२० मे २०१०

एका खेळियाने - लिएंडर पेस

१९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक्सच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीआधीची गोष्ट. आंद्रे अगासी सारखा दिग्गज आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलत होता. एका पत्रकारानी त्याला विचारलं ‘आता तुला अंतिम फेरीचे वेध लागले असतील’. त्यावर अगासी म्हणाला – "You must be crazy – माझ्या प्रतिस्पर्ध्याचं नाव आहे लिएंडर पेस. त्याच्यासारखे चपळ खेळाडू सर्किटमध्ये फार कमी आहेत. आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे. मीच काय, इतर कोणीही त्याला कमी लेखण्याची घोडचुक करणार नाही. मला माझा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. एका वाक्यात अगासीनी लिएंडर पेस काय चीज आहे ते सांगितलं होतं. “आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे”.... म्हणजे जणू अगासीला म्हणायचं होतं.....लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार.....प्रेक्षकातून शेकडो लोकं “इंडिया इंडिया” म्हणून ओरडणार....ह्याला स्फुरण चढणार..... लोकं भारताचा झेंडा नाचवणार....हा माणूस अजून चवताळून खेळणार..... मुठी आवळून आवळून त्याच्या पूर्ण शक्तीनिशी मला झुंज देणार..... मी हमखास म्हणून मारलेले “विनर्स” अशक्यरीत्या परतवणार.....जिवाच्या आकांतानी कोर्ट कव्हर करणार......चित्त्यासारखी झडप घालून त्याच्या "व्हॉलीज" खेळणार.... कारण..... कारण “लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार” !

आणि लिएंडरनी अगासीचे बोल खरे ठरवले. पहिल्या सेट मध्ये २ सेटपोईंटस् वाचवून पेसला ७-५, ६-३ असं हरवताना अगासीचं खरंच घामटं निघालं. लिएंडर ती लढत हरला खरा... पण त्यानी फर्नांडो मेलिगेनीला हरवून आपल्या देशाला तब्बल ४४ वर्षांनंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिलं. मनगटाला झालेली दुखापत विसरून केवळ देशासाठी पदक मिळवण्याच्या ईर्षेनं पेस झपाटल्यासारखा खेळला होता. १९५२ मध्ये हेलसिंकीमधल्या खाशाबा जाधवांच्या कांस्यपदकानंतर भारत पहिल्यांदा वैयक्तिक पदक मिळवत होता. आणि ते पदक अत्यंत अभिमानानी आपल्या छातीवर मिरवणारं नाव होतं लिएंडर वेस पेस !

“एका खेळियाने” ह्या लेखमालेसाठी लिहितांना पहिला खेळाडू “आपला” असावा असं वाटत होतं. क्रिकेटव्यतिरिक्त कुठल्याही खेळामध्ये खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा कोणी खेळाडू हवा. आणि पहिलं नाव मनात आलं अर्थातच लिएंडरचं. हॉकी हा क्रिकेट इतकाच मोजक्या देशांत खेळला जाणारा... बुद्धिबळ हा काही "स्पोर्ट" नाही... आणि इतर खेळांत भारताचं अस्तित्व अगदीच कमी. अश्या परिस्थितीत टेनिससारख्या लोकप्रिय खेळात १-२ नाही, तब्बल २० वर्ष तिरंगा फडकवणारा हा वीर. अटलांटाच्या कांस्यपदकानंतरची ली ची प्रतिक्रिया होती “I can now see my father eye to eye. We both own Olympic medals!”. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्सच्या कांस्यपदकविजेत्या भारतीय संघात मिडफील्डर म्हणून खेळलेले वेस पेस आणि भारताची एकेकाळची बास्केटबॉल कर्णधार जेनिफर यांचा हा मुलगा अ‍ॅथलीट झाला नसता तरच नवल होतं. १२ वर्षांचा असताना आपल्याकडे मुंज करून गुरुगृही धाडतात तसा पेस घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे ह्याच्या हातात रॅकेट देऊन ह्याला चेन्नईच्या "ब्रिटानिया अमृतराज टेनिस अ‍ॅकॅडमी"मध्ये धाडण्यात आलं. १७ वर्षांचा असताना त्याने प्रथम १९९० ची विंबल्डन ज्युनिअर चँपियनशिप जिंकली. ५९ मध्ये रामनाथन कृष्णन आणि ७९ मध्ये रमेश कृष्णन यांच्या नंतर हा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. अमेरिकन ज्युनिअर्स खिताब जिंकून ली ज्युनिअर्स् च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. १९९१ मध्ये ली "प्रो" झाला... डेव्हिस कप मध्ये रमेश कृष्णनबरोबर दुहेरी सामने खेळू लागला. ९२च्या बार्सिलोना ऑलिंपिक्समध्ये ही जोडी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचली. तेव्हा भारतीय टेनिसला कृष्णन - अमृतराज चा वारस मिळाला असंच वाटलं.

टेनिस हा खरंतर आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी. प्रचंड ताकद, अमर्याद दमसास लागणारा हा खेळ. हात-पाय मोडून घ्यायची.. छाती फुटायची कामं ! ती कामं करावी सव्वासहा, साडेसहा फुटी आडव्या अंगाच्या लोकांनी... आपण आपलं क्रिकेट खेळावं, बुद्धिबळाचे डाव मांडावेत, कॅरम चा वर्ल्डकप जिंकावा आणि गणित आणि फिजिक्स ऑलिंपियाडमध्ये पोत्यानी पदकं जिंकावीत. टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसं जाऊ नये. टेनिसच्या हिशेबात ली ५'१०" म्हणजे बुटकाच! एकेरीत त्यानी मोजून एक एटीपी स्पर्धा जिंकली आहे. केवळ चणच नव्हे तर एकंदरच टेनिसला लागणारी ताकद आणि खरंतर सध्याच्या काळातलं टेनिसचं 'पॉवर' स्वरूप बघून लिएंडरनं दुहेरीवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि तो त्याच्या कारकीर्दीचा "टर्निंग पाँईंट" ठरला.

टेनिसमध्ये सिंगल्सचे दिग्गज सहसा डबल्स खेळत नाहीत. अहो साधी गोष्ट आहे.... एका सिंगल्स मॅचमध्ये ३ तास मर मर धावल्यावर डबल्समध्ये जोडीदाराबरोबर नुसतं उभं राहायला तरी दम शिल्लक राहिला पाहिजे ना? हा तुम्ही विल्यम्स भगिनी असलात तर गोष्ट वेगळी ! निवांतपणे ग्रँडस्लॅमचं डबल्स टायटल जिंकतात आणि पुन्हा सिंगल्सच्या फायनल मध्ये बहिणी-बहिणी समोरासमोर उभ्या! आमचा फेडरर बिचारा नाजुक दिसतो दोघींपुढे ! असो... आपण टेनिसपटूंविषयी बोलत होतो. हा तर फक्त हेच कारण नाही.... एकेरी आणि दुहेरीला लागणारे "स्किलसेट्स" देखील बर्‍यापैकी वेगळे असतात. शेवटी individual आणि सांघिक खेळात फरक असायचाच ना? टेनिस दुहेरीत तुमची कोर्ट कव्हर करण्याची क्षमता, जोडीदाराबरोबरचा ताळमेळ, आपली तशीच जोडीदाराचीच नव्हे तर समोरच्या जोडीची सुद्धा बलस्थानं आणि कमकुवत जागा समजून योग्य "फॉर्मेशन" मध्ये खेळणं, समन्वय, जोडीदार चेंडू मारत असताना तुम्ही काय हालचाली करता, योग्य वेळी योग्य जागी असणं... "व्हॉली"चा (टप्पा न पडू देता बॉल मारण्याचा) अचूक अंदाज असणं ह्या सगळ्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या असतात. आणि पेसनी नेमकी हीच गोष्ट हेरली.

सेबॅस्टियन लॉरोच्या साथीत पेस ९३ च्या यू एस ओपनच्या उपांत्य फेरीत पोचला.... मग ९५ मध्ये केविन उल्येट बरोबर ऑस्ट्रेलियनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आणि मग ९६ साली भारतीय टेनिसच्या इतिहासातली सर्वांत शुभंकर गाठ मारली गेली! प्रत्येक स्पर्धेगणिक लिएंडर पेस - महेश भूपति जोडीचा खेळ बहरत होता. भूपतिचा "पॉवर गेम" आणि लिएंडरचा "रिफ्लेक्स गेम" एकमेकांना पूरक होते.

ली - हेश ही जोडी भारताचं नाव प्रत्येक मोठ्या स्पर्धेत रोशन करत होती. प्रत्येक सामन्यागणिक त्यांच्यातलं सामंजस्य वाढत होतं. ९७ मध्ये तर चारपैकी ३ ग्रँडस्लॅम्सच्या उपांत्य फेरीत ली - हेश पोचले. ९८ मध्ये तर त्यांनी कहर केला.... प्रत्येक ग्रँड्स्लॅमची अंतिम फेरी गाठली ! पैकी फ्रेंच आणि विंबल्डन जिंकले देखील ! इतिहासात पहिल्यांदाच मुख्य ग्रँड्स्लॅम्सच्या विजेत्यांमध्ये भारतीय नावं झळकत होती. अप्रतीम ताळमेळ आणि जबरदस्त "स्पिरिट"च्या जोरावर ली-हेश दुहेरीचं मैदान गाजवत होते. जगभरातल्या भारतीयांना फ्लशिंग मेडोज, रोलँ गॅरॉ आणि सेंटर कोर्टवर जायला एक कारण... का संधी - मिळाली ! वुडफर्ड - वुडब्रिज ह्या "वूडीज" बरोबर, बॉब-माइक ह्या ब्रायन बंधूंबरोबर त्यांच्या लढती रंगायला लागल्या. "इंडिया - इंडिया" चा जल्लोष.... भूपतिची जोरदार सर्व्हिस..... पेसचा वेगवान खेळ....... अप्रतीम को-ऑर्डिनेशन...... श्वास रोखून धरायला लावणार्‍या रॅलीज..... हल्ले-प्रतिहल्ले.... नवनवीन "फॉर्मेशन्स" ... मती गुंग करणारे डावपेच..... जीवाच्या आकांतानी प्रत्येक पॉइंटसाठी लढणं.... भूपतिच्या ताकदवान फटक्यानी पॉइंट "सेट-अप" करणं.... आलेल्या रिटर्नवर चित्त्यासारखी झेप घालून आपल्या "व्हॉली"नी पेसनं तो गुण मिळवणं.... "कंमॉssssssssssन" ची आरोळी आणि..............

....... आणि प्रत्येक भारतीय क्रीडा षौकीनाच्या मनात घर करून राहिलेली पेस-भूपतिची "चेस्ट-थंप" !!!!

क्रिकेटशिवाय कुठल्याच खेळात भारतीयांना इतका जल्लोष करण्याची संधी मिळाली नसेल जितकी टेनिस मध्ये! आणि ही संधी देणारा होता लिएंडर पेस. पेसनी दुहेरीत आत्तापर्यंत ज्या ४३ स्पर्धा जिंकल्या आहेत त्यातल्या २३ महेश भूपतिच्या जोडीने. त्याने ११ ग्रँड्स्लॅम्समध्ये पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी ६ वेळा विजेतेपद मिळवलं. मिश्र दुहेरीत मार्टिन नवरातिलोवा आणि कॅरा ब्लॅक च्या साथीत प्रत्येकी ४ आणि एकूण १० ग्रंडस्लॅम्समध्ये अंतिम फेरी गाठून ५ वेळा विजेतेपद मिळवलं ! मार्टिनासारख्या दिग्गज खेळाडूबरोबर खेळताना जी एक गोष्ट घडली ती खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पेसची महानता अधोरेखित करणारी आहे. २००३ मध्ये पेस - मार्टिना जोडीनी फ्रेंच आणि विंबल्डन स्पर्धा जिंकल्या. पण त्यानंतर ब्रेन-ट्यूमरच्या शत्रक्रियेसाठी पेसला अ‍ॅडमिट व्हावं लागलं... पुढे ते neurocysticercosis नावाचं इन्फेक्शन असल्याचं निष्पन्न झालं. पण त्यावर्षी लिएंडरला अमेरिकन ओपनला मुकावं लागलं. मार्टिनापुढे दुसर्‍या कोणा जोडीदाराबरोबर खेळण्याचा मार्ग खुला होताच. पण तिनी सांगितलं "वाट पाहिन पण पेसबरोबरच खेळीन" Smile ! कारण पेस इतरांसारखा नुसता दुहेरीतला जोडीदार नव्हता... तर जिवाला जीव देणारा भरवशाचा सहकारी होता. मार्टिनानी अमेरिकन ओपन खेळायला नकार दिला आणि ती पुढल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेसबरोबर खेळली... आणि ह्या अजब जोडीनी उपविजेतेपद मिळवलं !

पेस आणि डेव्हिस कप हे तर एक अशक्य समीकरण. वर म्हटल्याप्रमाणे "पेस देशासाठी खेळतोय" हे एकच कारण त्याला त्याचा खेळ उंचावायला पुरेसं होतं. ३१ मार्च १९९० रोजी झीशान अली बरोबर जपान विरुद्ध पेस पहिल्यांदा डेव्हिस कपचा सामना खेळला. तेव्हापासून आजतागायत अनेक अशक्यप्राय विजय पेसनं मिळवले आहेत. डेव्हिस कपचा सामना म्हटला की वेगळाच पेस लोकांना दिसतो..... प्रतिस्पर्ध्याचं एटीपी क्रमवारीतलं स्थान, त्याचं वय, मिळवलेली विजेतेपदं, त्याची आयुष्यभराची कमाई, उंची, लांबी, रुंदी वजन, मापं... सगळ्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात ! कारण त्याचा सामना हा फक्त एका टेनिसपटूशी नसतो, तो असतो आयुष्यभर तिरंग्याचा अभिमान आपल्या उरावर अभिमानानं मिरवलेल्या एका झपाटलेल्या देशभक्ताशी ! अतिशयोक्ती वाटत असेल तर गोरान इव्हानिसेविक, हेन्री लेकाँते, अर्नॉड बॉश्च, टिम हेन्मन, ग्रेग रुजेडस्की, अँडी रॉडिक ह्या सबंध कारकीर्द "टॉप २०" मध्ये काढलेल्या लोकांना विचारा ! केवळ आपल्या देशबांधवांच्या आणि सहकार्‍यांच्या पाठिंब्याच्या जोरावर, आपल्या मर्यादित टेनिस कौशल्यानं देखील लिएंडर भल्या-भल्यांना माती चारतो... भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणतो डेव्हिस कप मध्ये खेळलेल्या ७० सिंगल्स लढतींपैकी ४८, आणि ४६ डबल्स लढतींपैकी तब्बल ३७ मध्ये विजय असं अचाट रेकॉर्ड लिएंडरचं आहे याचं कारणच त्याची देशासाठी झोकून देऊन खेळण्याची वृत्ती. आज तो ३७ वर्षांचा आहे पण केवळ त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तो अजूनही भारताचा ध्वज त्याच्या समर्थ खांद्यांवर पेलतोय. मध्ये सहकार्‍यांबरोबर बेबनावाचे प्रकार घडले ते ह्या प्रेरणादायी कारकीर्दीला नजर लागू नये म्हणून Smile.

लिएंडर पेस नावाच्या ह्या एका खेळियाने भारताला टेनिसमध्ये नवी ओळख मिळवून दिली. विचारपूर्वक दुहेरी खेळून आपल्या शारीरिक मर्यादांमध्ये सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यशस्वी ठरू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. एटीपी टूर वर अनेक स्पर्धा जिंकून देखील ऑलिंपिक्स अथवा एशियन गेम्सच्या वेळी इतर भारतीय खेळाडूंना जोरजोरात टाळ्या वाजवून, घोषणा देऊन प्रोत्साहन देणारा पेस म्हणूनच भारतीय क्रीडाषौकिनाच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून जातो ! भारताचं प्रतिनिधित्त्व करताना "मी देशासाठी खेळतो आहे" ही एकच भावना त्याला त्याच्या मर्यादा ओलांडून out of his skins खेळायला प्रेरित करते. नुसते तिरंगा हातात असतानांचे त्याचे हे फोटो पहा !
broken image

भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याचा अभिमान, आपण देशाला एक विजय मिळवून दिला ह्याचा आनंद, आपल्यामुळे आपल्या देशवासीयांना आनंद झाला आहे ह्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतं. कुठलाही खेळ खेळण्यासाठी भले जगातलं सर्वोत्तम कौशल्य नसलं तरी बेहेत्तर पण आमच्या लिएंडरसारखी जिगर हवी ! असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून. मला तर वाटतं की भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल !

एका खेळियाने - पह्यलं नमन

१०
२०
३०
४०
५०
६०
७०
८०
९०
१००
रेडिक्का??????????

भिंतीकडे, झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून, दोन्ही हातांचे तळवे चेहर्‍यावर ठेऊन आपण सगळ्यांनीच ही गिनती केलेली आहे! "आंड्या इष्टॉप"... "गड्या गड्या माझं राज्य वाचव".... "रडीचा डाव खडी"(किंवा असंच काहीतरी) ही वाक्यं लहानपणी (किंवा मोठेपणीदेखील) उच्चारली नसतील असा कोणी सापडेल का? सगळ्यांनी नक्की खेळलेला हा बहुधा सर्वांत कॉमन खेळ - लपाछपि म्हणा, लपंडाव म्हणा किंवा अजून काही म्हणा. खेळ ह्या प्रकाराशी बहुतेकांची ओळख लपंडाव, रुमाल-पाणी, लंडन-लंडन, आप्पारप्पी, लगोरी असल्याच प्रकारांनी होते. आणि मग "अर्धं लिंबू अस्से" - "भिंतीवर डायरेक्ट बॉल लागला तर आउट" - "त्या उंबर्‍याच्या पलिकडे गेला की टू डी" वगैरे नियम घालून खेळणं सुरू होतं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं खेळांतली क्लिष्टता वाढत जाते... नियम वाढतात, विविध साधनं उपयोगात आणली जातात. आपल्या लंगडी, खो-खो, कबड्डी सारख्या "फ्री-हँड" खेळांपासून, क्रिकेटसारख्या क्लिष्ट, बरीच साधनं लागणार्‍या खेळापर्यंत आपण सगळेच खूप खेळ खेळतो. खेळ खेळायची पद्धत, त्याचे नियम वेगवेगळे असतात पण एक नियम अगदी लपंडावापासून ते स्नूकरपर्यंत invariably लागू असतो तो म्हणजे - "चिडीची बात नस्से"! जे काही खेळताय ते तुम्ही चांगल्या मनाने, नैतिकता जपून, आपल्या सहकार्‍यांबद्दलच नव्हे तर स्पर्धकांबद्दलही आदर बाळगून, प्रामाणिकपणे खेळायचं ! विजयाइतकाच पराभवदेखील खुलेपणाने स्वीकारायचा. आणि पुढच्या वेळी विजय मिळवण्यासाठी पुन्हा कष्ट करायचे, प्रयत्न करायचे ! आणि ह्या सगळ्या गुणांच्या समुच्चयाला आम्ही म्हणतो "खिलाडू वृत्ती" "sportsman spirit". अहो खेळ ह्या गोष्टीची व्याख्याच मुळी केली जाते ती - An organised, competitive and skilful physical activity requiring commitment and fair play अशी. बघा... शिस्तही आली, स्पर्धाही आली, कौशल्यही आलं, झोकून देणंही आलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आला. मग मला सांगा, "खेळाडू" ह्या संज्ञेस पात्र ठरलेला कोणीही एक आदर्श व्यक्ती, नागरिक असला तर आश्चर्य ते काय?

Sport builds character म्हणतात ते उगाच नाही. लहानपणापासून कोणी कुठलाही खेळ (विशेषतः सांघिक) नियमित खेळत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत जातात. कारण खेळ शिकणं म्हणजे फक्त त्या खेळात सरस ठरण्यासाठी लागणारी कौशल्य, तंत्र आत्मसात करणं नाही तर अजूनही खूप काही असतं. म्हणूनच खेळ हा केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षमच नाही तर एक "सुसंस्कृत" नागरिक घडवतो. विश्वनाथन आनंद टोपालोवला हरवलं म्हणून त्याच्या बुद्धीचे वाभाडे काढत नाही..... मायकेल हसी त्याच्या ओपनर्सना "फेकल्यात ना विकेट.. आता बसा बोंबलत.. मी नाही खेळणार" असं म्हणत नाही... "तिज्यायला हा फेडरर लई उडून र्‍हायलाय...तंगडं मोडायला पायजे *%$चं" असा विचार नदाल करत नाही.... किंवा "तुमच्या डबक्याचं पाणी फारच गार आहे ब्वॉ... नीट पोहता येत नाही इथे" असं फेल्प्स म्हणाल्याचंही ऐकिवात नाही. खरा खेळाडू citius - altius - fortius, faster - higher - stronger ह्या एकाच ध्यासानी आपल्या खेळाडू धर्माचं पालन करत असतो.

Winning isn't everything; it's the only thing असं मानणार्‍या जीवतोड स्पर्धेच्या जगात सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचं कौतुक केलं जातं, मुष्टियुद्धाच्या लढतीनंतरही एकमेकांना अलिंगन दिलं जातं आणि धक्कबुक्कीत खाली पडलेल्या प्रतिस्पर्ध्याला उठून उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो. एकंदरच खेळ आणि खेळाडू ही आपल्या आयुष्यातली एक खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक, आनंद, उत्साह, उमेद देणारी गोष्ट आहे. खेळातलं कौशल्य आपल्या आयुष्यातल्या इतरही गोष्टींत दिसून येतं, खेळानी दिलेला आत्मविश्वास आपल्या प्रत्येक कामात दिसतो. कधी विचार केलात? ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाच्या वेळी वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंच्या देहबोलीत किती फरक असतो! काही अगदी छोटे, पदक मिळायची जरादेखील आशा नसलेले 'सिएरा लिओन', होंडुरास वगैरे देशांचे खेळाडू "आपण इथपर्यंत पोहोचलोय" हा आनंद लपवू शकत नाहीत तर अमेरिका, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे खेळाडू "आम्ही आलो आहोत ते जिंकण्यासाठीच" अश्या आत्मविश्वासात चालत असतात ! पण खेळ हीच एक अशी चीज आहे जी ह्या सगळ्यांना एका ध्येयासाठी, एका भावनेसाठी एकत्र आणते citius - altius - fortius ! आज युनायटेड नेशन्सचे १९२ सदस्य देश आहेत... इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे २०५....तर "फिफा"चे २०८ ! भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय.... कुठलीच बंधनं नसणार्‍या खेळांचं महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे.

वेगवेगळ्या खेळांनी आपल्याला मानवाच्या शारिरिक क्षमतेला आणि कौशल्यालाच नाही तर खिलाडू वृत्तीला आणि सचोटीला नवीन परिमाण देणारे खेळाडू दिले. अगदी ४ मिनिटांच्या आत एक मैल धावण्याचा पराक्रम पहिल्यांदा करणार्‍या रॉजर बॅनिस्टरपासून ते चेल्सीसाठी जिवाचं रान करणार्‍या दिदिएर ड्रॉग्बापर्यंत.... कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन टूर दि फ्रान्स जिंकणार्‍या लान्स आर्मस्ट्राँगपासून ते "ड्रॅगफ्लिकचा बादशहा" सोहेल अब्बासपर्यंत.... मार्गरेट कोर्टपासून ते आमची बॅडमिंटनची राजकन्या साईना नेहवालपर्यंत ! ह्या सर्वच खेळाडूंनी आपल्या खेळानं आमच्यावर अशी काही मोहिनी घातली की "दुनिया देखती रह गयी". आपल्या कौशल्याने, आपल्या खेळाने आलम दुनियेला मंत्रमुग्ध करणारे हे खेळियेच. अश्याच काही महान खेळाडू आणि त्यांच्या खेळाचा, कारकीर्दीचा धावता आढावा घेऊया "एका खेळियाने" ह्या मालिकेत ! लवकरच.......

जे पी

एका खेळियाने - जेसी जैसा कोई नहीं !

कुठल्याही खेळामध्ये "प्रतिनिधित्त्व करणे" ह्या गोष्टीला खूप खूप महत्त्व असतं. तुम्ही नुसतं "स्वान्त सुखाय" न खेळता स्पर्धात्मक पातळीवर तो खेळ खेळला आहात, तुमच्या स्वतःच्या कौशल्याला, ताकदीला तोडीच्या प्रतिस्पर्ध्याशी आजमावून पाहिलं आहे हेच खूप मोठं यश मानता येईल. अगदी शाळा - कॉलेज - विद्यापीठाकडून, जिल्हा, विभाग किंवा राज्याचं प्रतिनिधित्त्व करायला मिळणं ही खरोखरंच अभिमानास्पद गोष्ट असते. काही मोजक्याच भाग्यवंतांना त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याच सौभाग्य लाभतं. क्रिकेटमध्ये "एशिया वि. आफ्रिका" वगैरे आंतर खंडीय सामने देखील झाले. पण जर कोण्या एका खेळाडूनं कुठल्या स्पर्धेत उभ्या मानवतेचं प्रतिनिधित्त्व केलं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? जर त्याला असं सांगण्यात आलं की "बाबा रे, ह्या एका स्पर्धेत मानवाचं, मानवीय संस्कृतीचं प्रतिनिधित्त्व करायची जबाबदारी तुझी आहे - you are competing for the mankind. तुझ्यावर जबाबदारी आहे मानवतेच्या शत्रुंना ओरडून सांगण्याची की सगळे मानव एक आहेत... जाती, देश, वंश, वर्ण, लिंग ह्यावरून तुम्ही करत असलेला भेदभाव हे निव्वळ थोतांड आहे. कुठलाही वर्ण, वंश, जात ही दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ - कनिष्ठ असू शकत नाही. तुला अशी कामगिरी करून दाखवायची आहे की सर्वांचा मानवता ह्या एकाच धर्मावरचा विश्वास अजून दृढ झाला पाहिजे!" तर?? काय म्हणाल अश्या माणसाला???? प्रेषित?????

उगाच विशेषणं शोधत नको बसायला. आपण त्याला म्हणू - जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स !

जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स - अलाबामातल्या हेन्री आणि एमा ओवेन्स ह्या शेतमजूर दांपत्याचा मुलगा आणि एका गुलामाचा नातू. जन्म १२ सप्टेंबर १९१३. हेन्री आणि एमाच्या ११ मुलांपैकी जेम्स ७ वा. अशक्त, सतत खोकणारं, किरटं पोर. ब्राँकायटिस आणि न्युमोनिया तर पाचवीला पुजलेले. घरी अठराविश्वे दारिद्र्य. दोन वेळेचं खायला मिळायची जिथे भ्रांत तिथे अंगावर कापड आणि डोक्यावर छप्पर कुठून येणार? वयाच्या सातव्या वर्षी जेम्स कपाशीच्या शेतात गोणी उचलायच्या कामावर लागला. दिवसात जवळपास १०० पौंड कपाशीची पाठीवरून ने-आण करावी लागे. आजचं मरण उद्यावर ढकलायला ओवेन्स कुटंबीय ओकविल होऊन उत्तरेला ओहायो राज्यात क्लीव्हलंडला आले तेव्हा जेम्स ९ वर्षांचा होता. क्लीव्हलंडमधल्या शिक्षिकेनी नाव विचारलं... जेम्स त्याच्या सदर्नर अ‍ॅक्सेंटमध्ये बरळला "जे.सी. ओवेन्स (जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स)". त्या शिक्षिकेला काही ते नीट ऐकू आलं नाही. तिनी लिहून घेतलं जेसी (Jesse) ओवेन्स. आणि पुढे जन्मभर हेच नाव जेम्सला चिकटलं. जेम्स ओवेन्सचा झाला जेसी ओवेन्स !

घाणेरीच्या रोपट्यासारखा कोणीही पाणी न घालता जेसी वाढत होता. नशीब एकच की आता मजुरीबरोबर शाळाही चालू होती. जेसी विशेष हुशार विद्यार्थी नव्हता पण सर्वांत वेगवान नक्कीच होता. फेअरमाउंट ज्युनियर हायस्कूल मध्ये चार्ल्स रायली नावाच्या क्रीडाप्रशिक्षकानी जेसीमधले गुण हेरले आणि त्याला शाळेच्या track and field संघात जागा मिळाली. १९३३ मध्ये ईस्ट टेक्निकल हायस्कूलकडून खेळताना त्याने १०० आणि २२० यार्ड धावण्यात आणि लांब उडीत (तेव्हा त्याला बोर्ड जंप म्हणत) शालेय राष्ट्रीय विक्रम नोंदवले. आणि इथून जेसीची कारकीर्द बहरायला लागली. ओहायोच्या (buckeye state) मधून आलेला जेसी buckeye bullet म्हणून ओळखला जाऊ लागला. शाळेची फी भरायला आणि पोटाची सोय करायला लायब्ररीत काम करणे, गॅसस्टेशनवर काम करणे, कपडे धुवून देणे, कोणाची फुटकळ कामे करणे चालू होतंच. पण खरी धमाल तर पुढे होती. १९३५ मध्ये उत्तर अमेरिकेतल्या "बिग टेन" राज्यांच्या मिशिगनमधल्या स्पर्धांच्या २ आठवडे आधी मित्रांशी मस्ती करताना जेसीची पाठ दुखावली होती. २५ मे १९३५ च्या त्या स्पर्धेच्या दुपारी तर जेसीला वाकवत देखील नव्हतं. पण कसं कोणास ठाऊक, वॉर्म अप करताना त्याला बरं वाटू लागलं. आणि दुपारी ३:१५ ते ४:०० ह्या वेळात जे काही घडलं ते एका शब्दात सांगायचं म्हणजे "इतिहास."

दु. ३:१५ वा - जेसीनी १०० यार्ड (९१ मीटर्स्)ची रेस ९.४ सेकंद वेळ नोंदवून जिंकली - विश्वविक्रमाशी बरोबरी!

दु. ३:२२ वा - त्याच्या एकमेव लांब उडीत त्यानी २६ फूट सव्वाआठ इंच लांब उडी मारली - नवीन विश्वविक्रम जो पुढे २५ वर्ष अबाधित होता!

दु. ३:३४ वा - २२० यार्ड शर्यतीत जेसीची वेळ होती २०.३ सेकंद - नवीन विश्वविक्रम !

दु. ४:०० वा - २२० यार्ड "लो हर्डल्स" शर्यत विजेता - वेळ २२.३ सेकंद - नवीन विश्वविक्रम ! २३ सेकंदांच्या आत ती शर्यत पूर्ण करणारा पहिला खेळाडू

अवघ्या ४५ मिनिटांत जेसीनी ३ नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केले होते तर एका विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती ! अ‍ॅथलेटिक्सच्याच नव्हे तर इतर कोणत्याही खेळाच्या इतिहासात कोण्या एका खेळियाने असा पराक्रम केलेला नव्हता आणि आजतागायत कोणी असा पराक्रम करू शकलेलं नाही. शब्दशः न भूतो न भविष्यति !

पण ह्याही पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा पराक्रम अजून जेसीची वाट बघत होता. १९३६ चं बर्लिन ऑलिंपिक्स हे म्हणजे नाझी विरुद्ध इतर असं अघोषित युद्धच होतं. आर्यन वंशाच्या श्रेष्ठत्त्वाच्या, आणि फॅसिस्ट विचारांनी हिटलर पिसाटला होता. नाझी जर्मनीचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जमीन-आस्मान एक करण्याची त्याची तयारी होती. "काळ्या बांड्गुळांना" संघात स्थान दिल्याबद्दल जर्मनीत अमेरिकेची टर उडवली जात होती. एका जर्मन अधिकार्‍यानं ओवेन्स आणि इतर निग्रो अ‍ॅथलिट्स सारख्या non-humans ना खेळायची परवानगी दिल्याबद्दल तक्रार केली होती. जागोजागी काळ्या स्वस्तिकाचं चिन्ह असलेले लालभडक झेंडे फडकत होते. खाकी गणवेषातले Storm Troopers (जर्मन सैनिक) ठायी ठायी नाझी सॅल्युट करताना दिसत होते. नाझी राष्ट्रगीत "Deutschland Uber Alles" चे सूर उरात धडकी भरवत होते. नाझी सुप्रीमसी सिद्ध करायला हिटलर पेटून उठला होता. ऑलिंपिक्स हे "खेळ" न राहता धर्मांध शक्ती आणि मानवता ह्यांच्यातलं द्वंद्व बनले होते. पण जर्मन सरकार जरी नाझीझमचा डंका पिटत असलं तरी ३ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिनच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये जमलेली १ लाख दहा हजार प्रेक्षक आपला देश, धर्म, वंश, वर्ण.. सगळं विसरून त्यांच्या लाडक्या खेळाडूला पाठिंबा देत होते "येस्सी... येस्सी....येस्सी....येस्सी!"

३ ऑगस्टला जेसीनी १०० मीटर्सची शर्यत १०.३ सेकंदांत जिंकली. दुसरा आला तो त्याचा (कृष्णवर्णीय) देशबांधव राल्फ मेटाकाल्फ. नाझी वर्चस्वाच्या हिटलरच्या दंभावर पहिला आघात झाला !

४ ऑगस्टला लांब उडीच्या स्पर्धेत जेसीचे पहिले २ प्रयत्न "फाऊल" ठरले होते. अजून एक फाऊल आणि जेसी स्पर्धेबाहेर जाणार होता. जेसी स्वतः त्या वेळेबद्दल सांगतो "I fought, I fought harder . . . but one cell at a time, panic crept into my body, taking me over." विमनस्क स्थितीत जेसी बसलेला असताना त्याला खांद्यावर कोणाचातरी हात जाणवला. त्यानी वर पाहिलं. एक निळ्या डोळ्यांचा, सोनेरी केसांचा तरूण त्याच्याकडे सस्मित बघत होता. त्या तरुणाने हात पुढे केला आणि म्हणाला "मी जर्मनीचा लुझ लाँग. टेन्शन घेऊ नकोस. फायनल्स साठी ७.१५ मीटर्स गाठणं तुला मुश्किल नाही. तू बोर्डच्या थोडं मागून उडी मार... निवांत क्वालिफाय होशील. काळजी नको करूस." कल्पना करा... लाँग जेसीचा सर्वात कडवा प्रतिस्पर्धी होता.... नाझी जर्मनीचा लांब उडीतल्या सुवर्णपदकाचा सर्वांत प्रमुख दावेदार होता... त्यानं "काळ्या" ओवेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकावं अशी खुद्द फ्युररची इच्छा होती. पण लाँग शेवटी हाडाचा खेळाडू होता ! आपल्या सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्ध्याला धीराचे चार शब्द ऐकवायला, त्याला मदत करायला, त्याला सल्ला द्यायला .. आणि ते ही साक्षात फ्युरर समोर बसलेला असताना... हजारो लोकांच्या साक्षीनं.. पुढे यायला तो कचरला नाही. हिटलरचा वांशिक वर्चस्वाचे बुरूज एका खेळाडूनं उध्वस्त केले. धर्म, जात, पंथ, वंश, वर्ण, देश.. सगळ्या सगळ्या सीमा मिटून गेल्या. लाँग आणि ओवेन्स आणि इतर हजारो - लाखोंचा धर्म citius altius fortius, वांशिक श्रेष्ठत्त्वाच्या फुटकळ कल्पनांच्या चिधड्या उडवत होता.

लाँगच्या सल्ल्याप्रमाणे ओवेन्सनी पुढची उडी चांगली ४ इंच मागून घेतली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीतल्या पाचव्या प्रयत्नानंतर जेसी आणि लाँग संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. पण नंतरच्या दोन प्रयत्नांत आपली कामगिरी उंचावत जेसीनी सुवर्णपदक पटकावलं तेव्हा त्याचं अभिनंदन करायला प्रथम धावला तो रौप्यपदकविजेता लाँग ! लाँगबद्दल जेसी म्हणतो "You can melt down all the medals and cups I have and they wouldn't be a plating on the 24-karat friendship I felt for Luz Long at that moment. Hitler must have gone crazy watching us embrace". लाँग दुसर्‍या महायुद्धात मरण पावला पण ओवेन्स त्याच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात राहिला.

५ ऑगस्टला - दुसर्‍या दिवशी जेसीनी २०० मीटर्स शर्यत २०.७ सेकंदांचा नवीन ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित करून जिंकली. नंतर मार्टी ग्लिकमन आणि सॅम स्टोलर ह्या ज्यू खेळाडूंना अचानक "काढून टाकल्यामुळे" ओवेन आणि मेटकाल्फला ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळाली आणि जेसीनी आपलं चौथं सुवर्णपदक जिंकलं. जेसी परत आला आणि त्याच्या स्वागत एका बोर्डनी झालं ज्यावर लिहीलं होत Owens 4 - Hitler 0.

पुढे दुसर्‍या महायुद्धामुळे ३६ ची स्पर्धा जेसीची पहिली आणि शेवटची ऑलिंपिक स्पर्धा ठरली. इतकंच नाही तर त्याची कारकीर्द महायुद्धामुळे संपुष्टात आली. दुर्विलास पहा, जेसी परत आला तेव्हा अमेरिकेत त्याचं कौतुक झालं, लोकं त्याच्याशी हात मिळवायचे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायचे, त्याला मिठी मारायचे... पण कोणी त्याला नोकरी देऊ केली नाही. "When I came back to my native country, after all the stories about Hitler, I couldn't ride in the front of the bus, I had to go to the back door. I couldn't live where I wanted. I wasn't invited to shake hands with Hitler, but I wasn't invited to the White House to shake hands with the President, either." ४ ऑलिंपिक सुवर्णपदकांचा मानकरी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घोड्यांशी, कुत्र्यांशी शर्यती लावायचा. नंतर जेसीनी दिवाळखोरीचा अर्ज केला. तो मंजूर झाला आणि जेसी अमेरिकन सरकार साठी सदिच्छा दूत (goodwill ambassador) झाला. आपल्या प्रेरक भाषणांतून कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटीचं महत्त्व सांगत राहिला ते १९८० साली त्याचं निधन होईपर्यन्त.

लहानपणी वीणा गवाणकरांचं "एक होता कार्व्हर" शेकडो वेळा अधाशासारखं वाचलं होतं. जेसी आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर मधलं साम्य म्हणजे दोघेही कधीच कोणाविरुद्ध "लढले" नाहीत. त्यांच्या वागण्यात, इतका अन्याय सहन करूनही, यत्किंचितही कटुता नव्हती. कोणाही बद्दल आकस, चीड नव्हती. म्हणूनच जेसी सच्चा "खेळाडू" होता. जेसी गेला तेव्हा राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर त्याच्याबद्दल म्हणाले "Perhaps no athlete better symbolized the human struggle against tyranny, poverty and racial bigotry". पण जेसी स्वतः म्हणायचा "मी बर्लिनला कोणाला हरवायला गेलो नव्हतो. माझी कोणाशीही स्पर्धा नव्हती. ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला. मला जर कोणाचा पराभव करायचा असेलच तर तो स्वतःचा."

असा होता जेसी. सगळी बंधनं लंघून केवळ एक अ‍ॅथलीट म्हणून, एक खेळाडू म्हणून काळाच्या दगडावर आपलं नाव कायमचं कोरून जाणारा. म्हणूनच आजही 'सर्वोत्कृष्ट ऑलिंपियन कोण?' असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सर्वांचं एकच उत्तर असतं "जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स"

११ मे २०१०

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे ! लेका २०० मारल्यास ..... तुझ्या टीकाकारांना आता कायमचं गप्प केलंस (तुला त्यांचं काही वाटत नाही पण आम्हाला वाटतं ना?)! We have a lot of reasons to celebrate.

जबर्‍या रे ! तसं न्यूझीलंडमधल्या तुझ्या १६३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हैदराबादमधल्या १७५ बघितल्यावर हे कधीतरी होणारच ह्याची खात्रीच होती. पण लेका २०० वॉज म्हणजे जस्ट टू (हंड्रेड) मच! तू तिकडे पॉईंटला बॉल ढकललास आणि आम्ही इथे हापिसात बेहोष झालो ! आमची "मॅनेजेरियल पोझिशन".... तिशीचं वय..... झाटभर 'कर्तृत्त्व'....."प्ले ग्रुप" मध्ये जाणारा पोरगा... किंचित सुटलेलं पोट.....वार्षिक सात आकडी पगार.... सगळ्या सगळ्या गोष्टी विसरलो.... दोन हातांची चार बोटं तोंडात घातली आणि जोरदार शिट्टीनी आख्खं फ्लोर हालवून टाकलं बघ! सsssssssssचिन ....सssssssssचिन म्हणून नाचताना माझा धक्का लागून आमच्या पन्नाशीच्या व्हीपीचा चष्मा उडाला (अर्थात तो तरी कुठे शुद्धीत होता म्हणा) ! काय केलंस रे मित्रा ! अजून एक एव्हरेस्ट सर केलंस. तूच एकटा आहेस जो आम्हाला असं नाचवतोस.. खुषीनी बेहोष करतोस ! एरवी काय ममता बॅनर्जीनी ७५ पैशांनी तिकीट स्वस्त केलं म्हणून नाचायचं.. की कतरीना कैफनी "भूमिकेची गरज असेल तरच अंगप्रदर्शन / चुंबनदृश्य करीन" असं आश्वासन दिलं म्हणून नाचायचं? असो !

तू डब्बल टाकलीस आणि तेव्हाच म्हटलं 'अब्बी तेंडल्यापे लिखना मंगताय'... मस्त बडवायजरचा एक गारेगार कॅन घेऊन बसलो.... शिवराज पाटलांची "१० जनपथ" बद्दल जितकी आहे त्यापेक्षाही जास्त भक्ती अंगात आणली.... म्हटलं आपल्या हातून आज "सच्यालीलामृत" लिहून होतंय ! पण कसलं काय रे ! तुझ्याबद्दल लिहायचं तर नवीन विशेषणं कुठून खणून काढायची बाबा? असं काय लिहायचं राहिलंय तुझ्याबद्दल? तुझ्या खेळाबद्दल लिहीणार्‍यांची शब्दसंपदा आटून सुद्धा कैक वर्षं लोटली. त्यामुळे तो विषयच संपला. म्हटलं आपला सच्या कसा "ऑल टाईम ग्रेट" खेळाडू आहे... जेसी ओवेन्स, पेले, मॅराडोना, ब्रॅडमन, जिम थॉर्प, नादिया कोमानेसी, मार्टिना नवरातिलोवा, महंमद अली, फेडरर, शूमाकर, मायकेल फेल्प्स ह्यांच्या तोडीचा सर्वोत्कृष्ट "अॅथलीट" कसा आहे.. वगैरे वगैरे लिहावं ! बघ ना... ब्रॅडमन, नादिया, मार्टिना, फेडरर, फेल्प्स ह्यांचे आकडेच डोळे दिपवणारे आहेत - जेसी ओवेन्स आणि महंमद अलीची कहाणीच प्रेरणा देणारी - पेले आणि मॅराडोनाचं देवत्त्व निर्विवादच. पण पुन्हा तेच... किं यत्र समुच्चयम? एकवीस (and counting) वर्षांचं आंतरराष्ट्रीय करियर..... ते डोळे फिरवणारे आकडे... तुझ्या अचीव्हमेंट्स.... ती लोकप्रियता.... एक अब्ज खुळ्या लोकांच्या अपेक्षा.... ते "डेमिगॉड स्टेटस"..... स्वतःचेच विक्रम पुनःपुन्हा मोडीत काढण्याची तुझी न शमणारी तहान.... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे - एका अबोल, बुजर्‍या "मला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचंय" म्हणणार्‍या चमकणार्‍या डोळ्यांच्या १४ वर्षीय मुलापासून ते २३ वर्षांच्या अति यशस्वी कारकीर्दीनंतरच्या एका अबोल, बुजर्‍या "मला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचंय" म्हणणार्‍या चमकणार्‍या डोळ्यांच्या क्रिकेटच्या सम्राटापर्यंतचा तुझा प्रवास ह्यांपैकी किती लोकांनी केला असेल रे? तेव्हा तो नादही सोडून दिला. आणि शब्दांच्या शोधातच दोन महिने उलटून गेले. म्हटलं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तरी तू आमच्यासाठी काय आहेस ते तुला सांगावं.

एव्हाना हे ही लक्षात आलं होतं की तू इतर खेळाडूच नाही तर मर्त्य मानवांच्या तुलनेच्या पलिकडे पोचला आहेस. उगाच नसता आटापिटा करण्यात अर्थ नाही. मग म्हटलं त्यापेक्षा ह्या लेखाला थोडा वेगळा टच द्यावा. तुझी तुलना अर्जुनाशी वगैरे करावी.... अजिंक्य, महाबाहू, महाधनुर्धारी पार्थाशी. तुमचा पराक्रम, दिग्विजय, विजिगीषु वृत्ती वगैरे वगैरे. पण तिथेही गोची झालीच. तुला कुठे त्याच्यासारखे भर युद्धात प्रश्न पडतात? मैदानात असो वा मैदानाबाहेर - तुझे विचार नेहेमीच अचल अटल असतात. आजपर्यंत तुला "हाफकॉक" खेळताना बघितलेलं नाही. अमुक फटका मारावा की नको.. धावू की नको अशी द्विधा तुझी कधी होतच नाही गड्या. आणि ऑन अ लायटर नोट... अर्जुन म्हणजे द्रौपदी, उलूपी, चित्रांगदा असताना सुभद्रेच्या पाठीमागे लागणारा... आणि तू म्हणजे बीबीसीवरच्या मुलाखतकाराने "who is the woman of your dreams?" असं विचारल्यावर दुसर्‍या क्षणी "माय वाईफ" असं उत्तर देणारा ! तुमची काय कंपॅरिझन करणार कप्पाळ??? शेवटी म्हटलं मरूदे.. जे मनात येईल ते ते टंकावं अन काय होतंय ते पाहावं. आता पुन्हा काय वेगळं लिहायचं हे सुचेपर्यंत लिहायला घ्यायचं नाही. पण हा विचार टिकला असता तर आज हे लिहायला बसलो असतो का?

अरे हो.. तुला एकदम "अरे तुरे" करतोय... पण आपण आईला अन देवाला "अहो जाहो" करतो का? गेली २०-२२ वर्षं तू आमच्या आयुष्यात जो काही राडा घातलायस ना... काही विचारायची सोय नाही. देवाचे थोर उपकार की त्यानी क्रिकेटवेड्या भारतात जन्म दिला आणि तो ही अश्या काळात जेव्हा साक्षात तू क्रिकेट खेळलास. लहानपणी कधीतरी आईबापानी उन्हाळ्याच्या सुट्टीत कटकट नको म्हणून क्रिकेट शिबिराला घातलं आणि एक प्रेमकहाणीच सुरू झाली रे! तशी माझी क्रिकेट कारकिर्द पण थोडीफार तुझ्यासारखीच बरं का! Rolling On The Floor मी पण १२-१४ वर्षांचा असताना क्लब ऑफ महाराष्ट्रला खेळायचो. आपल्याला "अकरा मारुती कोपर्‍याचा संजय मांजरेकर" म्हणायचे Smile. तू वकारला खेळलास ना तस्साच मी एस.पी. वर इक्बाल सिद्दिकीला खेळलो होतो. दोन बॉल नाकासमोरून सरसरत गेल्यावर मला ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय ते समजलं होतं. माझ्यातल्या मांजरेकरचा पार मनिंदर सिंग झाला होता. अबे.... फाटली कशी नाही रे तुझी????? १६ वर्षांचा असताना पाकिस्तानात जाऊन इम्रान, वसीम, वकार आणि कादिरला भिडलास? थोबाड रक्तानी रंगलेलं असताना "मैं खेलेगा" म्हणायची हिंमत त्या वयात कुठून आणलीस रे बाबा? आणि वर कादिर सारख्या कलंदराला त्याच्याच आवतानावरून ठेचलंस? काय माती तरी काय म्हणायची तुझी?

आणि तेव्हापासूनच एका मंतरलेल्या प्रवासाला सुरुवात झाली होती. तुझं पाणी थोरामोठ्यांनी जोखलं होतं. "सचिन तेंडूलकर" नावाचा एक पोरगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवतोय हाच मोठा कौतुकाचा विषय होता. शास्त्री, प्रभाकर, मांजरेकर, सिद्धू, अझर वगैरेंनी नांगी टाकली तरी माझी ९३ वर्षांची पणजी सुद्धा "तेंडूलकर आहे ना अजून?" म्हणून समाधान मानायची. आणि मग हळू हळू तेंडूलकरवर 'अवलंबून' राहाण्याचे दिवस आले. तू ओपनिंगला येऊन धमाल करायला लागलास आणि आमच्या आशा-अपेक्षा वाढायला लागल्या. "तेंडूलकर आहे ना अजून" हे जणू भारतीय क्रिकेटचं ब्रीदवाक्य होऊन गेलं. तू बाद झालास की स्टेडियम ओस पडायचं तिथे टीव्ही बंद करणार्‍यांची काय कथा? आता विचार करताना कळतं की ह्यामागची आमची भावना एकच होती "विश्वास". आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तू वर्षानुवर्षं तो विश्वास सार्थ ठरवलायस. त्याचं काय आहे ना सच्या... च्यायला आपल्या देशात एकतर "हीरो" ही संज्ञा कोणालाही फार लवकर चिकटते. एक समाज म्हणून आम्ही कोणाच्याही एक-दोन करिष्म्यांवर हुरळून जातो आणि तो माणूस आमचा "हीरो" बनतो. मग तो कुणी घटका-दोन घटका आमची करमणूक करणारा उगाच काहीतरी श्टायली मारणारा नट वा धादांत खोटी विधानं करून आम्हाला चिथवून आमच्यातच भांडणं लावून स्वतःच्या तुंबड्या भरणारा एरवी फुटक्या कवडीची लायकी नसलेला राजकारणी का असेना. आम्हाला ना प्रेम करायला कोणीतरी हीरो हवा असतो. त्यात पुन्हा आमचा हीरो वेगळा आणि 'त्यांचा' हीरो वेगळा. मग आमच्या ह्या 'हीरोंचे' पाय मातीचे निघतात, आम्ही ज्याला आदर्श मानलं, मनाच्या देव्हार्‍यात ज्याची पूजा बांधली तोच आमचा देव दलदलीत बरबटलेला दिसतो. कधी पैसे खाण्याच्या, कधी घरी शस्त्र लपवण्याच्या, कधी सेक्स स्कँडलच्या तर कधी मॅच फिक्सिंगच्या. अश्या वेळी आम्हा सामान्य नागरिकांच्या आदर्शांचा चक्काचूर होऊन जातो. पण अरे जिथे सकाळी उठल्यावर नळाला पाणी नसल्याने आमच्या चिडचिडीच्या दिवसाची सुरुवात होते आणि रात्री घामाच्या धारा निघत असताना आणि डास चावत असताना दिवे गेले म्हणून तणतणत दिवसाचा शेवट होतो... तिथे आम्ही आमच्या भावनांच्या ह्या भडव्यांना कधी पायदळी तुडवणार रे? मग आमच्या हातात एकच उरतं - दुसरा कोणी हीरो शोधणे.

पण सच्या तू इतकी वर्षं झाली तरी त्या हीरो पदी ध्रुवतार्‍यासारखा अढळ राहिला आहेस. १९८९ ते ९२-९३ पर्यंत तू क्रिकेटचा "युवराज" होतास... १९९६ च्या विश्वचषकानंतर "राजा" झालास.... ९८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराक्रमानंतर "महाराज" झालास आणि २००० च्या मॅचफिक्सिंग प्रकारानंतर तर आमच्या हृदयाचा "चक्रवर्ती सम्राट" झालास. सीबीआयच्या चौकशीत एका बुकीनी म्हटलं - “ You cannot fix a match until and unless Sachin Tendulkar is out.” आणि खरं सांगतो सच्या... आयुष्यात पहिल्यांदा कोणी सेलेब्रिटी आमच्या विश्वासाला जागल्याचा आनंद आम्हाला दिलास. तुझ्यावरचे संस्कार आणि तुझं "अपब्रिंगिंग" ह्याबद्दल पूर्ण खात्री होतीच रे, पण पैशाच्या मायेनी जिथे भल्याभल्यांना देशद्रोही आणि भ्रष्ट बनताना पाहिलं होतं, तिथे मनात खूप धाकधुक होती. पण आजूबाजूला इतका धुरळा, इतका चिखल उडत असताना तुझ्यावर एक शिंतोडा उडवायची, एक बोट उठवायची कुणाची हिंमतही झाली नाही. आणि आमचा विश्वास दुणावला.

तुझ्याबद्दल लिहितोय खरा पण तुझ्या क्रिकेटबद्दल लिहायचं नाहिये...लायकीच नाही तसं करायची आमची. पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातली सागराची खोली आम्हाला मोहवून टाकते, त्यांचा धीरगंभीर ललत, रोमांचित करणारी तोडी, आषाढमेघांसारखा धीरगंभीर मल्हार, स्वरांचा दरबार उभा करणारा दरबारी आम्हाला दिसतो, पण एका षड्जावर महिनोंमहिने त्यांनी केलेली अथक मेहनत, प्रत्येक स्वर पक्का करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, तो आवाज मिळवण्यासाठीची त्यांची अविश्रांत तयारी, त्यांची जिद्द, चिकाटी आम्हाला दिसत नाही रे. तसं बापानी पोराला बागेत खेळायला सोडताना हळूच त्याच्या ढुंगणावर हलक्या हातानी मारावं तसा नजाकतीनी मारलेला तुझा स्ट्रेटड्राईव्ह, पृथ्वीतलावर केवळ तूच खेळू शकतोस तसा "राईट हँड ओव्हर लेफ्ट" फ्लिक, कित्येकदा अंगावर काटा आणणारा तुझा पॅडल स्वीप, अपर कट, "ऑन द राईझ" चेंडूला कव्हर्समधून सीमापार धाडतानाची तुझी मूर्तिमंत ग्रेस, चेंडू जेमतेम शॉर्ट पडल्यावरचा तुझा ताकदवान पुल, जिब्राल्टरच्या खडकानी गुण घ्यावा तसा तुझा भक्कम स्टान्स, इतकंच काय - विकेट मिळाल्यावरचा तुझा लहान मुलासारखा निखळ आनंद... आम्हाला हे सगळे अदभुत गुण दिसतात पण त्याच्यामागचे कष्ट आम्ही कुठे बघितले आहेत? तुझं ते दैवी टायमिंग साधण्यासाठी तू केलेली साधना, फील्डिंगमधल्या गॅप्स काढण्यासाठी तू केलेली जीवतोड मेहनत, मॅच टेंपरामेंट विकसित करण्यासाठी उन्हातान्हात तू खेळलेले अगणित सामने, भारतीय संघाची ती निळी टोपी घालण्यासाठी बालपणात तू केलेला त्याग... तुझ्या कष्टांची कल्पना सुद्धा करणं शक्य नाही रे आम्हाला. असं म्हणतात की genius is 1% inspiration and 99% perspiration. आणि आम्ही तर तुझ्या ह्या १ टक्क्यावरच जीव ओवाळून टाकलाय. ज्या वयात आम्ही शाळा कॉलेजं बुडवून मजा मारण्याचा, पोरी पटवण्याच्या गोष्टी करायचो त्या वयात तू मैदानात गुरासारखा राबत होतास.

पण तेंडल्या... कष्ट तर सगळेच करतात.. तू "तू" आहेस ह्याचं कारण आहे तुझ्यावरचे संस्कार आणि तुझी जडणघडण. आज तू क्रिकेटचा आता तर अभिषिक्त बादशहा असताना सुद्धा कधी तुझी कॉलर वरती नसते, तू गॉगल्स घालून खेळत नाहीस, शतक ठोकलंय म्हणून फील्डिंगला आला नाहीस असं कधीच होत नाही (अशी उदाहरणं आम्ही बघितली आहेत ना रे). कारण तू क्रिकेटचा सम्राट असलास तरी "आपला तेंडल्या" ही आहेस. प्रह्लाद कक्करच्या एका मुलाखतीत त्यांनी तुझा एक किस्सा सांगितला होता. पेप्सीच्या "सचिन आया रे भैय्या"ह्या गाण्यावरची अ‍ॅड शूट करतानाचा. आधी त्यात असं दाखवलं होतं की तू सामन्यात षटकारांची बरसात करतोयस आणि मैदानाबाहेर चेंडूंचा पाऊस पडतोय... पण रात्री कक्करना तुझा फोन आला..."This gives a feeling that I am greater than the game. One person can never be greater than the game itself"... आणि तू ती अ‍ॅड बदलायला लावलीस.. बोटीत बसून स्टंपनी बॉल मारतोयस असं त्यात दाखवलं गेलं. तुझा "पाया" किती भक्कम आहे हे ह्या आणि इतर अनेक प्रसंगांमधून दिसलं. साहित्य सहवासचे तुझ्या बालपणीचे वॉचमन गेले तेव्हा त्यांच्या मुलाला भेटायला तू सपत्नीक आवर्जून गेलास, तुझ्या दानशूरतेबद्दल नेहेमीच तिर्‍हाईताकडून कळतं, तुझ्या आजूबाजूचा प्रत्येक जण तुझ्या विनम्रतेचे गोडवे गातो... ह्यातच सगळं आलं.

आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुझी consistency. तू खेळायला लागलास तेव्हा कपिल, इम्रान, बॉथम, बोर्डर वगैरे खेळत होते. आता ते आपल्या नातवंडांना तुझे किस्से ऐकवत असतात. तुझ्या बरोबर म्हटलंस तर वसीम, वकार, लारा, वॉ बंधू, डिसिल्वा, वॉर्न, मॅक्ग्रा वगैरे जनता... त्यांना सुद्धा त्यांचा पी एफ आणि ग्रॅच्युइटी घेऊन बरीच वर्षं झाली.... नंतर आले फ्लिंटॉफ (इंग्लंडचं कुठलंतरी नाव घ्यायला हवं ना रे?), दादा, द्रवीड, लक्ष्मण, ब्रेट ली, हेडन आणि बरीच इतर लोकं....त्यातली सुद्धा कित्येक व्हीआरएस घेऊन बसली आणि कित्येकांचा "ले ऑफ" झाला. मग वीरू, युवी, भज्जी वगैरे पोरं जी तुला खेळतांना बघत मोठी झाली आणि आताची कोहली, तिवारी, श्रीवत्स गोस्वामी वगैरे पिल्लावळ ज्यांचे आजी आजोबा तुझ्या मॅचेस बघतांना आपल्या मुलांना स्थळं बघत असतील. तब्बल पाच पिढ्या बघितल्यास तू क्रिकेटर्सच्या आणि तरी सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून उभा आहेस ! आणि नुसता उभा नाहीस तर यशाच्या गौरीशंकरावर उभा आहेस. तुला गोलंदाजी करताना वसीम वकार मॅक्ग्रा वॉर्न अँब्रोज वॉल्शला जे धडधडलं असेल तसंच आज ईशांत शर्मा, बोलिंजर, मलिंगा, अँडरसनला धडधडतं हाच तुझ्या consistency ला सलाम आहे. इतक्या सगळ्या वर्षांत तुझी धावा करण्याची, भारतासाठी सामने जिंकण्याची भूक यत्किंचितही कमी झालेली नाही हे केवढं मोठं आश्चर्य !

गड्या तुझ्याकडून खूप खूप शिकलोय बघ. एक तर आमच्या मध्यमवर्गीय मनाला मोठी स्वप्न बघायला आणि ती खरी करण्यासाठी कष्ट करायला शिकवलंस. घरातल्या मारुती ८०० वर समाधान न मानता होंडा, बीमडब्ल्यू, ऑडी अगदी फेरारीची महत्त्वाकांक्षा धरायला शिकवलंस. त्यासाठी कष्टांना पर्याय नसतो हे ही ठसवलंस, आचरेकर सरांसारखा "मेंटर" किती महत्त्वाचा असतो हे कळलं, मिळालेलं यश हे अजून मोठ्या यशाची पायरी आहे हे शिकवलंस, आपली रूट्स कशी जपावीत हे सांगितलंस, देशभक्ती काय चीज असते आणि देशभक्त असण्यासाठी तुम्हाला बंदुक घेऊन सीमेवर लढायला हवं असं नाही हे शिकलो ते तुझ्याकडूनच (तुझ्या किट मधला सिद्धिविनायकाच्या फोटोबरोबर चिकटवलेला तिरंगा पाहिलाय आम्ही), आपलं काम जीव ओतून करायला शिकवलंस (पाकिस्तानविरुद्ध शतक काढून तू बाद झालास आणि आपण हरलो तेव्हा तू "मॅन ऑफ द मॅच" पुरस्कार घ्यायला आला नाहीस. राजसिंग डुंगरपुरांनी नंतर म्हटलं होतं he was crying like a little child), स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करायला लावलंस (वडील गेल्यानंतरचं तुझं शतक कोण विसरेल रे?), आपल्यावर होणारी टीका "पॉझिटिव्हली" घेऊन आपल्या कर्तृत्त्वानी त्यांना उत्तर देणं काय असतं हे तू आम्हाला दाखवून दिलंस (चॅपल, मांजरेकर आणि तुझ्याबद्दल शंका घेणार्‍या प्रत्येकाला आज तोंड दाखवायला जागा नाहीये). तू आम्हाला शिकवलंस की आपल्या आवडीच्या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती तर हवीच पण "अहेड ऑफ टाईम्स" विचार करता यायला हवा. हर्षा भोगलेनी सांगितल्याचं आठवतंय. "रवी शास्त्री आणि मी सचिनची मुलाखत घेत होतो. तू रनर का घेत नाहीस ह्या प्रश्नावर तो म्हणाला 'रनर कधीही माझ्यापेक्षा २ यार्ड मागे असणार आहे. मी बोलरच्या हातून चेंडू सुटल्याबरोबर त्या चेडूवर मिळणार्‍या धावेचा विचार करत असतो... रनर मात्र मी बॉल मारल्यानंतरच विचार करणार. शूमाकर पाचव्या नाही तर पहिल्या दिव्यालाच रेस सुरु करतो.... पाचवा दिवा लागल्यावर गाडी पुढे जाणं हा आधीच सुरू झालेल्या रेसचा एक भाग असतो". असा विचार तर मी मी म्हणणार्‍या क्रिकेट धुरंधरांच्याही डोक्याबाहेरचा आहे रे! तू शिकवलंस की तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्ही काहीही करू शकता. २००३ च्या वर्ल्डकप फायनलच्या वेळी ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान असताना तू टीमला म्हणालास "Can we hit one boundry in an over? That brings it down to 160 runs in 250 balls. Are we not good enough to do that? Let’s give it our best shot". आणि पुन्हा मॅक्ग्राला भिरकावून देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलीस. तेव्हा ती योजना यशस्वी झाली नसेल... पण तो अ‍ॅटिट्यूड तू तुझ्या सहकार्‍यांतच नाही... आमच्यातही बाणवलास.

आमच्यासाठी तू एक खेळाडू, एक क्रिकेटपटू, एक हीरो, एक विश्वविक्रमी फलंदाज, एक आदर्श मुलगा, शिष्य, सहकारी, भाऊ, पती, बाप ह्या पलिकडेही खूप काही आहेस. आमच्या आकाशात सचिन तेंडुलकर नावाचा ध्रुवतारा आहे - आम्हाला आयुष्याची दिशा दाखवणारा. तू आम्हाला "जगायला" शिकवलं आहेस... नव्हे शिकवतो आहेस. तू आम्हाला आनंद, जल्लोषाच्या क्षणांपलिकडेही इतकं काही दिलंयस की आज तुझ्या वाढदिवसाला तुला शुभेच्छा देताना शब्द अपुरे पडतायत. बस ! Keep being what you are. And thanks for being what you are.

तुझ्या वाढदिवसाला देवाकडे एकच मागणं आहे..... कधीतरी आयुष्यात तुझ्या पायावर डोकं ठेवायची संधी मिळावी... मग अगदी 'वरून' बोलावणं आलं तरी हरकत नाही.

२४ मार्च २०१०

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ५

दि: ५ जानेवारी - च्यायला.... माती खाल्ली परत... कोण कुठला समरवीरा न कसला थरंगा.... भज्जी, झहीर, युवी, माही.. काही काही कामाचे नाहीत. एक तर ह्या रावणांची तोंडं किती वेळा बघायची? किती वेळा खेळताय श्रीलंकेशी? ही काय दशावतारी आहे का? एक प्रयोग मुंबई, एक दिल्ली,३ ढाका... होपलेस साले. बंद करा यार हे क्रिकेट !

दि: ६ जानेवारी (पहाटे ६:३० वा.) - नको तो पेपर.... कुणी सांगितलंय परत समरवीराचं तोंड बघायला? मरूदे ना... हा...आता उठलोच आहोत तर एकदा ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा स्कोअर बघू.... च्यायला... हसी आणि सिडल अजून खेळतायत??? लीड किती झालं?? १२३??? दिडशे करायला सुद्धा नाकात दम आणतील पाकड्यांच्या हे ऑझीज.... बघू तर...

आणि अगदी महंमद यूसुफ गेल्यावर जेव्हा पाकिस्तानला "पोचवण्यासाठी" लोकांनी टापश्या बांधायला घेतल्या तेव्हाच टीव्ही समोरून हालायचं सुचलं. काय गेम आहे कळत नाही राव. कितीही शिव्या घाला....चिडचिड करा... ह्या खेळाबिगर जगणं मुश्किल आहे ! श्रीलंकेकडून हारलो म्हणून मुंबई - दिल्ली मॅच मध्ये लक्ष घालायचं. हे म्हणजे मी स्कॉच सोडली... सध्या रम घेतो पथ्याला असं म्हणण्यासारखं आहे. क्रिकेटचं ना बायको सारखं आहे. बायको तणतणते धुसफुसते म्हणून आपण लगेच घटस्फोट थोडेच घेतो? हा.. तुम्ही खरंच क्रीडाप्रेमी असाल तर जून-जुलै मधे टेनिस, प्रीमियर लीग.. कधीमधी युरो, वर्ल्डकप फुटबॉल अशी extramarital affairs झाली तरी शनिवारी दुपारी आफ्रिका-इंग्लंड टेस्ट बघताच ना?? तेव्हा ह्या जन्मात तरी दुसरा जोडीदार मिळणे नाही.

असो. ह्या मालिकेत आपण आपल्या आवडत्या खेळाच्या (मी पाहिलेल्या) काही कलाकारांच्या अदाकारीचा आणि त्यांच्या काही खूबींचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या तेंडल्यापासून, लारा, पिजन, वॉर्नी, फ्रेडी पर्यंत बरीच मांदियाळी झाली. आता एक खतरनाक जोडी ! बोलर्स हंट इन पेअर्स ह्या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण.... हॉल, ग्रिफिथ, गार्नर, रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल अश्या कर्दनकाळ गोलंदाजांचा वारसा सांगणारे.... संघासाठी जीव तोडून बोलिंग करणारे, वेगाबरोबरच स्विंग आणि टप्प्यावरच्या नियंत्रणाने भल्याभल्या फलंदाजांची परीक्षा बघणारे... खर्‍या अर्थाने क्रिकेटमधले "कॅरेक्टर्स" (वल्ली) म्हणता येतील असे दोघे महान गोलंदाज.... "कर्टली एलकॉन लिनवॉल अँब्रोज" आणि "कोर्टनी अँड्र्यू वॉल्श".

ह्यांची नावं जोडीनंच घ्यायला हवीत. ह्यांचा उल्लेख ह्या शेवटच्या लेखात करण्यामागे पण एक कारण आहे. मला असं वाटतं की "पारंपरिक" क्रिकेटचे हे शेवटचे शिलेदार. सध्या आपण ज्याला क्रिकेट म्हणतो त्याचा आणि ट्रंपर, ब्रॅडमन, जार्डीन, लिंडवॉल पासून सोबर्स, गावसकर, लिली, रिचर्डस, झहीर अब्बास वगैरे उत्तुंग लोकं जो खेळ खेळायचे त्या क्रिकेटचा संबंध खर्‍या अर्थाने संपला तो अँब्रोस - वॉल्श गेल्यावर. थोडक्यात त्यांच्यानंतर क्रिकेट "व्यावसायिक" झालं. जेंटलमन्स गेम "पजामा क्रिकेट" झाला तो ह्यांच्या नंतर. म्हणजे कोपर्‍यावरचं आपलं काणेमामांचं "हाटेल" पाडलं.... आणि त्याजागी "मल्टीक्विझीन रेस्तराँ अँड बार" सुरू झाला. "३ नंबरवर एक कोथिंबीर वडी २ पोहे...१ वर सायबांना एक पेश्शल" अश्या 'आर्डरी' बंद झाल्या. आता गिर्‍हाइकापेक्षा चकचकीत कपडे घातलेले वेटर्स नोटपॅडवर ऑर्डर्स लिहून घेताघेता "व्हाय डोंच्यू ट्राय ऑर शेफ्स स्पेशल ठुडे" म्हणतात तशी परिस्थिती झाली.

अँब्रोस आणि वॉल्शच्या शैली म्हणाल तर बर्‍याचश्या सारख्या आणि वेगळ्याही. दोघेही "ओपन चेस्ट" बोलिंग करणारे... अँब्रोस ६ फूट ७ इंच तर वॉल्श ६ फूट ६ ! अँब्रोसचा हुकमी एक्का आउटस्विंगर तर वॉल्शचा इनकटर. अँब्रोस टिपिकल फास्ट बोलर - आक्रमक मानसिकतेचा... तर वॉल्श बहुधा दर मॅचच्या आधी आसारामबापूंचा "सत्संग" अटेंड करत असावा. स्टीव वॉ शी मैदानात खुन्नस काढणारा... आक्षेप घेऊन रिस्ट बॅंड काढायला लावल्यानंतर खवळून उठून ऑझीजची वाताहात करणारा तो अँब्रोस. आणि वर्ल्डकप सेमीफायनलचा प्रवेश दाव्यावर असताना सलीम जाफरला "मंकडेड" न करणारा तो वॉल्श. दोघांत मिळून तब्बल ९०० पेक्षा जास्त कसोटी बळी मिळवणारी ही जोडगोळी.... निर्विवादपणे क्रिकेटमधली दोन महान व्यक्तिमत्त्वं.

क्रिकेटच्या माझ्या अगदी पहिल्या आठवणी म्हणजे १९८७ चा वर्ल्डकप. तो ही पुसटसा आठवतो. डिफ्रेटसनी गावसकरची काढलेली दांडी, अझरनी (बहुधा मॅक्डरमॉट्चा) तोंडासमोर घेतलेला 'कॉट अँड बोल्ड' आणि मार्टिन क्रो नी मिडऑनवरून मागे पळत जाऊन घेतलेला अफलातून झेल... हे मात्र पक्के आठवतात ! मुद्दा हा की ह्या मालिकेत आपण केवळ गेल्या वीसेक वर्षांतल्या निवडक महान खेळाडूंबद्दल बोलू शकलो. त्यातलेही अगणित हिरे राहून गेले (नाही हो... अमेय खुरासिया, नरेंद्र हिरवाणी बद्दल नाही बोलत मी Smile )!

अर्थातच क्रिकेट म्हणजे क्रिकेटर्स आणि क्रिकेटर्स म्हणजे क्रिकेट असं थोडेच आहे? गाणं तरी फक्त गायकाचं थोडंच असतं? संगीतकार, गीतकार, ध्वनीमुद्रकही आलेच की. मग आपण तरी क्रिकेटच्या ह्या 'पडद्यामागच्या कलाकारांना' कसे विसरू? खरं तर हा खेळ आमच्यापर्यंत पोचवला तो आधी रेडियो मग दूरदर्शन आणि नंतर सॅटेलाईट टेलिव्हिजनने. समालोचक दूरदर्शनवरचे तेव्हा सगळ्यात जास्त भावलेले समालोचक म्हणजे डॉ. नरोत्तम पुरी. .
अतिशय मृदुभाषी आणि "चार्मिंग" व्यक्तिमत्व. तेव्हा फारसं कळायचं नाही, पण नरोत्तम पुरींइतकं अजून कोणीच लक्षात राहिलं नाही. खूपदा टीव्हीवरची कॉमेंटरी इतकी रटाळ असायची की टीव्हीचा गळा आवळून आम्ही रेडियो लावून ऐकायचो. रेडियोवरची दोन नावं आठवतात ती म्हणजे रवी चतुर्वेदी आणि आकाश लाल ! "नमश्कार - कानपुरके ग्रीन पार्क इस्टेडियमसे मैं रवि चतुर्वेदी .... " वगैरे वगैरे सुरू झालं की खरोखरंच तिथला "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहायचा. "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर.. और बहोsssतही उम्मदा तरीकेसे ये खेल दिया है कव्हर्स क्षेत्रमेंसेचार्रर्रर्रर्रर्रन..." हा प्रकार केवळ लाजवाब ! ह्या रेडियो समालोचकांची शब्दसंपदा अगाध असायची. एकदा तर चतुर्वेदीसाहेब सिद्धूनी सिक्सर मारल्यावर "... ये छे रन और दर्शक आंदोलित" असं ओरडले होते. मज बालकाला नंतर बरीच वर्षं लोकं कसली कसली आंदोलनं वगैरे करतात म्हणजे एकत्र येऊन टाळ्या - शिट्ट्या मारत घोषणा देतात आणि एकंदर कल्ला करतात असंच वाटत होतं. दोन बॅट्समन "विकेट के बीच में विचार-विमर्श और वार्तालाप करते हुए" ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर दोघेजण हेल्मेट वगैरे घालून स्मिता तळवलकर आणि चारूशीला पटवर्धन स्टाइलमध्ये कागद वगैरे हातात घेऊन गंभीर डिस्कशन करतायत असं चित्र उभं राहिलं होतं. पण रेडियो कॉमेंटेटर्स मैदानावरच्या घडामोडी जिवंत करायचे हे नक्की. अर्थात आकाशवाणी अथवा दूरदर्शननी सुधारायचं नाहीच असं ठरवल्यामुळे बाकी स्टार वगैरे लोकं येऊ शकले.

क्रिकेट मैदानापेक्षा टीव्हीवरच जास्तं बघितलं गेलं. अहो मलातर पुण्याच्या (तेव्हाच्या) थंडीत, दुलई पांघरून, पहाटे गजर लावून उठून बघितलेल्या ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंडमधल्या आपल्या मॅचेस माझ्या पहिल्या चुंबनापेक्षा ठळकपणे आठवतात ! स्टंप माईकमुळे स्पष्ट ऐकू येणारे 'निक्स'.... स्टंप कॅम... कृत्रिम वाटावं असं हिरवंगार आउटफील्ड... आणि अर्थातच चिरतारुण्याचं (खरंतर चिरवार्धक्याचं) वरदान घेऊन आलेला रिची बेनॉ.

"ग्लोsssssssssरियश शनशाईन हीर अ‍ॅठ दि गॅबा ठुडे... अँड वीssss आर इन फॉर शम फँठॅश्टिक डेज ख्रिखेट" हे शब्द अजून माझ्या कानांत आहेत. बेनॉ म्हणजे क्रिकेटचे चंद्रकांत गोखले... पस्तिशीतच "ज्येष्ठ नागरिका"चं काम करणारे ! हजारो वर्षांपासून हा माणूस तस्साच दिसतो अन बोलतो. बोलण्यात अगदी योग्य चढाव उतार, मोजून मापून वापरलेले शब्द आणि चक्क "बोबडेपणा"...... बेणो हे एक वेगळंच रसायन होतं. म्हणतात ना 'झाले बहु, होतील बहु'... अगदी त्यातला प्रकार. बाकी काही म्हणा राव... कॉमेंटरी करावी तर ऑस्ट्रेलियन्सनी ! ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसचा माहौलच वेगळा असतो. ती थंडी, अर्धवट झोपेची ग्लानी, अफलातून मैदानं, ते रंगीत कपडे, ते सुंदर सुंदर प्रेक्षक... त्यातून त्यांचा उन्हाळा. आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे त्यांचे कॉमेंटेटर्स! त्यांचा अ‍ॅक्सेंट ऐकायला मी प्रियांका चोप्रा बरोबरची माझी "डेट" कॅन्सल करीन ! विशेषतः "एकारान्त" शब्दांचा "आय" असा जो उच्चार करतात ना... जियो ! ! ! "टुडे" चं "ठुडाय"..."ऑस्ट्रायलिया"... "गेम" चं "गायम"..."मॅक्ग्रा"चं "मक्ग्रार"... असं काय काय करतात ना... अहाहाहा ! माझं 'स्पोकन इंग्लिश' चाटे क्लासेसला न जाता देखील चांगलं आहे ते ह्यांच्यामुळेच.

बेनॉचं नमन झालं की मी वाट बघायचो (अजूनही बघतो) माझ्या सर्वांत आवडत्या कॉमेंटेटरची.... बिल लॉरी ! ! ! नाकातला गेंगाणा आवाज.. पुन्हा तो ऑस्ट्रेलियन अ‍ॅक्सेंट... टीव्ही प्रेक्षकांत excitement निर्माण करण्याची प्रचंड ताकद.... एक्सक्लेमेशन्स.... "गॉठिम"... "गॉssssssन".. नुसतं "ohhhhhhh" पण तितकंच उत्कंठा निर्माण करणारं. यूट्यूबवरचा हा व्हिडियो बघा !

टोनी ग्रेगची energy, बॉयकॉटची खेळाची समज, गावसकरचा critical acclaim, हर्षा भोगलेचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व अगदी रवी शास्त्रीचं रोखठोक बोलणं, मंदिरा बेदीचे ड्रेसेस ... सगळं सगळं मान्य... पण आमच्या बिल लॉरीची किंवा फॉर दॅट मॅटर मार्क टेलरची सर ह्यांना नाही. एखाद्या गायक / गायिकेचा गळा "प्लेबॅक"चा आहे म्हणतात ना... तसा लॉरी, टेलर, मायकल होल्डिंग, हेन्री ब्लोफील्ड, न्यूझीलंडचा इयन स्मिथ... ह्यांचा गळा "कॉमेंटरी"चा आहे ! होल्डिंगच्या bounce ह्या शब्दाचा उच्चार लिहीताना "ऊ"चा उकार ७ इंच वाढवावा लागेल. कॅरिबियन अ‍ॅक्सेंटमध्ये क्रिकेट कॉमेटरी ऐकायचा मझा काही औरच! तसाच बॉयकॉटचा टिपिकल यॉर्कशायर अ‍ॅक्सेंट. ह्या लोकांचा इंग्रजीचा लहेजा म्हणजे जिनच्या मार्टिनीला स्कॉच चा "डॅश" मारावा तसा क्रिकेटसारख्या आधीच नशील्या खेळाला पुरती बेहोषी देतो.

खेळाडू आणि समालोचकांइतकेच क्रिकेटचे आमचे देव म्हणजे पंच ! डिकी वर्ड विशेष आठवत नाही पण ही मूर्ती कुठला क्रिकेटप्रेमी विसरेल?

प्रेमळ आजोबांनी नातवाला दटावावं तसं फलंदाजाला बाद देणारा डेव्हिड शेफर्ड (नेल्सन वरची उडी तर अजरामर आहे), आधी डोकं हालवून मग हात वर करणारा (आणि आपल्या डोक्यात जाणारा) स्टीव्ह बकनर, "स्लो डेथ" रूडी कर्ट्झन, पहिल्या बाकावरचा शहाणा विद्यार्थी वाटणारा सायमन टॉफेल, "एंटरटेनिंग" बिली बॉडेन... हे सगळे खेळाडूंइतकेच लक्षात रहाणारे.

शेवटी काय हो मंडळी...... क्रिकेट आपल्या नसानसांत भिनलंय. खरंतर किती क्लिष्ट खेळ? पण प्रेमात पडल्यावर पोरीच्या १२वीच्या मार्कांकडे थोडेच बघतो आपण? क्रिकेट आवडण्यासाठी तुम्ही आयुष्यात कधीतरी पॅड्स बांधले असायची गरज नसते.... पण जर कधी तुम्ही जर ते पांढरे फ्लॅनेल्स घातले असतील... कधी तुम्हाला तो लालबुंद गोळा आडवताना हाताला झिणझिण्या आल्या असतील.... कधी तुमचा चेंडू सीम वर पडून आउटस्विंग झाला असेल... कधी वेगवान गोलंदाजाचा चेंडू तुमच्या नाकासमोरून जातानाचा सर्रर्रर्रर्र असा आवाज तुम्ही ऐकला असेल, ग्लव्हज् वर चेंडू बसून बोटं शेकली असतील तर हे भूत तुमच्या मानगुटीवरून उतरण केवळ अशक्य !

शेवटी क्रिकेट काय, फुटबॉल, टेनिस, बॅड्मिंटन, हॉकी, व्हॉलिबॉल काय...सगळेच खेळ आपल्याला आनंदच देतात ना? आपण सकाळी पेपर उघडताना मागल्या पानापासून सुरू करणारी लोकं. आयुष्याच्या भ्रष्टाचार, गरिबी, महागाई, नैराश्य, असहायता वगैरे असंख्य गोष्टींनी भरलेल्या दलदलीतून काहीतरी पॉझिटिव्ह, प्रेरणादायी, उत्साहवर्धक, आनंददायक वाचायला, ऐकायला, बघायला आपण आसुसलेले असतो. आणि वर्तमानपत्राचं शेवटचं पान हे माणसाच्या जिद्दीचं, विजिगीषु वृत्तीचं, बंधनं तोडण्याचं.... citius, altius, fortius - अजून वेगवान, अजून उंच आणि अजून शक्तिमान बनण्याच्या माणसाच्या प्रयत्नांच साक्षात द्योतक असतं. विजेत्यांच्या कर्तृत्त्वाचं आणि न जिंकलेल्यांच्या जिद्दीचं कागदाच्या एका पानावर अवतरलेलं प्रतीक असतं. म्हणूनच जेव्हा एक तेंडुलकर एका शोएब अख्तरला षटकार मारतो तेव्हा तो एक अब्ज लोकांना "आपण" कोणा शत्रूवर विजय मिळवल्याचा आनंद देत असतो. एक द्रविड जेव्हा ६ तास किल्ला लढवतो तेव्हा "आपण" एका संकटाचा यशस्वी सामना केल्याचं समाधान देतो, एक झहीर जेव्हा ३ आउटस्विंगर्स टाकून चौथ्या इनकटर वर बॅट्स्मनचे स्टंप्स फाकवतो तेव्हा "आपण" पूर्ण नियोजन करून आपलं लक्ष्य साध्य केलेलं असतं ! आपल्याला वैयक्तिक आयुष्यात ह्यातल्या सगळ्या गोष्टी नेहेमी करता येत नाहीत. आपल्याला गरज असते ती एका हीरो ची, जो शत्रूवर मात करेल, संकटांचा सामना करेल आणि आक्रमण करून यशस्वी ठरेल. पण असे "सुपरहीरोज" आपल्याला आपल्या आजुबाजुला बघायला मिळत नाहीत. आणि म्हणून आपण आपल्या खेळाडूंच्या प्रत्येक अचीव्हमेंटमध्ये "आपलं" यश बघायला लागतो. म्हणूनच क्रिकेट आपला धर्म होतो आणि क्रिकेटर्स आपली दैवतं !

पुढे लिहीत राहीनच - (आधीची वाक्यं नम्रपणे मागे घेतली आहेत Smile )!
(सर्व छायाचित्रे / चलतचित्र जालावरून साभार)

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स)

Reading poetry and watching cricket were the sum of my world, and the two are not so far apart as many aesthetes might believe.
Donald Bradman

आपलीही गोष्ट फारशी वेगळी नाहीच काय हो मंडळी. क्रिकेट हा मुळात आपल्यासाठी खेळ आहेच कुठे? ती तर गायन, वादन, काव्याइतकीच महत्प्रयासानी साध्य होणारी आणि तितकाच आनंद देणारी कला आहे. "अहाहा" "क्या बात है" अशी दाद मैफिलीत आणि क्रिकेटच्या मैदानावरच मिळू शकते ! एखाद्या कसलेल्या गवयाच्या तानेत आणि एका अव्वल स्पिनरच्या फिरकीत फरक असा तो काय? द्रविड जेव्हा ऑस्ट्रेलियात कसोटी शतक काढतो तेव्हा त्याची फलंदाजी ही एखाद्या रागाचे पैलू उलगडून दाखवणार्‍या मातब्बर गायकाइतकीच मनमोहक वाटते. फलंदाजीच्या तंत्राचं, त्यातल्या सौंदर्यस्थळांचं इतकं नेटकं उदाहरण क्वचितच सापडेल. आमच्या साहेबांच्या काही इनिंग्ज तर अश्या कलाकृती आहेत की त्याबद्दल त्यांना "ज्ञानपीठ" द्यायलाही हरकत नसावी.

असो. आज आपण परामर्श घेणार आहोत ते काही अश्या कलाकारांचा जे ह्या क्रिक-कलेच्या सगळ्याच प्रांतांत आपली छाप सोडून गेले. आजकाल "ऑलराऊंडर" हा शब्द लोकांनी पाणी घाल-घालून पार बेचव आणि पुचाट करून ठेवलाय. अहो जिथे करीना कपूर "सौंदर्यवती" ठरते तिथे पॉल कॉलिंगवूडला 'ऑलराऊंडर' म्हणणारच ! पण आपण आज ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत ते असे "बिट्स अँड पीसेस" खेळाडू नाहीत. तर बॅट आणि बॉल दोन्हीवर हुकुमत राखणारे खंदे वीर आहेत. साक्षात सोबर्स, बेनॉ, मंकड, हॅडली, बोथम, इम्रान आणि कपिलची परंपरा सांगणारे हे वीर कोण आहेत ते पाहूया.

पहिला आमचा वसीमभाई. आजतागायतचा निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट डावखुरा जलदगती गोलंदाज. जेमतेम ८-१० पावलांच्या रन-अपने सुद्धा आरामात १४० कि.मी चा वेग गाठणारा आमचा वसीमभाई. 'ओव्हर द विकेट' ने मिळणारा अँगल वापरून फलंदाजाला मोहात पाडणारा.... आणि दगाबाज प्रेयसीप्रमाणे त्याच्या धारदार 'इनकटर' ने त्याचा खून करणारा वसीमभाई..... सामन्यातल्या काट्याच्या क्षणी फलंदाजाला जेरबंद करून नामोहरम करू शकणारा वसीमभाई आणि वेळप्रसंगी बॅट परजत, समोरच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत मॅचचा नूर पालटणारा वसीमभाई.

broken image

वसीम अक्रमचं वैशिष्ट्य म्हणजे जलदगती गोलंदाजाकडे असणारी आक्रमकता तर त्याच्याकडे होतीच. पण तरीही वसीमभाई "जेंटलमन" होता. बॅट्समनला शिव्या घालण्याची... टोमणे मारून त्याची एकाग्रता भंग करण्याची.. नजरेनी 'खुन्नस' देऊन काही 'कॉमेंट्स' मारायची त्याला कधी गरजच पडली नाही. ही सर्व कामं करायला त्याची बोलिंग पुरेशी होती. वसीमभाईच्या ४१४ टेस्ट विकेट्सपैकी ११९ LBW आणि १०२ बोल्ड आहेत. परत साथीला त्याचं 'टेंपरामेंट' होतं. तो मोठ्या स्टेजचा खेळाडू होता. १९९२च्या वर्ल्डकप फायनल मध्ये आधी बॅटीने त्यानी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. आणि मग भेदक मारा करून इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. 'नेहरू कप'च्या फायनलमध्ये २ चेंडूंत ६ धावा हव्या असताना आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची १२३ धावांची खेळी क्रिकेटरसिकांच्या कायम स्मरणात राहील. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक काढणारा तो एकमेव "ऑलराऊंडर".. पण तरी त्याने आपल्या बॅटिंगला न्याय दिला नाही असंच वाटतं. वसीमभाई लक्षात राहातो ते त्याच्या टाचतोड्या यॉर्कर्ससाठी... वकारभाईबरोबरच्या त्याच्या भन्नाट जोडीसाठी.

"ऑलराऊंडर्स" आणि दक्षिण आफ्रिका हे एक समीकरणच झालं आहे. मुळातच कुठल्याही खेळ उत्तम खेळण्याची 'जाण' (एखाद्याला गाणं येतं तसं ह्यांना "खेळणं" येतं), भरपूर संधी उपलब्ध असल्यामुळे त्या त्या खेळातलं कौशल्य शिकण्याचा त्यांचा IQ खूप जास्त असतो. क्रोनए, क्लुसनर, कॅलिस, पोलॉक, मॅक्मिलन असे अनेक दर्जेदार ऑलराऊंडर्स आफ्रिकेनी दिले. ह्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे जाक्स कॅलिस. खरंतर ऑलराऊंडर म्हणजे बोलिंग करू शकणारा बॅट्समन अथवा बॅटिंग करू शकणारा बोलर. पण कॅलिसच्या बाबतीत हे दोन्हीही निकष चुकीचे ठरतात. बॅटिंग आणि बोलिंगमध्ये तितक्याच भरवशाचा आणि सातत्याने चमकदार कामगिरी करणारा कॅलिस हा बहुधा एकमेव खेळाडू आहे. वन डाऊन ही कसोटी क्रिकेटमधली सर्वांत 'ग्लॅमरस' पोझिशन. ब्रॅडमन, सोबर्स, रिचर्ड्स, झहीर अब्बास, द्रविड, पाँटिंगसारखे दिग्गज वन डाऊन खेळले. आणि ह्या दिग्गजांच्या पंक्तीत कॅलिस तसूभरही कमी पडत नाही. शिवाय गोलंदाजीतही पठ्ठ्या अव्वल आहेच. ह्या कॅलिसचे खांदे बनवताना देवानी तिघांचे खांदे एकाच 'चासी'वर बसवलेकी काय असं वाटतं. कॅलिसकाकांचं (जाक्सच्या वडिलांचं) शेत वगैरे असतं तर त्यांना नांगरणीसाठी बैल घ्यायची गरजच पडली नसती. त्यांच्या कुलदीपकानी एरवीच जू मानेवर घेऊन शेत झक्कपैकी नांगरून दिलं असतं.

कॅलिसचा बॅकफुट कव्हरड्राईव्ह खूप प्रेक्षणीय असतो. आपल्या उंचीचा पुरेपूर उपयोग करून तो बॉलवर येऊन कव्हर्समधून सुरेख ड्राईव्ह करतो. बॅटलिफ्ट आणि फॉलोथ्रू..... दोन्ही अतिसुंदर. बॉल फारसा 'शॉर्ट' नसला तरी चालेल...बस थोडीशी 'विड्थ' मिळण्याचा अवकाश....उजव्या पायावर बॅलन्स साधत बाबाजी आरामात चौकार हाणतात.

ह्याचाच सहकारी शॉन पोलॉक. पीटरबाबांकडून गोलंदाजी आणि ग्रॅएमकाकाकडून फलंदाजीची इस्टेट ह्यांना आंदण मिळालेली. एक वेळ अशी होती की शॉनभाऊंनी आपल्या अचूक गोलंदाजीने दुनियेतल्या तमाम बॅट्समनचं जगणं मुश्किल केलं होतं. लाइन लेंग्थमध्ये मॅक्ग्राचा भाऊ शोभावा ! ऑफस्टंपवर गुडलेंग्थच्या थोडा अलिकडे टप्पा पडायचा आणि बॉल बाहेर जायचा. बरेचदा ह्या मानसिक छळामुळे बॅट्समन समोरच्या बोलरला मारायला जाऊन बाद व्हायचा. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेट्स जरी ८००+ असल्या तरी खरंतर तो आकडा बराच जास्त आहे.

त्याची बोलिंग अ‍ॅक्शन थोडी विचित्र होती. त्याच्या उंची आणि ताकदीच्या मानाने तो तितका वेगवान देखील नव्हता. पण ती कसर तो अचूकतेने भरून काढायचा. "bowlers hunt in pairs" ह्या उक्तीला जागून त्याने आणि अ‍ॅलन डोनाल्डने एक काळ आफ्रिकेसाठी निश्चितच गाजवला. अगदी लिली-थाँप्सन, मार्शल-होल्डिंग, वसीम-वकार, वॉर्न-मॅक्ग्रा ह्यांच्याबरोबर नाव घ्यावं इतका.

ह्यानंतर परत एक आफ्रिकन. लौकिकार्थानी तो ऑलराऊंडर नव्हता.. कारण तो गोलंदाजी करायचा नाही. पण ह्याचं कर्तृत्त्व असं की त्यानं ऑलराऊंडरची व्याख्या बदलायला लावली. १९९२ ची गोष्ट.... पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या सामन्यात आफ्रिकेनी बॅकफुट पॉइंटला एक विचित्र प्राणी उभा केला होता... विचित्र अश्यासाठी की त्याचं रूप तर माणसासारखं होतं, पण हालचाली चित्त्याच्या, नजर घारीची.... त्याची हाडंही बहुतेक रबराची... आणि तो उडूही शकायचा. आमचा इंझी बिचारा... नेहेमीप्रमाणे पॉइंटला बॉल ढकलून बुलडोझरसारखा पळायला लागला... पण इम्राननी त्याला परत पाठवला....आता तो जेसीबी ब्रेक मारून, उलटा फिरून, परत अ‍ॅक्सिलरेटर मारून, पिकप घेऊन पोहोचेपर्यंत हा पॉइंटचा प्राणी बॉल घेऊन स्टंपपाशी धावत आला...एकच स्टंप दिसत होता...आणि जणूकाही समोर पाणी आहे अश्या रितीने स्वतःला स्टंप्सवर झोकून देऊन त्यानी इंझीला धावबाद केलं. आणि क्रिकेटप्रेमींना त्यांचा पहिला "फील्डिंग ऑलराऊंडर" मिळाला.... जोनाथन नील र्‍होड्स.

पहिल्या 'गुगली'नी जेवढा गहजब झाला असेल... पहिल्या 'रिव्हर्स हिट'नी जितकं आश्चर्य वाटलं असेल.. पहिल्या 'दिलस्कूप'नी जितक्या भुवया उंचावल्या असतील त्यापेक्षा जास्त नवल जाँटीच्या फील्डिंगनी वाटलं होतं. क्रिकेटनी ह्या आधी चांगले फील्डर्स बघितले नव्हते असं थोडंच आहे? कॉलिन ब्लँड, बॉब हॉलंड, सोलकर, सिम्प्सन, मार्क वॉ, अझर... नावं तरी किती घ्यायची. ही सुद्धा खरंतर अपवादच. एरवी अहो आम्हाला सवय ते आमच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूला एकटं वाटू नये म्हणून सीमारेषेपर्यंत सोबत करण्याची.... फार फार तर "घालीन लोटांगण" म्हणत डाइव्ह मारण्याच्या नावाखाली आडवं होणार्‍यांची. पण हे पाणी नक्कीच काहीतरी वेगळं होतं. चेंडूवरची इतकी स्थिर नजर, चपळता, विजेसारखे 'रिफ्लेक्सेस', सीमारेषेजवळ 'स्लाइड' होऊन चेंडू अडवून त्एकाच 'अ‍ॅक्शन' मध्ये बॉल परत यष्टीरक्षककाकडे टाकणं, बिनधास्त झोकून देण्याची तयारी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे डाईव्ह मारून निमिषार्धात पुन्हा उभं राहून अचूक फेकीनी स्टंप्सचा वेध घेण्याची क्षमता... छे ! सगळंच विचित्र ! ! ! बॅकफुट पॉइंटचं ग्लॅमर जाँट्यानी शतपटीनी वाढवलं. तो उपयुक्त फलंदाज होताच. पण फलंदाजीत शुन्यावर बाद झाला तरी क्षेत्ररक्षणात २५-३० धावा आरामात वाचवायचा. ह्या धावा जर त्याच्या सरासरीत मोजल्या तर जॉंट्या सच्या आणि पाँटिंगबरोबर जाऊन बसेल ! आणि ह्यानी घेतलेले 'नसलेले' झेल पकडले तर १०० विकेट्स पण झाल्याच की !

अहो हा असा आचरटपणा केल्यावर कुठल्या फलंदाजाची अक्कल गहाण पडलीये ह्याच्या जवळपाससुद्धा बॉल मारायची? हा आणि गिब्ज शेजारी शेजारी उभे राहिले की ऑफला बूच लागलंच !

ह्यानंतरचा आपला ऑलराऊंडर पण साधारण जाँट्याच्याच जातकुळीतला... म्हणजे फलंदाज-गोलंदाज नाही तर यष्टीरक्षक फलंदाज ! अर्थातच अ‍ॅडम गिलख्रिस्ट ! उत्कृष्ट यष्टीरक्षक... आणि अत्युत्कृष्ट फलंदाज ! गिलीला ऑस्ट्रेलियन संघात येण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. इयन हीली निवृत्त होईपर्यंत गिली कधी खेळलाच तर फक्त फलंदाज म्हणून. त्याच्या फलंदाजीची सुरुवात देखील फारशी आश्वासक नव्हती. पण नंतर नंतर गिली एक धडाकेबाज फलंदाज म्हणून बहरत गेला. कसोटींत जवळपास ८२ च्या स्ट्राईक रेटनी ४८ आणि वनडेमधे जवळपास ९७ च्या स्ट्राईक रेट आणि ३६ च्या सरासरीनी धावा अन्य कोणत्याच यष्टीरक्षकानी सोडाच.... कसलेल्या फलंदाजानी देखील काढलेल्या नाहीत. गिलीचा झंझावात क्रिकेटच्या सगळ्याच प्रकारांमध्ये चालू राहिला. वनडेतच नव्हे तर कसोटीमध्येदेखील गिलीने सामने एकहाती फिरवले आहेत.

गिलीची नजर आणि "hand-eye coordination" लाजवाब होतं ! किंचित जरी शॉर्ट बॉल पडला तरी तो लीलया मिडविकेटवरून षटकार खेचत असे. गिलीची मला सर्वांत आवडते ती पाकिस्तान विरुद्धची जस्टिन लॅंगर बरोबरची भागीदारी. होबार्ट कसोटीत वसीम, वकार, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक आणि अझर मेहमूद अश्या दिग्गज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर चौथ्या डावात जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३६९ धावा हव्या होत्या. ५ बाद १२६ अश्या अवस्थेत लँगर - गिली एकत्र आले. तब्बल २३८ धावांची भागीदारी करत त्यांनी ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. तेव्हा गिली प्रत्येक षटकातल्या एका चेंडूवर ठरवून रिस्क घेऊन चौकार मारत होता. (स्टंप माइक मधून लँगरचं बोलणं ऐकू यायचं "this ball gilly... this ball" आणि त्या बॉलला गिली चौकार मारत होता. गिली खेळलेल्या ९६ कसोटींपैकी तब्बल ७३ मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली आणि बहुतेक विजयांमध्ये गिलीचा मोठा वाटा होता.

क्रिकेटचं माहेरघर म्हणजे इंग्लंड. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? "ऑल टाईम ग्रेट" म्हणावा असा एकही खेळाडू ईंग्लंडच्या संघात नाही. अजूनही बोथमच्या नावानी उसासे टाकण्यातच ब्रिटिशांचा वेळ जातो. त्यातल्या त्यात बोथमच्या जवळपास जाईल असा नजीकच्या भूतकाळातला एकमेव इंग्लिश खेळाडू म्हणजे अँड्र्यू फ्लिंटॉफ ! उत्तम गोलंदाज आणि उत्तम फलंदाज. पण प्रत्येक इंग्लिश खेळाडूसारखाच आपल्या लौकिकाला न जागलेला. मग तो इथं काय करतोय? बहुतेक इंग्लिश खेळाडू जसे आपआपल्या "ऑल टाईम ११" मध्ये सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर म्हणून जॉन एंबुरीचं नाव घालतात तसंच क्रिकेटच्या जन्मदात्यांची अगदीच आबाळ होऊ नये म्हणून ह्याचं नाव घातलंय. अर्थात फ्लिंटॉफ ह्या यादीत बसतच नाही असं मुळीच नाही हा.

क्रिकेटचा एक एंटरटेनर म्हणून फ्लिंटॉफ नक्कीच स्मरणात राहील. बोथमसारखाच आक्रमक आणि flamboyant. आपल्या तगड्या शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन फ्लिंटॉफ वेग आणि bounce निर्माण करायचा आणि फलंदाजी करताना तितक्याच ताकदीनी चेंडू बाहेर भिरकावूनही द्यायचा. त्याच्या बॅटच्या स्वीट स्पॉटला चेंडू लागला की त्या चेंडूचं ठिकाण ठरलेलं असायचं - प्रेक्षकांत ! जाऊदे... एका इंग्लिश क्रिकेटपटूविषयी ह्याहून चांगलं काही सुचत नाही. इतकं लिहीलं हे ही पुष्कळ आहे !

तर आता पुढच्या (अजून एक आहेच का??) लेखात काही खरे हीरोज आणि मग ह्या मालिकेला पूर्णविराम !

(सर्व छायाचित्रे जालावरून साभार)

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३

आज कचेरीत माश्या मारताना आमच्या अजून एका साहेबांची ही इनिंग बघण्यात आली आणि पुन्हा लिहिण्याची खुमखुमी आली. बरेच वर्षांपूर्वीच लक्षात आलं होतं की आपल्याला ह्या खेळाचं व्यसन लागलंय. अधूनमधून सोडायची हुक्की येते पण संध्याकाळी जसे अट्टल दारुड्याचे पाय गुत्त्याकडेच वळतात तसे आमची नजर ईएसपीनच शोधणार ! मैत्रीणीला (तेव्हाच्या) "डेट"ला म्हणून मुंबई - महाराष्ट्र मॅच दाखवायला गेऊन गेलो होतो... तो आता आमची परिस्थिती सुधारून सुधारून किती सुधारणार? असो !

ह्या लेखातला पहिला कलाकार हा खरोखरच क्रिकेटचा "प्रिन्स" ! ह्याची बॅटिंग तर त्याच्या देशाच्या कॅरिब बीयरसारखी फेसाळती आणि त्तिच्यापेक्षा कितीतरी अधिक झिंग आणणारी. ह्याचा उल्लेख खरंतर खूप आधी यायला हवा होता पण देर आये दुरुस्त आये ! ९१ च्या विश्वचषकात आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात आक्रमक शतक ठोकणारा शैलीदार फलंदाज ही माझ्यासाठी "ब्रायन चार्ल्स लारा"ची पहिली आठवण. नंतर त्याने एकदा अक्रम, वकार आणि आकिब जावेदला शारजामध्ये फोड फोड फोडला आणि हे पाणी वेगळं आहे ह्याची जाणीव झाली. कसोटीमध्ये तब्बल ९ द्विशतकं (त्यातले दोन स्कोर्स म्हणजे ३७५* आणि ४००*), विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनेक संस्मरणीय खेळी (त्यातली १५३*ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी विस्डेनच्या सर्वकाळच्या सर्वोत्कृष्ट खेळींमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे), ११,००० पेक्षा जास्त कसोटी आणि १०,०००+ एकदिवसीय धावा.... अनेक विक्रम लाराने प्रस्थापित केले.

लाराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पदन्यास आणि बॅटचा 'स्विंग'. खाली वाकून केलेला ड्राईव्ह किंवा पुल अथवा फिरकी गोलंदाजाला पुढे येऊन लाँगऑनवरून मारतानाचा त्याचा पदन्यास बघून आपण क्रिकेट बघतोय का भरतनाट्यम असा संभ्रम पडावा. एखाद्या ब्रेकडान्सरसारखा एक पाय वर घेऊन उंच बॅटलिफ्ट घेऊन मास्तरांनी अतरंगी पोराच्या कानफटात मारावी तसा लारा चेंडूच्या थोतरीत द्यायचा. लाराचा ऑन ड्राईव्ह पण असाच बेहतरीन.

ऑन ड्राईव्ह हा क्रिकेटमधला बहुधा सर्वांत अवघड फटका. आणि लारा इतका देखणा ऑनड्राईव्ह क्वचितच कोणी मारू शकत असेल. टप्प्याच्या अगदी जवळ जाऊन टिपिकल उंच बॅटलिफ्टने लारा मिडविकेट आणि मिडऑन मधली गॅप वारंवार काढू शकायचा. भारताच्या सुदैवानी लारा आपल्याविरुद्ध फारसा कधी 'चालला' नाही... पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड.. .अगदी आपल्या मुरलीला विचारा. लाराबद्दल बोलताना भल्या भल्या बोलर्सचे कान चिमटीत जातील !

ह्यानंतरचा आमचा कलाकार म्हणजे आमचा लाडका "जंबो". अनिल "ऑल टेन" कुंबळे ! ह्याला बघून मला राजा ब्रूस (?) आणि कोळ्याची गोष्ट आठवते. इतक्या वर्षांनी त्या कोळ्याची मनुष्य जन्म घ्यायची वेळ आली आणि तो अनिल कुंबळे म्हणून बंगळूरूमध्ये जन्माला आला. ह्याच्याइतका मेहेनती आणि प्रामाणिक प्रयत्न करणारा - कमिटेड खेळाडू भारतीय क्रिकेटनी पाहिला नसेल. शिरीष कणेकरांनी म्हटल्या प्रमाणे "कुंबळेचा लेगब्रेक खरंच वळला ....... (तरी) घड्याळाला शॉक नाही ! !" अशी शॉकप्रूफ घड्याळाची जाहिरात करायला खरंच हरकत नव्हती. अहो ही अ‍ॅक्शन बघून कोन ह्याला स्पिनर म्हणेल???

पण परिस्थिती कितीही वाईट असो..... पठ्ठ्या षटकानुषटकं न थकता चिवटपणे बोलिंग करायचा. एकदा तर एका डावात तब्बल ७२ ओव्हर्स टाकल्या आहेत त्यानी ! त्याचा फ्लिपर मोठमोठ्या फलंदाजांना झेपायचा नाही (फक्त अरविंदा डिसिल्व्हानं त्याचा "सोर्स कोड" चोरला असणार). भारतातच नव्हे तर परदेशातही कुंबळेला खेळणं सोपं नसायचं. पीटर रोबक नावाचा समीक्षक त्याच्याबद्दल म्हणतो - Kumble more closely resembles Glenn McGrath than Warne or Murali because he does not so much baffle batsmen as torture them with precisely-pitched deliveries. ३० पेक्षा जास्त वेळा डावात ५ वा अधिक बळी मिळवणार्‍या ४ गोलंदाजांत एक कुंबळे आहे (इतर हॅडली, वॉर्न आणि मुरली), ह्यावरूनच भारताच्या प्रत्येक कसोटी विजयात त्याचं योगदान किती मोलाचं होतं हे लक्षात येईल. खालच्या एका फोटोत कुंबळेचं वेगळेपण दिसून येतं.

कुठला खेळाडू जबड्याला फ्रॅक्चर झालेलं असताना केवळ आपल्या संघासाठी बँडेज बांधून बोलिंग करेल??? ओव्हलवरची त्याची पहिली टेस्ट सेंच्युरी आठवा. जंबो मिळालेल्या लहान मुलासारखा जंबो निखळ आनंदानी नाचला होता. कष्टाळू गोलंदाज ते शेवटी खंबीर कर्णधार हा कुंबळेचा प्रवास ही त्याचे अपार कष्ट, कमिटमेंट आणि क्रिकेटवरच्या अलोट प्रेमाची पावती आहे.

आता वर उल्लेख आलाच आहे तर "पिज" ला आपण कसे विसरू? म्हणतात ना "love him or hate him, but you can't ignore him". कबुतरासारख्या काटकुळ्या पायांमुळे त्याला "पिजन" नाव पडलं. तो रिटायर झाल्यानंतर म्हणे त्याला कोणीतरी पळवलं आणि त्याचं ऑपरेशन केलं. त्यांना त्याच्या कवटीत 3.6 ghz pentium 4 प्रोसेसर, नजरेत high calibration parabolic reflectors असलेलं radar आणि हृदयाच्या जागी 0.25 HP ची मोटर सापडली म्हणे. Newton Raphson method प्रमाणे हा फॉर्म्युला वापरून मनगटातल्या trajectory control robotic manipulator च्या साहाय्याने तो ऑफस्टंपच्या बाहेर ९.३७९३४ इंच आणि पॉपिंग क्रीझपासून ६६.३८० इंच ह्या co-ordinates वर ९९.२७ च्या accuracy नी सलग गोलंदाजी करू शकायचा ! सगळं परत जागच्या जागी बसवलं आणि गडी IPL खेळायला आला !

अचूकतेच्या बाबतीत हा कुंबळेचा थोरला भाऊ (आणि इतरांचा बाप - आजोबा - पणजोबा). प्रत्येक सीरीजच्या आधी "आम्ही ५-० जिंकणार" आणि "सचिन /लारा /आथरटन / कॅलिस हाच माझं मुख्य लक्ष्य असेल" ही दोन विधानं ठरलेली. 'नाकी नऊ आणणे' ह्या वाक्प्रचाराचा आयुष्यात उपयोग मॅक्ग्राइतका कोणीच केला नसेल. स्लेजिंग म्हणजे ह्याच्या गोलंदाजीचं अविभाज्य अंग. तो IIM सिडनी च्या "Advanced PG diploma in verbal abuse" च्या १९९३च्या बॅचचा टॉपर होता. फलंदाजाला असभ्य, प्रसंगी वैयक्तिक टोमणे मारून आणि उचकवून त्याला बाद करण्यात ह्याला काहीच गैर वाटत नसे. पण तेच जर फलंदाजाने जिभेने वा बॅटीने उत्तर दिले तर ह्याला खपत नसे. सचिन आणि लारासारखे ईन मीन दोन फलंदाज ह्याला पुरून उरले. मैदानावरच्या अनेक कुप्रसिद्ध बहुधा वाचिक द्वंद्वयुद्धांना त्याने सुरुवात केली होती. आता क्रिकेट खेळच असा की गोलंदाजाची एक चूक झाली तर फारतर एका चेंडूवर षटकार बसतो. पण तेच जर फलंदाज एकदा चुकला तर तो बादच होतो ! ह्याच गोष्टीचा मॅक्ग्राने फायदा घेतला आणि पोत्याने विकेट्स घेतल्या. पण फक्त स्लेजिंगमुळे तो इतका यशस्वी ठरला असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. एरवी असं बोलणार्‍या वागणार्‍या गोलंदाजाला सचिन / लारा / पीटरसन / स्मिथ सारख्यांनी आयुष्यातून ऊठवला असता (मायकेल कास्प्रोविक्झ आठवतो?). पण मॅक्ग्राला कोणीच ते करू शकलं नाही हाच त्याचा मोठेपणा.

ह्यानंतर साक्षात lazy elegance. पाकिस्तान ची पहिली विकेट पडली की सकाळी सकाळी मारून मुटकून शाळेत पाठवलेल्या पोरासारखा बॅट जमिनीवर घासत, दीनवाणा चेहरा करून त्यांचा धिप्पाड ढोल्या कर्णधार यायचा. हात पुढे केल्यावर मास्तरांनी छडी मारण्याच्या तीन सेकंद आधी मुलाच्या चेहेर्‍यावर जे भाव असतात ते आमच्या इंझीच्या चेहेर्‍यावर. पण हाच आळशी इंझी वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी होता. इंझी आणि हत्तीमध्ये विलक्षण साम्य होतं. निवांतपणा हाच खरा स्थायीभाव. फोर सिक्स हाणायचा तो पण "शक्यतो पळायला लागू नये" ह्या एकाच भावनेतून.

हा... पण त्याच्या appearance वर गेलात तर फसलातच म्हणून समजा. कारण बॅटिंग करताना त्याची हालचाल विलक्षण चपळ असायची. भेदक नजर आणि लाजवाब hand - eye coordination च्या जोडीला टायमिंगची नैसर्गिक साथ होती. त्याच्या दिवशी जगातल्या महत्तम गोलंदाजीची पिसं काढण्याची ताकद होती इंझीमध्ये. आणि तो तशी काढायचा देखील. एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता असलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये इंझी होता.

त्याच्या फटक्यांमध्ये विलक्षण ताकद असायची. क्षेत्ररचनेचा अचूक अंदाज घेऊन तो रिकाम्या जागांमध्ये बॉल मारत असे. आपण बाळाला नजर लागू नये म्हणून तीट लावतो ना.... तशी ह्याच्या एरवी गोंडस फलंदाजीला एक तीट होती.... "रनिंग बिट्वीन द विकेट्स". एकवेळ कामना कामतेकर बिकिनीमध्ये बरी दिसेल पण इंझीला पळताना पहाणं म्हणजे अत्याचार होता. वन डे सामन्यात गडी तब्बल ४० वेळा धावबाद झालाय (आणि समोरच्याला कितीवेळा आऊट केलं असेल ह्याला तर गणतीच नाही). मध्ये अक्रमनी त्याचा एक किस्सा संगितला होता. शेवटच्या षटकांत फलंदाजी करत असताना इंझी यॉर्करवर तोल जाऊन पडला. शेवटचं षटक असल्यामुळे अक्रम धावला. तोपर्यंत इंझीने उठायचे तर सोडाच, वर बघायचे पण कष्ट घेतले नाहीत. दोघे एकाच बाजूला आले आणि अक्रम धावबाद झाला. चिडलेल्या अक्रमला शेजारी बघितल्यावर इंझी शांतपणे त्याला म्हणाला... "अरे वसीमभाई... .आप यहाँ क्या कर रहे हो?" एकंदरच "कुठे उगाच उन्हात खेळायचं" असाच त्याच्या खेळण्याचा सूर असायचा.

ह्यानंतरचा कलाकार म्हणजे गोलंदाजीच्या शिखरावर बसलेला गडी ! बॉलइतकेच मोठे डोळे करून.. तोंडाचा आ वासून बोलिंग करणारा मुरली हा प्रथमदर्शनी कोलंबोच्या समुद्रकिनार्‍यावर शहाळी विकत असेल असंच वाटतं. किंचित सुटलेलं पोट... दाढी वाढवलेली आणि डोळ्यांत सतत एक मिश्किल भाव. पण हातात चेंडू आला की हा माणूस जादूचे प्रयोग सुरू करतो. त्यात श्रीलंकेत खेळत असाल तर विचारूच नका. इंग्लंड, विंडीजचे फलंदाज तर त्याला खेळताना 'एकदा करून टाक बाबा आऊट... असा त्रास नको देऊस' अश्या भावनेनी खेळत असतात. अ‍ॅक्शनमध्ये विशेष बदल न करता चेंडू उलट्या दिशेला ऑफब्रेक इतकाच वळवणे हे जादूगारालाच शक्य असतं.

आपल्या हाताच्या वेगळेपणाचा (त्याची knuckles त्याच्या हाताच्या मागच्या बाजूला लागतात) पुरेपूर फायदा घेऊन हा बॅट्समनला भंडावून सोडतो. सकलेन मुश्ताकने "दूसरा" शोधला आणि मुरलीनी त्याला एक नवा आयाम दिला. श्रीलंकेत तर आपल्या संघाच्या एकूण षटकांच्या एक तृतीयांश षटकं मुरली टाकतो. ऑफब्रेक, स्ट्रेटर वन, दूसरा ह्यांचं बेमालूम मिश्रण करून मुरली फलंदाजाला नेहेमी बुचकळ्यात टाकतो. प्रत्येक कसोटीमागे जवळपास ६ विकेट्सच्या सरासरीने मुरलीने जवळपास ८०० विकेट्स घेतल्या आहेत. विडियो कॅमेरा आणि 'स्पिन व्हिजन' च्या जमान्यात देखील मुरलीला कोणी 'सॉर्ट आऊट' करू शकलेलं नाही ह्यातच सगळं आलं.

पुढच्या (शेवटच्या) लेखात अजून काही अफलातून खेळाडूंबद्दल....

(सर्व छायाचित्रे जालावरून साभार)

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २

नुकतीच सच्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्ष पूर्ण झाली. नाय हो.. त्याचं कौतुक...त्याची आकडेवारी, महानता, नम्रपणा वगैरे गोष्टींबद्दल आपण बोलणारच नाहिये ! इथे आपल्याला काम आहे त्याच्या फटक्यांशी ! मैदानाबाहेरचा सचिन, फील्डिंग करतानाचा तेंडल्या आणि बॅटिंग करताना पूर्ण भरात असलेला सच्या ही तिन्ही मोठी अजब रूपं आहेत हो. पहिली दोन विलोभनीय आणि बॅटिंग करताना बोलरसाठी "विलो" भयनीय ! 'टॉप गियर' मधला तेंडल्या हा एकत्र तोफा डागणार्‍या ७३ रणगाड्यांपेक्षा संहारक असतो. कट्स, पुल, ड्राईव्ह, लेटकट्स, ग्लान्स, फ्लिक... प्रत्येक चेंडूसाठी किमान २ फटके भात्यात असणं हे परग्रहावरून आल्याचं लक्षण आहे. सच्याची अजून एक खूबी म्हणजे "इंप्रोव्हायझेशन".... पॅडल स्वीप मारायला गेला.. बॉल थोडा ऑफस्टंपच्या बाहेर पडला.. तर रिव्हर्सच काय करेल... पुल करायला गेला आणि वाटलं की बॉल तितका शॉर्ट नाहीये तर कमरेपासूनच फ्लिक काय करेल.. सगळंच अनाकलनीय !

आता हाच फटका बघा ना.... ह्याचे सगळे कॉपीराईट्स साहेबांकडे आहेत. अर्थात नसते तरी फरक पडला नसता म्हणा - कारण ह्या ग्रहावर असा शॉट अजून कोणी मारूच शकत नाही.

बॉल पायांत असूदे वा शॉर्ट... मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो... अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या "रेंज"मध्ये मन मानेल तिथे मारला जातो. बरं फटक्याचं टायमिंगही असं की शेवटपर्यंत बॉलमागे धावणार्‍या फील्डरला आशा वाटत राहावी. पण शर्यतीत जिंकतो शेवटी चेंडूच.

आमच्या अझ्झूभाईंचा फ्लिक पण असाच. लेझीम खेळतांना जसा हाताला हलका झटका देतात तसा भाईजान झटका द्यायचे आणि नजरेचं पारणं फिटायच ! कलकत्त्यात क्लूसनरची शिकवणी घेतलेली आठवतीये? फिक्सिंगचं शेण खाल्लं नसते तर अझ्झूभाई आमच्या गळ्यातले ताईत होते ! (फोटो जालावर मिळाला नाही). असो !

सच्याचीच क्रिकेटला अजून एक देणगी म्हणजे "अपर कट". स्लिप्स आणि डीप थर्डमॅन असताना गोलंदाजाचाच वेग वापरून चक्क षटकार मारायचा हा कट फक्त सच्याच शिजवू जाणे ! अहो समोरून येणारा चेंडू रेषेत येऊन टाईम करण ही सुद्धा तुमच्या क्रिकेटच्या कर्तबगारीची कसोटी असते. तिथे हे साहेब शरीरापासून लांब जाणारा चेंडू केवळ खत्तरनाक टायमिंग साधत प्रेक्षकांत पाठवतात !

अपर कट काय किंवा पॅडल स्वीप काय.. खेळावा तो आमच्या साहेबांनीच. गोलंदाजाच्या आग ओकणार्‍या वेगावर साहेब अपर कटने असं काही पाणी ओततात की ज्याचं नाव ते !

आता पुढच्या कलाकाराचा फटका बघण्याआधी एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती तशी नाजूक आहे. ६ बाद १३७. .आणि जिंकण्यासाठी ५७ चेंडूंत ७९ धावा हव्या आहेत. एक ऑफस्पिनर चांगला मारा करतो आहे. तेव्हा काय होतं? अचानक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्याला मिडविकेट क्षेत्रात पाठोपाठ ३ चौकार मारतो... धावगती आटोक्यात येते आणि ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून सामना जिंकते ! ९० च्या दशकातली ही कथा. बर्‍याच वेळा घडलेली. पण प्रत्येकवेळी ते चौकार मारणारा एकच - स्टीव्हन रॉजर वॉ !

फिरकी गोलंदाज.. त्यातही ऑफस्पिनर जर डोईजड होऊ लागला तर थोरले वॉ हा फटका हमखास मारायचे. अगदी तणावाच्या परिस्थितीत, थंड डोक्याने जागा हेरून "काऊ कॉर्नर" ला क्षेत्ररक्षकांमधल्या गॅप मधून असा चौकार / षटकार मारणे... थोरल्यांच्या डोक्यातच एक रेफ्रिजरेटर होता ! Shrewd हा शब्द कदाचित ह्याच्याचसाठी बनवला गेला असावा ! We play to win matches, not to win friends ही मानसिकता नसानसांत भिनलेला... आर्मीमध्यी जायचा तो चुकून क्रिकेट खे़ळायला आला की काय असं वाटायला लावणारा - पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेली "बॅगी ग्रीन" शेवटपर्यंत अभिमानाने वापरणारा, खिशात लाल रुमाल ठेवणारा, कधीही हार न मानणारा, पराकोटीच्या प्रेशरमध्येदेखील थंडपणे विचार करणारा चिवट आणि झुंजार संघाचा चिवट आणि झुंजार कर्णधार - स्टीव वॉ !

आणि मग हे त्यांचे बंधू... खरंतर जुळे... पण काही मिनिटं उशीर झाल्यामुळे 'ज्युनियर' ! ह्यांची वेगळीच तर्‍हा... म्हणजे जणू काही कॉलेजमध्ये ऑर्केस्ट्राच्या निवडीसाठी गेले.. आणि कोणीतरी व्हायोलिनच्या बो ऐवजी हातात बॅट देऊन बॅटिंगला पाठवला.... हा मनुष्य बॅटदेखील "बो" सारखीच वापरायचा. आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना "शॉट" म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! "अहिंसा परमो धर्मः" म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा... थोपटायचा.. क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस.. फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार... प्रत्येक फटका एक पेंटिंग असायचं - आणि खाली त्या कलाकाराची सही - मार्क एड्वर्ड वॉ !

पण मला जास्त भावतं ते ह्या धाकट्याचं झेल घेणं !

पहिल्या / दुसर्‍या स्लिपमध्ये गडी असा उभा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय ! पण चेंडू त्याच्या रडारवर दिसला रे दिसला की ह्या निवांत "पोलर बेअर" चं रूपांतर चपळ चित्त्यात व्हायचं ! He is undoubtedly the greatest natural catcher that I've ever seen - or that I've ever had the displeasure to be caught out by - असं गूच त्याच्याबद्दल म्हणाला ते उगाच नाही. अर्थात त्याच्या फलंदाजीतला नाजूकपणा त्याच्या झेल घेण्यातदेखील होता. अतिशय हलक्या हातांनी हा चेडू असा झेलायचा जसा प्रेयसीनी टाकलेलं गुलाबाचं फूल !

ह्यानंतर मार्क वॉचाच कुंभमेळ्यात बिछडलेला भाऊ ! त्यामुळे ह्याला ऑस्ट्रेलियाबद्दल विशेष जिव्हाळा.... २४ सामन्यांत ६ शतकं आणि १० अर्धशतकांच्या सहाय्यानी त्यानी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२०४ धावा केल्या आहेत. कलकत्त्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत अविस्मरणीय खेळी खेळल्यावर खुनशी ऑझीजनी त्याचं बारसं केल - व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ! लेग ला ५ क्षेत्ररक्षक लावून वॉर्न लेगस्टंपच्या बाहेर मारा करत होता. आणि हा बहाद्दर त्याला बाहेर येऊन Inside out खेळत कव्हर्स मधून सीमापार धाडत होता.. आणि एकदा नाही.. अनेक वेळा ! ह्या लक्ष्मणचे ड्राईव्हस सुद्धा असेच प्रेक्षणीय. टायमिंगची दैवी देणगी असल्यामुळे त्याचे ड्राईव्हस बघणे हे नयनरम्य सुख असतं. केवळ अप्रतीम !

लक्ष्मण काय किंवा मार्क वॉ काय - दोघांच्या हातातली बॅट म्हणजे त्यांचा कुंचला होता... क्रिकेटचं मैदान हा त्यांचा कॅनव्हास आणि त्यांची प्रत्येक खेळी एक सुंदर चित्रकृती !

आता "व्हाईट लाईटनिंग" अर्थात अ‍ॅलन डोनाल्ड !

त्याच्या गोलंदाजीपेक्षा मला नेहेमीच आवडायची ती त्याची मैदानावरची देहबोली. मला तर ह्याला बघून नेहेमी बोरिस बेकरची आठवण व्हायची. सामन्याची परिस्थिती कशीही असो - डोनाल्ड नेहेमीच विजेत्याच्या आवेशात. जणू "सामन्याचा निकाल काहीही लागो, विजेता मीच आहे" असा सगळा मामला.

तांत्रिकदृष्ट्या अतिशय सोपी आणि 'करेक्ट' धाव आणि गोलंदाजीची पद्धत. झेप घेताना डाव्या खांद्यावरून फलंदाजावर रोखलेली भेदक नजर. "हाय आर्म" आणि सरळ हाताची दिशा आणि अपार कष्टाने कमावलेल्या तगड्या शरीराच्या साहाय्याने निर्माण होणारा तुफान वेग! ह्या अ‍ॅलन डोनाल्डने भल्या भल्यांची भंबेरी उडवली होती. किंग्समीड डर्बनच्या एकदिवसीय सामन्यात सचिन आणि द्रविडशी झालेलं त्याचं द्वंद्व आठवा. आधी सचिननी त्याला मिडविकेटवरून षटकार मारला आणि मग द्रविडनी हल्ला चढवला. तेव्हाच्या डोनाल्डचं वर्णन 'चवताळलेला' ह्याच एका शब्दात करता येईल.

९८ साली ट्रेंटब्रिज कसोटीत इंग्लंडला जिंकायला २४७ धावा करायच्या होत्या. १ बाद ५० वगैरे परिस्थितीत नासिर हुसेन आणि माईक आथरटन निवांतपणे लक्ष्याचा पाठलाग करत होते. जिंकण्यासाठी इरेला पेटलेला डोनाल्ड गोलंदाजीसाठी आला आणि सुरू झालं कसोटी क्रिकेटमधील एक अभूतपूर्व द्वंद्व. चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणारा डोनाल्ड आणि त्याला तितक्याच धैर्याने तोंड देणारा आथरटन ! आथरटनच्या बॅटची कड घेऊन गेलेला कॅच बाऊचरनी सोडला तेव्हा डोनाल्ड अक्षरश: धुमसत होता. नंतर बॅटच्या कडेवर उठलेल्या बॉलच्या शिक्क्याभोवती गोल करून आथरटननं तिथे डोनाल्डची सही घेतेली. तेव्हा मला बॉल धूसर दिसत होता असं आथरटनच कबूल करतो. इंग्लंड सामना जिंकलं आणि नंतर ड्रेसिंग रूम मधे आथरटन आणि डोनाल्ड एकत्र बीअर पीत गप्पा मारतानाचं चित्र टीव्हीवर दिसलं ! कसोटी क्रिकेट अंगावर काटा आणतं ते अश्या खेळाडूंमुळेच !

कसोटी क्रिकटचा विषय निघाला आणि आमच्या "ग्रेट वॉल" चा उल्लेख झाला नाही असं होईल का? आपल्या पहिल्याच कसोटीत आणि ते ही लॉर्डस वर पदार्पणात शतक करण्याचा त्याची संधी केवळ ५ धावांनी हुकली. आणि तेव्हापासून बिचार्‍याल नेहेमीच पाच धावा कमीच पडत आल्या आहेत. आपल्या खूप जास्ती टेलेंटेड सहकार्‍यांमध्ये त्याच्या अतुलनीय कामगिरीच्या मानानी द्रविड नेहेमीच झाकोळला गेलाय. एकदिवसीय सामन्यांत ३०० पेक्षा जास्ती धावा झालेल्या दोन्हीही भागीदार्‍यांमध्ये द्रविडचा मोठा वाटा आहे. परदेशात - विशेषतः कसोटीमध्ये द्रविड म्हणजे संघाची लंगोटी असतो. तो गेला की अब्रू गेली ! परदेशातल्या भारताच्या कसोटी विजयांत त्याचा नेहेमीच सिंहाचा वाटा असतो. शिवाय स्लिपमधल्या झेलांचा बोनस आहेच. तरीही हा सर्वार्थानी भारतीय क्रिकेटचा "अनसंग हीरो" आहे.

आमच्या राहुल्याचा हा डिफेन्स बघा ! उसळलेला चेंडू त्याच्या वर जाऊन हलक्या हाताने आपल्याच पायाशी दाबणारा तो राहुल द्रविडच. राहुल "द वॉल" द्रविड काय उगाचच म्हणतात?? कोणत्याही प्रकारच्या पिच वर कोणत्याही गोलंदाजांपुढे, कोणत्याही परिस्थितीत - बिनचुक तंत्र, भक्कम बचाव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तासनतास अभेद्य तटबंदी उभारून खिंड लढवणारा राहुल शरद द्रविड ! भारताच्या कसोटी संघाचा "रॉक ऑफ जिब्राल्टर" !

ह्यानंतरच्या माणसानं क्रिकेट खेळण्याची पद्धतच बदलली. गदेसारखी आपली बॅट परजत आपल्या कातळात कोरलेल्या सोट्यासारख्या हातांनी तो चेंडू मारत नाही तर फोडतो ! जवळपास चाळीसाव्या वर्षीदेखील घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि चपळ रीफ्लेक्सेसमुळे सनथ जयसुर्या आज देखील क्रिकेटमध्ये दबदबा ठेऊन आहे.

जयसुर्याच्या अफलातून फ्लिक इतकाच त्याचा प्रचंड ताकदीनी मारलेला स्क्वेअर कट अतिशय प्रेक्षणीय ! डावाच्या सुरुवातीला बॉस कोण आहे ते दाखवणारा त्याचा फटका ! शॉर्ट आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडला की कचकचीत कट सगळेच चांगले फलंदाज मारतात. पण म्हणून पॉईंटवरून सिक्स?? ती केवळ जयसूर्याच मारू जाणे !

हे म्हणजे शोकेस मधले अजून काही हिरे ! क्रिकेटनं आम्हाला दिलेले... आमची आयुष्य समृद्ध केलेले... आम्हाला आनंदाचे.. जोषाचे...जल्लोषाचे आणि उद्विग्नतेचेही... पण अविस्मरणीय क्षण दिलेले. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे ते उगाच नाही. नैराश्य, भ्रष्टाचार, संताप, शोक, असहायता, फसवणूक, ढासळलेली नीतिमूल्य, गरीबीनी बरबटलेल्या आमच्या आयुष्यात आम्हाला उत्तम उदात्त आणि उन्नताचं दर्शन घडवणारा आमचा हा खेळांचा राजा.... आणि आपल्या कष्टांनी, कौशल्यानं आणि करिष्म्यानं आम्हाला हे आनंदाचे क्षण देणारे ही आमच्या खेळाचे राजे ! जोपर्यंत असे खेळाडू हा खेळ खेळत आहेत तोपर्यंत आम्हीही देहभान विसरून ह्या खेळाचा आनंद घेणार !

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य मध्ये आपण आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हचा आस्वाद गेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा म्हटल्याप्रमाणे खेळांमध्ये असे अनेक महान कलाकार होऊन गेले आणि आहेत की ज्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. आमच्यासाठी खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट ! बालपणच जिथे चेंडूची एक बाजू घासून वकारसारख्या 'रिव्हर्स स्विंग'ची आराधना करण्यात गेलं (ते आयुष्यात जमलं नाही हा भाग अलाहिदा) आणि संजय मांजरेकरचं टेक्नीक ३ नंबरला कॉपी करण्यात (ह्यात हेल्मेट मध्ये त्याच्यासारखी पट्टी घालण्याचा पण समावेश आहे) गेलं, तिथे अन्य कुठल्या खेळाच्या प्रेमात पडायला खूप वेळ लागला !

आण्णांच्या यमनसारखा आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हबद्दल बोलल्यानंतर आता अन्य काही कलाकारांच्या खासियतींबद्दल बोलुया ! अर्थात हे कलाकार मी पाहिलेलेच आहेत आणि ह्याआधी देखील जे अनेक महान कलाकार होऊन गेले त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडेल ! तर देवाचं नाव घेऊन सुरुवात करू.. स$$$$$चिन.. स$$$$$$$चिन !

तर महाराजा आमच्या क्रिकेटच्या साम्राज्याचे अनेक रथी-महारथी आहेत ! पहिला आत्ताच्या काळातल्या अजिंक्य संघाचा झुंजार कर्णधार रिकी पाँटिंग - आणि त्याचा केवळ हेवा करावा असा हुक !

पाँटिंगचा पदन्यास एखाद्या बॅले नर्तकीसारखा (आणि हरभजनला खेळताना कोकणच्या बाल्यासारखा !). वेगवान गोलंदाजानी चेंडू शॉर्ट आपटला की गडी पुल / हुक मारायला सरसावलाच ! किंचित खाली वाकून हा माणूस झकासपैकी आपला उजवा पाय तोडा मागे अन अ‍ॅक्रॉस करून रोवतो. आणि गोलंदाजाच्याच वेगाचा पुरेपूर उपयोग करत चेंडू मिडविकेट / स्क्वेअरलेगला भिरकावून देतो ! बॅलन्स असा की आइस स्केटिंग करणार्‍या पोरींनी धडा घ्यावा !

नंतरचा आमचा "नजाफगढचा नवाब". ह्याच्या खेळाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे "आम्हा काय त्याचे". नाजुकपणा, संयम, शांतता वगैरे गोष्टी ह्याच्या वाटेला फारश्या जात नाहीत ! मागच्या बाकावर बसणार्‍या, एका इयत्तेत ३ वर्ष मुकाम केलेल्या विद्यार्थ्याच्या चेहेर्‍यावर मास्तर "छांदोग्योपनिषद" शिकवत असताना जे भाव असतील, साधार॑ण ते भाव चेहेर्‍यावर. चेंडू हा सीमेबाहेर पाठवण्यासाठीच टाकण्यात येतो अशी त्याची प्रगाढ श्रद्धा ! त्याच्या स्क्वेअरकटचं खूप कौतुक होतं. पण मला विचाराल तर त्याची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे "षटकार" ! मग तो कुठल्याही फटक्यानी आणि कुठेही मारलेला का असेना. "नो हाफ मेझर्स" !

वरच्या फोटोत आणि पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्यात मला खूप साम्य वाटतं ! आवेष तर बघा ! चेंडूची काय बिशाद सीमेच्या आत पडायची !

अहो नंतरचा आमचा कलाकार तर वेगवान गोलंदाजांचा शिरोमणी. हा धावत आला की फलंदाजांच्या उरात धडकी भरायची ! "खेलमें एकही गुंडा होता है और इस मॅच का गुंडा मैं हूं" हाच अ‍ॅटिट्यूड ! त्याच्या "इनकटर" फलंदाजाला भोसकायचा. इम्रान, अक्रमच्या तालमीतला हा खंदा वीर. वकारचा यॉर्कर हा त्याच्या देशाच्या "होम मेड" शस्त्रांइतकाच घातक ! रिव्हर्स होताना ह्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सुरुवात करून लेगस्टंपच्या बुंध्यावर आदळायचा. "सुलतान ऑफ स्विंग" ही उपाधी ह्याच्याइतकी कोणालाच लागू झाली नाही (माझ्या पाहाण्यात).

आता हेच बघा ना.. अश्या यॉर्करवर यष्ट्या उधळल्या गेल्यावर फलंदाजाला "धरणीमाते मला पोटात घे" वाटणार नाही तर काय?

सुलतान ऑफ स्विंग नंतर अर्थातच "शेख ऑफ ट्वीक". सर्वकाळचा वादातीत सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर - शेन वॉर्न. किती वेळा असं घडलं असेल की लेगस्पिन म्हणून फलंदाज त्याला कट करायला गेला आणि वेषांतर केलेल्या हारून अल रशीदइतक्या बेमालूमपणे तो चेंडू बाहेर जाण्याऐवजी सरळच घुसला ! जादूगाराने अचानक टोपीतून ससा काढावा तसा वॉर्नचा फ्लिपर अचानक आणि अनपेक्षित यायचा आणि अजून एक वि़केट घेऊन जायचा !

बघा बरं - लांडग्यांसारखे शिकार टिपायला वखवखलेले "क्लोझ इन" क्षेत्ररक्षक... फलंदाजाच्या दिशेनी पाठमोरा धावत अपील करणारा वॉर्न आणि "आयला गंडलो परत" असा भाव असलेला आणि अंपायरच्या केवळ इशार्‍याची वाट पहाणारा फलंदाज.. हे दृश्य आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे !

आणि ह्या लेखातला शेवटचा कलाकार म्हणजे आमचा "दादा". राहुल द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होता "When playing on the off-side first there is God and then there is Sourav Ganguly".... आणि त्यावर इयान चॅपल म्हणाला... "And God was a right-hander". आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा... काहीतरी जादू घडायची आणि ७-७ क्षेत्ररक्षकांमधून तो चेंडू सुसाट वेगाने सीमेबाहेर जायचा !

बघा - असा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात बघायला मिळणार नाही. "कुठे तंगडं हालवायचं... त्यापेक्षा उभ्याउभ्याच खेळू". काय बॅलन्स आणि 'हेड ओव्हर द बॉल' घेऊन बसलात राव ... जा रे कोणीतरी त्या बाउंड्रीपलिकडचा बॉल घेऊन या !

आमच्या मनाच्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस. अजून कितीतरी आहेत... त्यांच्याबद्दल कधीतरी !