृष्ट फलंदाज ! गिलीला ऑस्ट्रेलियन संघात येण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. इयन हीली निवृत्त होईपर्यंत गिली कधी खेळलाच तर फक्त फलंदाज म्हणून. त्याच्या फलंदाजीची सुरुवात देखील फारशी आश्वासक नव्हती. पण नंतर नंतर गिली एक धडाकेबाज फलंदाज म्हणून बहरत गेला. कसोटींत जवळपास ८२ च्या स्ट्राईक रेटनी ४८ आणि वनडेमधे जवळपास ९७ च्या स्ट्राईक रेट आणि ३६ च्या सरासरीनी धावा अन्य कोणत्याच यष्टीरक्षकानी सोडाच.... कसलेल्या फलंदाजानी देखील काढलेल्या नाहीत. गिलीचा झंझावात क्रिकेटच्या सगळ्याच प्रकारांमध्ये चालू राहिला. वनडेतच नव्हे तर कसोटीमध्येदेखील गिलीने सामने एकहाती फिरवले आहेत.

गिलीची नजर आणि "hand-eye coordination" लाजवाब होतं ! किंचित जरी शॉर्ट बॉल पडला तरी तो लीलया मिडविकेटवरून षटकार खेचत असे. गिलीची मला सर्वांत आवडते ती पाकिस्तान विरुद्धची जस्टिन लॅंगर बरोबरची भागीदारी. होबार्ट कसोटीत वसीम, वकार, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक आणि अझर मेहमूद अश्या दिग्गज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर चौथ्या डावात जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३६९ धावा हव्या होत्या. ५ बाद १२६ अश्या अवस्थेत लँगर - गिली एकत्र आले. तब्बल २३८ धावांची भागीदारी करत त्यांनी ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. तेव्हा गिली प्रत्येक षटकातल्या एका चेंडूवर ठरवून रिस्क घेऊन चौकार मारत होता. (स्टंप माइक मधून लँगरचं बोलणं ऐकू यायचं "this ball gilly... this ball" आणि त्या बॉलला गिली चौकार मारत होता. गिली खेळलेल्या ९६ कसोटींपैकी तब्बल ७३ मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली आणि बहुतेक विजयांमध्ये गिलीचा मोठा वाटा होता.

क्रिकेटचं माहेरघर म्हणजे इंग्लंड. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? "ऑल टाईम ग्रेट" म्हणावा असा एकही खेळाडू ईंग्लंडच्या संघात नाही. अजूनही बोथमच्या नावानी उसासे टाकण्यातच ब्रिटिशांचा वेळ जातो. त्यातल्या त्यात बोथमच्या जवळपास जाईल असा नजीकच्या भूतकाळातला एकमेव इंग्लिश खेळाडू म्हणजे अँड्र्यू फ्लिंटॉफ ! उत्तम गोलंदाज आणि उत्तम फलंदाज. पण प्रत्येक इंग्लिश खेळाडूसारखाच आपल्या लौकिकाला न जागलेला. मग तो इथं काय करतोय? बहुतेक इंग्लिश खेळाडू जसे आपआपल्या "ऑल टाईम ११" मध्ये सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर म्हणून जॉन एंबुरीचं नाव घालतात तसंच क्रिकेटच्या जन्मदात्यांची अगदीच आबाळ होऊ नये म्हणून ह्याचं नाव घातलंय. अर्थात फ्लिंटॉफ ह्या यादीत बसतच नाही असं मुळीच नाही हा.

क्रिकेटचा एक एंटरटेनर म्हणून फ्लिंटॉफ नक्कीच स्मरणात राहील. बोथमसारखाच आक्रमक आणि flamboyant. आपल्या तगड्या शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन फ्लिंटॉफ वेग आणि bounce निर्माण करायचा आणि फलंदाजी करताना तितक्याच ताकदीनी चेंडू बाहेर भिरकावूनही द्यायचा. त्याच्या बॅटच्या स्वीट स्पॉटला चेंडू लागला की त्या चेंडूचं ठिकाण ठरलेलं असायचं - प्रेक्षकांत ! जाऊदे... एका इंग्लिश क्रिकेटपटूविषयी ह्याहून चांगलं काही सुचत नाही. इतकं लिहीलं हे ही पुष्कळ आहे !

तर आता पुढच्या (अजून एक आहेच का??) लेखात काही खरे हीरोज आणि मग ह्या मालिकेला पूर्णविराम !

(सर्व छायाचित्रे जालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: