२० ऑक्टोबर २००८

माझी (काही) प्रेमप्रकरणं !

का???? चमकलात का????? अश्या मथळ्याचे लेख काय फक्त अँजेलिना जोली, किंवा रिचर्डकाका हिल्टन ह्यांची कन्यका (हिचा 'पॅरीसस्पर्श' झालेले किती असतील कोण जाणे), लिंडसे लोहान, ब्रिटनी स्पीअर्स (माहितीसाठी आभारः टाईम्स ऑफ इंडिया चा "पुणे टाईम्स" वा "पुणे मिरर"), किंवा आपल्याकडचे मातब्बर म्हणजे ऐश्वर्या (ओबे)राय-खान-बच्चन (मध्ये एखादं नाव राहिलं नाही ना? ), टकल्या फिरोज खान, अगदीच ताज्या दमाचे म्हणजे इम्रान हाश्मी वा "मी नाही त्यातली" फेम तनुश्री दत्ता अश्यांनीच लिहावे काय? आता आमच्या प्रेमप्रकरणांची जाहीर चर्चा होत नसली म्हणून काय झालं. उलट कुसुमाग्रजांची 'प्रेम कोणावरही करावं' ही सूचना आमच्याइतकी कोणीच मनावर घेतली नसेल. आता प्रेम'प्रकरण' म्हटल्यावर त्याला जरा वेगळा वास येतो हे खरंय. पण आमच्या प्रेमप्रकरणांना वास असलाच तर तर तो आठवणींच्या मोगऱ्याचा आहे.
माझी पहिली आठवण आहे ती इयत्ता सहावीतली. (लगेच डोळे विस्फारू नका.... नीट आठवा... तुमचं पहिलं प्रकरण पण साधारण त्याच वयात झालं होतं). जून चा पहिला आठवडा... आणि "ती" वर्गात आली. तेव्हा पहिल्यांदा त्या गुदगुल्या झाल्या. पुढची पाच वर्षं (सहावी ते दहावी... बोटावर मोजून बघा हवं तर... शाळेत आपली कधी दांडी उडाली नाही) तिच्या (चष्म्याआडच्या) घाऱ्या डोळ्यांकडे.... पुढे आलेली बट मागे घेण्याच्या तिच्या विभ्रमाकडे (हा त शब्द देखील तेव्हा माहिती नव्हता!) चोरून बघण्यात गेली. नशीबानी (तिच्या आणि माझ्या).... हे पोटातलं ओठांवर कधी आलं नाही. आमचा पहिला "क्रश" इथेच चक्काचूर झाला!
आमचं पुढचं प्रकरण शाळेतलंच (पोरगं जामच फास्ट होतं की नाही? ). नंतरचं माझं प्रकरण म्हणजे "क्रिकेट". (का हो? आठ्या का पडल्या कपाळावर? तुम्हाला काय 'चमचमीत' वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती की काय? आंबटशौकीन कुठले!). संजय मांजरेकर आमचा तेव्हाचा आयडॉल (तो देखील "माझ्यासारखाच" तीन नंबरला खेळायचा). सच्याचं टेक्नीक तितकं साउंड नाहिये ("ग्रिपच चुकीची आहे !! " माझी तेव्हाची 'एक्स्पर्ट कॉमेंट'! ). ह्या खेळानी एक वेगळीच धुंदी दिली. आम्ही २ दिवसाच्या मॅचेस सुद्धा टेस्ट चालू असल्यागत खेळायचो. ते पांढरे कपडे, पॅडस, हेल्मेट, ग्लव्हज घालून दिमाखात बॅटिंगला जाणं.. सगळं औरच होतं! बॅटीच्या मधोमध चेंडू लागला अन चौकार मिळाला की "च्यामारी टोपी फटॅक" वाटायचं ! ह्या खेळानी एकाग्रता आणि चिकाटी शिकवली. पण थोड्याच दिवसांत ह्या खेळात आपल्याला भवितव्य नाही ह्याची जाणीव झाली (विजय हजारे करंडकाच्या निवडीला आम्ही मोजून ७३३ मुलं होतो ! ) आणि आमचं अजून एक प्रेमप्रकरण निकालात निघालं
मग जाधवसरांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलिबॉलची गोडी लागली. क्रिकेटव्यतिरिक्त जगात इतर खेळ आहेत ह्याची जाणीव झाली. त्यांनी आम्हाला केवळ तो खेळच शिकवला असं नाही... तर तो खेळ आनंद घेत, विजिगीषू वृत्तीने, जिंकण्यासाठी, खुन्नस देऊन, आक्रमकतेनं खेळायला शिकवलं. आणि त्याचबरोबर खिलाडूवृत्ती, पडेल ती कामं करण्यात कमीपणा न वाटणे आणि संघभावना असे पुढच्या आयुष्यात खूप खूप उपयोगी पडलेले गूणदेखील अंगी बाणवले.
मग दहावीच्या सुट्टीत पु. ल. नावाच एक प्रकरण झालं. लहानपणी "म्हैस", "अंतू बर्वा", "असा मी असामी", "बिगरी ते मॅट्रिक", "रावसाहेब" वगैरे ऐकून ऐकून पाठ झाले होते. पण तेव्हा "जावे त्यांच्या देशा", "अपूर्वाई", "पूर्वरंग", "वंगचित्रे" वगैरेंनी पुलंची नवी ओळख करून दिली. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि मधुर आहे त्याचा आस्वाद आणि आनंद घ्यायला पुलंनी शिकवलं. काही दिवसांतच माझा 'गटणे' झाला आणि त्यांची छापून आलेली ओळन ओळ वाचली गेली. १२ जून २००० ला पु ल गेल्याचं कळल्यावर कमिन्स मधल्या सी एन सी च्या मागे जाऊन अश्रूंना वाट करून दिली होती. हे प्रेमप्रकरण आयुष्यभर पुरणारं आहे. खरंतर कुठल्याही गोष्टीवर प्रेम करायला पु लं नीच शिकवलं ! प्रत्येक माणसाचे वा गोष्टीचे गुण बघून त्यावर 'फिदा' होण्याची गोडी पु लं वाचून लागली. माझ्या आवडी ह्या 'आवडी' च्या मर्यादा ओलांडून 'प्रेमाच्या' प्रदेशात भटकता ते कदाचित त्यामुळेच.
आज पाठीला डोळे फुटले की लक्षात येतं ह्याच प्रेमप्रकरणांनी माझं आयुष्य खूप खूप समृद्ध केलंय. मला आनंदाचे, विजयाचे, समाधानाचे, हुरहुरीचे, दुःखाचे अगणित अविस्मरणीय क्षण ह्या प्रेमप्रकरणांनी दिले. एखाद्या अस्सल खवय्याप्रमाणे आयुष्याची लज्जत चाखू शकतोय ते त्यामुळेच !
रामनाथच्या मिसळीपासून ते रिचर्ड बाखपर्यंतच्या आमच्या (काही) प्रेमप्रकरणांविषयी पुढच्या लेखात.

१७ जुलै २००८

आमचे जाधव सर

"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते.

"सर..... बॉल प्लीज"

"इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"?

हा प्रश्न अनपेक्षित होता. "व्हॉलिबॉल"? मी विचारलं. तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले. म्हणाले. "हे जाधव सर आहेत. तुम्हाला व्हॉलिबॉल शिकवणार आहेत. आपल्या शाळेची टीम तयार करायची आहे. बोलव तुझ्या वर्गातल्या सगळ्यांना."

आमची सदाशिव पेठेतली छोटी शाळा. प्रत्येक वर्गाची एकच तुकडी. त्यामुळे आम्ही १५-२० पोरं मिळेल ते खेळ खेळायचो. व्हॉलिबॉल खेळणं तर दूरच, कधी नीट लक्ष देऊन बघितला पण नव्हता. सकाळी ६.४५ ला शाळेत येऊन क्रिकेट खेळायचं तर व्हॉलिबॉल खेळून बघू असा विचार करून आमचा ९ वीचा वर्ग आनंदाने तयार झाला. दुसऱ्याच दिवशी झाडून सगळी पोरं बरोब्बर ६.३० ला शाळेच्या छोट्या मैदानावर हजर झाली. फरशी घातलेल्या एका भागात व्हॉलिबॉल कोर्ट आखलेलं होतं... नेट लावायला पोल होते. पण त्यांचा कधी वापर झालाच नव्हता. जाधव सर आधीच आलेले होते. आता कधी एकदा तो व्हॉलिबॉल हातात मिळतोय असं झालं होतं. सरांनी सगळ्यांना रांगेत उभं केलं अन म्हणाले "१० राउंडस इन ५ मिनिटस". "च्यायला पण व्हॉलिबॉल कुठाय"? जेमतेम १० मीटर पळाल्यावर कुंट्याची टकळी सुरू झाली. "बघू रे. देतील की"... त्याला दामटवला.

पण कसलं काय? आमचं "ट्रेनिंग" सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस तरी व्हॉलिबॉल बघायला देखील मिळाला नाही. व्यायाम, भरपूर पळणे आणि व्हॉलिबॉलचं तंत्र आत्मसात करण्यासाठी 'शॅडो प्रॅक्टिस' मात्र जोरदार चालू होती. आणि मग एक दिवस पहाटे पहाटेच सर चक्क २०-२५ बॉल घेऊन आले. प्रत्येकाच्या हातात एक कोरा करकरीत चेंडू मिळाला. पण प्रत्येकाला एका चेंडूची काय गरज? मग सरांनी चेंडू घेऊन व्यायाम करायला शिकवले. खूप दिवस 'साइड प्रॅक्टिस' चालली. आणि तब्बल एका महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा सहा सहा चे दोन संघ तयार करून समोरासमोर खेळायला उभे राहिलो. आणि मग लक्षात आलं की इतके दिवसांच्या सरावामुळे प्रत्यक्ष खेळ शिकायला आम्हाला काहीच अडचण येत नव्हती. जेमेतेम आठवड्याभरात आम्ही तंत्रशुद्धपणे खेळायला लागलो होतो. आंतरशालेय स्पर्धेत आम्ही उपांत्य फेरीपर्यंत पोचलो तेव्हा जाधव सरांनी आम्हाला 'शैलेश रसवंती गृह' मध्ये जंबो ग्लास ऊसाचा रस दिला होता.

त्या आंतरशालेय स्पर्धेनंतर मी सरांच्या क्लबला; 'जिल्हा प्रशिक्षण केंद्र' ला जायला लागलो. स. प. च्या मैदानावर रोज संध्याकाळी ४ नंतर सराव चालायचा. पण शाळेतली सरावाची पद्धत आणि इथली पद्धत ह्यांत जमीन अस्मानाचा फरक होता. एन सी सी आणि आर्मीच्या ट्रेनिंग मध्ये असेल तसा. कोर्टवर पाणी मारणे, रोलर फिरवणे आणि वॉर्म अप मध्येच पाहिला तास जायचा. खेळताना सर अनेक वेळा खेळ थांबवून बारकावे सांगायचे... चुका दाखवायचे... त्या कश्या सुधारता येतील ते सांगायचे... स्वतः करून दाखवायचे. सर स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू होतेच, शिवाय भारताच्या महिला व्हॉलिबॉल संघाचे काही काळ प्रशिक्षकही होते. सर्व्हिस करून पलीकडच्या कोर्टवर ठेवलेला बॉल उडवण्याइतकी त्यांची त्या खेळावर हुकुमत होती. पण कोर्टवर मात्र ते आमच्या बरोबरीने रोलर ओढायचे, पाणी मारायचे.

आमचे जाधव सर कडक शिस्तीचे. खेळताना प्रत्येकाने ११० टक्के प्रयत्न केला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कोर्टवर अळमटळम केलेली त्यांना अजिबात खपायची नाही. मला एकदा गेम खेळताना जांभई देताना त्यांनी पाहिलं आणि मग हाताचे पंजे पूर्णपणे जमिनीवर टेकून आणि गुडघे न वाकवता कोर्टला ३ चकरा मारायला लावल्या. नंतर ४ दिवस मला राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं..... घरामध्ये 'कमोड' नसण्याचं ! व्यायाम करतानादेखील सर जाम पिदवून घ्यायचे. खाली आडवं पडायला लावून वरून पोटावर बास्केटबॉल मारायचे. जिम मध्ये घाम गाळायला लावायचे. पण 'गेम' खेळताना मात्र धमाल असायची. स्मॅश मारला आणि गूण मिळाला की सर 'हेय' असं जोरात ओरडायला लावायचे. खेळताना पोरं थोडी ढिली पडतायत असं वाटलं की "बायको वारली काय रे तुझी? मग आवाज देऊन खेळ की".... "अरे पंकज उदास... हातांवरून बॉल मारला त्याने तुझ्या. काही लाज आहे की नाही? " ... "नॅशनल खेळला म्हणजे काय तो सासरा झाला का तुझा.... घाल की शिव्या त्याला" असं काही म्हणून खुनशीनी खेळायला लावायचे. खेळ खऱ्या अर्थाने आनंद घेऊन खेळायला त्यांनी शिकवलं.

दहावीच्या निकालानंतर क्लबची बहुतेक सगळी पोरं स. प. मध्ये गेली. फक्त मी आणि निलेश अरगडे गरवारेत होतो. सरांना म्हणालो "सर आम्ही दोघेच आहोत गरवारेत. बाकी कोणीच खेळणारं नाहीये". त्यावर सर म्हणाले "अरे उदास ! (पंकज उदास हा सरांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय होता)... दोघं आहात ना? रडताय काय? चार पोरं जमवा... १५ दिवस आहेत.... त्यांनी नुसता 'डिफेन्स' केला तरी पुष्कळ आहे. तुम्ही दोघे 'गेम' सांभाळा की. लोकं म्हटली पाहिजेत की जाधव सरांची दोन पोरं सहा जणांना भारी पडतात! " (बाय द वे... आम्ही देखील कोणी "कुठे खेळतोस" विचारलं की DCC वर असं न सांगता "जाधव सरांकडे" असंच सांगायचो. तेव्हा DCC ची पोरं ही "जाधव सरांची पोरं" म्हणूनच ओळखली जायची). आणि खरंच आम्ही दोघांनी १५ दिवसांत संघ तयार केला. ३ सामने जिंकले. उपांत्य फेरीत स. प. लाच पुरेपूर झुंजवलं. त्या दिवशी सर सगळ्यांना सांगत होते "दोघंही माझीच पोरं आहेत! " आमच्या क्लबचे सामने म्हणजे तर अविस्मरणीय प्रकार होता. पुण्यात आमचा संघ सर्वोत्कृष्ट होताच. ज्युनियर संघातून खेळताना आम्ही भल्या भल्या वरिष्ठ संघांना झुंजवायचो ("ते दोन क्षण - भाग १" मध्ये त्यांपैकी एकाचं वर्णन केलं आहे). क्वचित हरवायचो देखील. आम्ही काही पोरं जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळलो. मला आठवतंय, सांगलीला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सच्या मोरे आणि मी पुणे विभागाकडून खेळलो होतो. आम्ही अंतिम फेरी जिंकून देखील आम्हा दोघांचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती. आम्ही निराश होऊन पुण्याला परत आल्यावर सरांनी क्लबवर केक आणला होता. तेव्हा झालेलं कौतुक मी आयुष्यात विसरू शकणार नाही.

इंजिनियरिंगाला आल्यानंतर देखील कॉलेजची टीम तयार केली. दोन वर्षं खेळलो. पण टीई नंतर खेळणं मागे पडत गेलं. जाधव सर सध्या कुठे असतात कोणास ठाऊक. आज आमच्या जाधव सरांची खूप आठवण येतेय. गुरुपौर्णिमा आली की नेहमीच येते. पण आज तेच एक कारण नाही. आज ऑफिस मध्ये माझ्या कामगिरीबद्दल माझं कौतुक झालं. माझ्या 'टीम स्पिरिट' आणि 'लीडरशिप क्वॉलिटीज'चा विशेष उल्लेख करण्यात आला. आणि हे शब्द ऐकले की पहिल्यांदा जाधव सरच डोळ्यांसमोर येतात. माझ्या सुदैवाने आमच्या छोट्या शाळेत आम्हाला खूप चांगले आणि मायेने शिकवणारे शिक्षक मिळाले. पण आमच्या जाधव सरांइतकं कोणीच आम्हाला 'घडवलं' नसेल. आज लक्षात येतं की ते खरंच एक चालतं बोलतं विद्यापीठ होते. संघभावना, जिद्द, चिकाटी, शेवटापर्यंत हार न मानण्याची वृत्ती त्यांनी आमच्यात बाणवली होती. "अरे काही लाज आहे की नाही"...."घाल की शिव्या त्याला" म्हणताना त्यांनी आम्हाला आमचं काम जीव ओतून करायला शिकवलं होतं. "चार पोरं जमवा.. दोघे 'गेम' सांभाळा म्हणताना आमच्यात नेतृत्वगुण रुजवले होते. डझनावारी राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणाऱ्या आमच्या सरांचं झारी घेऊन कोर्टवर पाणी मारण आठवलं की त्यांची नम्रता आज जाणवते. आम्हाला ब्राझील, क्यूबा, हॉलंडच्या मॅचेस व्हिडिओवर दाखवण्यामागे त्यांचा सर्वोत्तम बनण्याचा ध्यास आज ध्यानात येतो. अक्षरशः रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही उंच मुला मुलीला "व्हॉलिबॉल खेळणार का"? विचारणाऱ्या आमच्या जाधव सरांची खेळाबद्दलची तळमळ आज जाणवते. एखाद्या गोष्टीसाठी 'आयुष्य वेचणं' म्हणजे काय ते आमच्या जाधव सरांकडे बघून समजतं.

सर... ह्या गुरुपौर्णिमेला नक्की तुम्हाला भेटायला येईन. तुम्हाला शोधणं अवघड नसेल. कारण तुम्ही संध्याकाळी कुठल्या न कुठल्या व्हॉलिबॉल कोर्टवरच असाल.

१८ मे २००८

तो तिसरा क्षण - आर यू ऍन इंडियन ?

(या आधीच्या 'ते दोन क्षण' ह्या लेखांमध्ये ज्या 'खास' क्षणांचा उल्लेख केला होता, त्याच माळेतला हा तिसरा क्षण)
संवाद १ -
"व्हेअर आर यू बेस्ड आऊट ऑफ"?
"आमचं मुख्य 'डेव्हलपमेंट सेंटर' भारतात आहे आणि ७ देशांत आमची कार्यालयं आहेत."
"ओह ! इंडिया... द लँड ऑफ इंटेलिजंट पीपल"
संवाद २ -
"आर यू ऍन इंडियन?"
"येस आय ऍम!"
"दॅटस ऑसम. मी आधी एका इंव्हेस्टमेंट बँकेसाठी काम करत होते. माझे काही सहकारी मुंबईत होते. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभव होता. आय मीन दे वर सो ब्रिलियंट ! मला नेहेमी जाणवायचं की त्यांची पात्रता माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे."
"थँक्स फॉर दॅट कॅरन !"
हे कपोलकल्पित संवाद नाहीत. जानेवारीत लंडन मध्ये झालेल्या एका कॉंफरन्स / एक्स्पो मध्ये आलेल्या अनेक अनुभवांपैकी दोन आहेत. मी गेली ३ वर्षं ह्या कॉंफरन्स ला माझ्या कंपनीचं प्रतिनिधित्त्व करतोय. ३ वर्षांपूर्वीचा एक संवाद अजून आठवतो.
"आर यू फ्रॉम पाकिस्तान... इंडिया ऑर समथिंग?" (कारण सगळ्या युरो - अमेरिकन कंपन्यांमध्ये दोनच भारतीय - खरं तर एशियन - कंपन्या होत्या. त्यामुळे आम्ही 'ब्राऊन' लगेच ओळखू येत होतो)
"येस"
"मग तुम्ही तुमची "स्वस्तात काम" करण्याची कंसेप्ट विकत आहात तर !"
असं त्या खडूस म्हाताऱ्यानी म्हटल्यावर माझ्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. पण आज चित्र खूप वेगळ होतं. 'लर्निंग टेक्नॉलॉजीज' मध्ये ६ भारतीय कंपन्या दिमाखात उभ्या होत्या. कंपनीचा स्टॉल लावतानाच माझ्या बॉस नि स्पष्ट सांगितलं होतं " कोणी भारतीय म्हणून काही वेडंवाकडं बोललं तर सरळ उलट उत्तर द्या. ऐकून घेऊ नका". आणि त्यानंतरचे दोन दिवस एका वेगळ्याच कैफात गेले. ब्रिटिश, अमेरिकन, फ्रेंच, जर्मन, स्वीडस, स्विस, डच, जॅपनीज, कोरियन... जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांशी बोलताना त्यांचा भारताबद्दलचा बद्दलचा बदललेला दृष्टिकोन चांगलाच जाणवत होता. टाटांची भरारी, नॅनो, (त्यावेळी होऊ घातलेली) जॅग्वार लँडरोव्हर ची डील, काँटिनेंटल होटेल्स चा उतरवलेला नक्षा, लक्ष्मी मित्तल, अंबानी बंधू, इंफी, विप्रो पासून ते सचिन, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, शाहरूख खान पर्यंत परदेशीयांना भारताबद्दल आता बरीच 'बरी' माहिती होती. म्हणजे ह्यांच्या लेखी भारत गारुड्यांच्या जमान्यातून अखेर बाहेर आला होता तर.
माझी खूप वर्षांपासून एक महत्त्वाकांक्षा आहे, एक स्वप्न आहे. मला कधी ना कधी, कुठे ना कुठे, कसंतरी करून भारताचं प्रतिनिधित्त्व करायचंय. माझ्यासाठी ही "जीव ओवाळून टाकावा" अशी गोष्ट आहे. गेली ३ वर्षं मी छोट्या प्रमाणावर का होईना, माझं स्वप्न जगतोय. ह्या वर्षी तर "नॉट एव्हरीवन कॅन अफोर्ड अस", "आफ्टर ऑल वी आर ऍन इंडियन कंपनी" असं बोलताना गर्वानी छाती फुगून जात होती. 'जॉब हंटिंग' साठी येणाऱ्या गोऱ्यांना "सेंड मी योर रेझ्यूमे" सांगताना वेगळाच आनंद होत होता. संयोजकांच्या पार्टीच्या वेळी गोऱ्यांच्या गर्दीत बुजणं तर दूरच, पणा आम्हाला आमच्या युरोपियन सहकाऱ्यांना ह्या वर्षाची योजना समजावून सांगताना बघून गोऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. भारतीय म्हणून जगात आमची मान ताठ करणाऱ्या टाटा, नारायणमूर्ती, पचौरी, देवांग मेहता, विनोद खोसला, विनोद धाम, पेस - भूपती, फोर्स इंडिया चे विजय मल्ल्या पासून शिल्पा शेट्टीपर्यंत सगळ्यांबाबत मला अभिमान वाटतो. आणि त्यात माझ्या आयआयटी - आय आय एम मध्ये शिकलेल्या बॉस चे शब्द कानावर पडतात ....... "मला भारतीय असण्याचा अभिमान आहे.... आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी फक्त भारतीय कंपनीसाठी काम करणार"...... माझा अभिमान द्विगुणित होतो.

२९ एप्रिल २००८

ससा की कासव?

नाही नाही.... मी ते गोष्ट किंवा तिच्या अनेक आवृत्त्यांपैकी एक अजिबात सांगत नाहीये. आपण ही गोष्ट लहानपणापासून हजारो वेळा वाचली, ऐकली आणि ऐकवली असेल. आणि त्या गोष्टीचं तात्पर्य समजावून सांगितलं असेल "स्लो अँड स्टेडी विन्स द रेस'. हे तात्पर्यच इतक्या वेळा आपल्या मनावर ठसवलेलं असतं की 'स्लो अँड स्टेडी' होण्याचा नादात आपण 'फास्ट अँड फ्यूरियस' होणं विसरून जातो. अर्थात ह्यात कासवाला अजिबात कमी लेखण्याचा हेतू नाही. पठ्ठ्यानी कष्टांने, श्रमाने, जिदीने आणि चिकाटीच्या बळावर सशाला 'फेअर अँड स्क्वेअर' म्हणजे निर्विवाद हरवलं होतं. पण त्या सशाचा जरा विचार करा की राव! एका चुकीबद्दल बिचारा शतकानुशतकं आपले टोमणे ऐकतोय ! खरंतर धावण्याची कला, वेग, दमसास, चपळता ह्या सर्वच बाबतीत ससा कासवापेक्षा कितीतरी सरस असतो.
सांगायची गोष्ट - जिद्द, कष्टाळूपणा, चिकाटी हे श्रेष्ठ गूण आहेत ह्यात वादच नाही. पण कौशल्य, प्रतिभा, प्रज्ञा, कसब, कला ह्या पण काही गोष्टी असतात की राव! मी तर असं म्हणेन की कष्टानी, महत्प्रयासानी मिळवलेल्या यशापेक्षा अंगभूत गुणांच्या, प्रतिभेच्या आणि कौशल्याच्या जोरावर जिंकलेल्या यशाची मजाच काही और असते. सरळच सांगायचं तर कष्टाळूपणा, चिकाटी वगैरे गुणांपेक्षा मला अंगभूत कौशल्य, प्रतिभा हे गूण श्रेष्ठ वाटतात. गोंधळलात? माझं म्हणणं स्पष्ट करायला आपण एक उदाहरण घेऊ.
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा एक खडूस (रन देण्याच्या बाबतीत) गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. 'षटकानुषटकं' एका विशेष्ट दिशा - टप्प्यावर मारा करून फलंदाजाला जेरीस आणून बाद करण्यात ह्याचा हातखंडा. झोपेतून उठवला तरी तो त्या टप्प्यावर गोलंदाजी करेल अशी त्याची ख्याती. कारकीर्दीत अत्यंत यशस्वी असा हा गोलंदाज. इतकी वर्षं झाली पण ह्या अचूकतेत काही फरक नाही (आय पी एल मध्ये बघतोच आहोत). असं वाटतं ह्याच्या गोलंदाजीला मरण नाही.
आणि दुसरा इसम म्हणजे पाकिस्तानचा वकार यूनुस. वेगवान गोलंदाजीचा दादा. 'स्विंग चा सुलतान'. थोडा बेभरवशाचा. कदाचित तो मॅकग्रा इतका यशस्वी नसेलही. पण तो गोलंदाजी करायला धावत आला की भल्या भल्या फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. पुढचा चेंडू डोकं फोडणारा बाऊन्सर असेल की चवड्याची हाडं मोडणारा यॉर्कर ही उत्सुकता असायची. छातीत तलवार खुपसावी तसा फलंदाजाला भोसकणारे त्याचे 'इनकटर्स', बॅटीशेजारून सणसणत जाऊन यष्टिरक्षकाच्या हातांवर आदळणारे ते 'आऊटस्विंगर्स' आणि स्टंप्स उखडून टाकणारे त्याचे भयानक यॉर्कर्स अजूनही क्रिकेटरसिकांच्या आठवणींत ताजे आहेत.
आता मला सांगा की तुम्हाला फलंदाजाच्या बॅटीची आतली कड घेऊन यष्टींवर आदळलेला चेंडू बघायला आवडेल की बंदूकीच्या वेगाने फलंदाजाला चकवत त्याच्या यष्ट्या उधळणारा ? मॅकग्राची गोलंदाजी जर गणित असेल तर वकारची गोलंदाजी कविता होती. आणि गणित कितीही 'उपयोगी' असलं तरी त्याला कवितेचं सौंदर्य कधीच येत नाही.
आणि हाच कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या गुणांना प्रतिभा, कौशल्य आणि कसब ह्यांपासून वेगळं करणारा घटक आहे. "सौंदर्य". मेकअप करून ऐश्वर्या राय 'आकर्षक' वाटते पण बिना मेकअपच्या मधुबालाची सर तिला कशी येणार? लोकांची 'तान क्र.१', 'तान क्र. २' करत बसवलेली गाणी वेगळी आणि लताबाईंचं 'अल्ला तेरो नाम' वेगळं. राहूल द्रविड (ह्याचं तोंड म्हणजे सतत भात खाताना खडा दातांत आल्यावर होतं तसं असतं) चा जीव खाऊन मारलेला फटका वेगळा आणि आमच्या साहेबांचा बेदरकारपणे भिरकावलेला षटकार वेगळा. "
राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे ।
म्हणोनी काय कवणे । चालोचि नये ? ।"
हे कितीही खरं असलं तरी शेवटी राजहंस तो राजहंस हे आपण मान्य करतोच ना? तुम्हांला तुमच्या वाढदिवसाला छान नियोजन करून, निमंत्रित पाहुणे रावळ्यांवरोबर पार्टी करणं आवडेल की अनपेक्षित आणि तुम्हाला कळू न देता जवळच्या मित्र-मैत्रिणींना जमवून केलेला जल्लोष? तुमची पहिली कार केवळ "जास्त लोकं बसतात" म्हणून मारुती ओम्नी घेणार की खिशाला थोडी जड असली तरी छान दिसणारी सँट्रो ? आपण सगळेच सौंदर्याचे रसिक असतो आणि कीटस नि म्हणल्याप्रमाणे "A thing of beauty is a joy forever". त्यामुळे हे सौंदर्याचे विविध आविष्कारच आपलं आयुष्य खास बनवून जातात. कष्टांनी साध्य होणारे यश, सोय, उपयोगिता, नियोजन, वगैरे निश्चितच स्पृहणीय... पण एखाद्या जिगरबाज, मस्तमौला कलाकार वा खेळाडूच्या अपयशाची सर त्याला नाही. "इटस लव्हलीनेस इंक्रीझेस, इट विल नेव्हर पास इंटू नथिंगनेस" हेच खरं.
तेव्हा पुढच्या वेळी ती ससा कासवाची गोष्ट वाचाल तेव्हा त्या सशाला त्या एका चुकीबद्दल माफ करा. कारण कासवालाही ठाऊक आहे की तो सशाला धावण्याच्या शर्यतीत परत कधीच हरवू शकणार नाही.

२७ मार्च २००८

ते दोन क्षण - भाग २

कॉलेजमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने "आऊटस्टँडिंग" विद्यार्थी होतो. आरटीओ, सुदर्शन केमिकल्स, पुणे स्टेशनची मागली बाजू आणि वैकुंठ स्मशानभूमी असा शेजार असल्यावर (आणि कुठल्याही टिपिकल अभियांत्रिकी कॉलेजचा 'रखरखाट' असताना) पोरांकडून अजून काय अपेक्षा असणार? तरीपण आमच्या कंपूमध्ये संगीताचे (म्हणजे गाणं किंवा ज्याला आपण "मुझिक" म्हणतो) जबरदस्त चाहते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून भाग घेताना अन्य कॉलेजेसचे समान शील आणि व्यसनं असलेले दोस्त मिळाले आणि आमची संगीताशी (टिप पुन्हा लागू) दोस्ती जमली. म्हणता म्हणता कॉलेजचे ते मंतरलेले दिवस संपले आणि बेकारीचे "तंतरलेले" दिवस सुरू झाली. कामंधंदा नसलेली पोरं एरवीच आपला भरपूर वेळ सत्कारणी लावू लागली. त्यातच हणम्या (ह्याला कधी कोणी अनमोल हाक मारलीच नाही) च्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघाली. आम्ही २५-३० रेहमानी किडा असलेले (ए आर रेहमान चे भक्त) एकत्र येऊन "रेहमानिया" हा केवळ रेहमानच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा घाट घालायला लागलो. अस्मादिक कार्यक्रमाचं निवेदन करणार होते.
२ महीने कसून सराव झाल्यानंतर तो दिवस उजाडला (की मावळला?). बुधवार दिनांक १८ जुलै २००३. वेळ रात्रौ ९ वा ३० मि टिळक स्मारक मंदीर प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. तब्बल २० जणं स्टेज वर. निवेदन करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्यामुळे टेन्शन नव्हतं... पोटात फुलपाखरं उडल्याचा भास होतो तेवढाच. पण प्रेक्षकांपेक्षा जास्त उत्सुकता आम्हाला होती. कारण रेहमानची गाणी अशी स्वरमंचावर पहिल्यांदाच सादर होणार होती. निवेदकाला साजेसा आगाऊपणा करत मी माईक घेऊन सगळ्यांच्या पुढे जाऊन उभा राहीलो. राहुल नि काउंट दिला... 'लेजंड ऑफ भगतसिंग' मधल्या 'देस मेरे देस मेरे' च्या कॉर्डस सुरू झाल्या. बाहेरचा कोलाहल एकदम बंद झाला.... आणि हळू हळू पडदा बाजूला होत असतानाच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला..... पद्या चा अफलातून सेट, तीन सिंथेसाइजर्स, बासरी, ३ गिटार्स, ऱ्हिदम मशीन, ड्रम्स, २ तबले, डफ, ढोल, ढोलक आणि नानाप्रकारच्या तालवाद्यांनी सज्ज ऱ्हिदम सेक्शन, ६ मुख्य गायक गायिका आणि शिवाय ४ जणांचा कोरस.... सगळ्यांनी पहिल्या नजरेत प्रेक्षकांवर जादू केली होती.
आजपर्यंत प्रेक्षकांनी भरलेलं प्रेक्षागृह, टाळ्या, 'वन्स मोअर' च्या आरोळ्या.... सगळं अनुभवलं होतं. पण आजचं हे प्रकरण काही औरच होतं. अक्षरशः १०-१५ सेकंद टाळ्यांचा तो पाऊस झेलत असताना प्रेक्षकांच्या आमच्याकडून किती अपेक्षा आहेत ते लक्षात आलं होतं. रेहमान बद्दलचं प्रेम, त्याची गाणी थेट ऐकायला मिळणार ह्याची उत्सुकता आणि आमची जय्यत तयारी बघून आमच्याकडून असलेल्या अपेक्षा... सगळं त्या टाळ्यांच्या दणदणाटातून व्यक्त होत होतं.
मी प्रेक्षकांना अभिवादन करून त्यांचं स्वागत केलं. मग 'देस मेरे' झालं आणि मी पुन्हा निवेदनासाठी पुढे आलो. बोलायला सुरुवात केली.. "आर डी बर्मन के अंतराल के बाद हिंदी फिल्म संगीत में एक ठहराव सा आ गया था. तभी १९९२ में मणिरत्नम की तमिल फिल्म 'रोजा' र्रिलीज हुई". आणि 'रोजा' ही नाव घेतल्यावर पुन्हा टाळ्या.... किती आवडतो रेहमान लोकांना.... "रोजा कहनेको तो थी एक प्रादेशिक भाषा फिल्म, मगर उसके अनोखे.. अनूठे और प्यारे संगीत ने पूरे हिंदुस्तान पर मानो एक जादू सा चला दिया".... प्रेक्षक माझ्याबरोबर १९९२ मघ्ये गेलेत... पुढच्या चेहेऱ्यांवर अतिशय आनंद की आता 'रोजा' ऐकायला मिळणार... त्याच बरोबर अल्ला रखा रेहमान नावाच्या त्यांच्या लाडक्या तरूण संगीतकाराबद्दलचं कौतुकही.... "ऐसा संगीत इसके पहले न किसीने सुना था न महसूस किया था. हिंदी फिल्म जगत को एक मीठा सपना दिख राहा था..."
..... आणि काय सांगू... जवळपास ९०० पेक्षा जास्त लोकांनी भरलेलं ते प्रेक्षागृह पाण्यानी ओतप्रोत भरलेल्या मेघासारखं भारून माझासमोर उभं होतं..... टाचणी पडली तर आवाज यावा अशी शांतता.... प्रत्येकाच्या मनात आपल्या लाडक्या संगीतकाराबद्दल अलोट प्रेम दाटून आलेलं... मी एक टाचणी मारण्याचा अवकाश की ढगफुटी होणार होती... भावनांचा पूर येणार होता.
...... "हिंदी फिल्म संगीत के आकाश में एक नया सितारा उभर राहा था जिसका नाम था..........." आणि इतकं बोलून मी एक क्षणाचाच पॉझ घेतला. आणि त्या पॉझनीच टाचणीचं काम केलं. जणू काही लोकं मी थांबायचीच वाट बघत होते. "....... जिसका नाम था अल्ला रखा रेहमान".... असं मी म्हणायच्या आधीच तब्बल ९०० मुखांतून एकच गजर झाला... "ए आर रेहमान"...... !!!!!!!!!!!
आणि पुन्हा टाळ्यांचा पाऊस सुरू झाला. खरंच एखाद्या कलाकारावर, खेळाडूवर लोकं इतकं अपार प्रेम करू शकतात ? असा प्रकार मी फक्त सचिन तेंडूलकरच्या बाबतीत अनुभवला आहे. लोकांच्या आयुष्यात एखाद्याचं इतकं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं स्थान असू शकतं? आणि इथे तर फक्त हजारभर लोकं होती... ह्यांचं गारूड तर लाखो करोडो लोकांवर आहे. आणि लोकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या ह्या जादूगाराला आजवर मी फक्त एक टॅलेंटेड संगीतकार समजत होतो. त्या एका क्षणात लता मंगेशकरांपासून ते छत्रपतींपर्यंत अनेक चेहरे डोळ्यांसमोर आले. कोट्यवधी लोकांच्या ओठांवर हसू आणणाऱ्या ह्या लोकांच्या उत्तुंग महानतेपुढे विशेषणं देखील किती थिटी पडतात. आणि इथे तर आपल्या एका लाडक्या कलाकाराचं कौतुक होताना बघतानादेखील छाती दडपून गेली होती.
'रेहमानिया' चा पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. 'ये हँसी वादियाँ' पासून ते 'हम्मा हम्मा' पर्यंतच्या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'ओ हमदम सुनियो रे' वर दंगा करणारे लोक सत्यजीत केळकर ने वाजवलेली 'बाँबे थीम' ऐकताना डोळ्यातले अश्रू पुसत होते. मी सांगत असलेल्या रेहमानच्या किश्श्यांना खळखळून दाद देत होते आणि 'मेरा रंदे बसंती चोला' सारख्या गाण्याच्या निवेदनानंतर 'वंदे मातरम' 'भारत माता की जय' च्या आरोळ्याही देत होते.
...... आणि मी मात्र त्या एका क्षणात मला घडलेल्या महान लोकांच्या महानतेच्या साक्षात्काराच्या तेजाने दिपून गेलो होतो .... अजून ही आहे.
अश्या ह्या दोन क्षणांनी मला कधी न भरून येणाऱ्या दोन गोड जखमा दिल्या आहेत. ह्या वेदनेवरचा उपाय एकच.... अजून असे क्षण अनुभवणे. अश्वत्थाम्यासारखा मी ह्या जखमा वागवत हिंडतोय...... असे क्षण पुन्हा अनुभवायला !

१९ फेब्रुवारी २००८

ते दोन क्षण - भाग १

पु. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'दोन वस्ताद' नावाचा लेख आहे. त्यातल्या टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामांच्या आयुष्यात एकेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले. अविस्मरणीय म्हणजे इतके की तो क्षणच ते दोघे खऱ्या अर्थानी 'जगले'. फार कमी जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात की ज्या वेळी आपण To be one with God; देवाशी (का देवत्त्वाशी?) एकरूप होण्याची अनुभूती घेतो. माझ्या नशीबानी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंतच असे क्षण दोनदा आले आहेत. त्यातला हा पहिला.
२३ डिसेंबर १९९७..... स.प. महाविद्यालयाच्या AKM च्या व्हॉलिबॉल कोर्टसवर रात्री ११ ला चौथी quarter finals call झाली. आमचा जिल्हा प्रशिक्षण केंद्र DCC - B विरुद्ध पुण्यातला सर्वोत्तम आणि सगळ्यांत अनुभवी संघ 'बँक ऑफ महाराष्ट्र'. आमची 'अ' संघ म्हणजे सीनियर खेळाडू आणि आम्ही 'ब' म्हणजे १९ वर्षांखालचे ! हाडापर्यंत पोचणारी थंडी... कितीही व्यायाम केला तरी 'वॉर्म-अप' होत नव्हता. Match पूर्वी दोन्ही संघ समोरासमोर उभे राहिलो तेव्हा लक्षात आलं की त्यांचे चार खेळाडू Senior nationals खेळलेले..... आणि दत्ता मोरे तर छत्रपती award winner! निकाल स्पष्ट होता..... 'जाधव सरांच्या पोरांना' बँकेचे खेळाडू किती मिनिटांत हरवतात हाच प्रश्न होता.... म्हणून उशीर झाला असून् सुद्धा दोन-तीनशे प्रेक्षक अजून ही सामना बघायला होते.
सुरुवातीला मी नेहेमीप्रमाणे zone 4 वरून सूरुवात केली. त्यांचे दत्ता मोरे चार नंबर ला होते. बघता बघता भाऊनी ५ पॉईंटस मिळवले. आमच्या सरांनी "टाईम आऊट" घेतला आणि मला म्हणाले तू counter attack सोडून center block ला खेळ.... भाऊना तू पकडायचं ! मी??? सव्वासहा फूट उंचीच्या छत्रपती ऍवॉर्ड विनरला मी ब्लॉक करायचं ? ठीकाय.... होऊन जाऊ द्या !!
पुन्हा मैदानात उतरलो.... आम्ही 'क्लीयर' केलेला बॉल त्यांनी भाऊंसाठी 'सेट' केला. १५ वर्षांचा अनुभव असलेले भाऊ त्या बॉल वर तुटून पडले...त्यांनी दात ओठ खाऊन जोरदार स्मॅश मारला..... इथे मी आणि सच्या मोरे दोघांनी जीवाच्या आकांतानी उडी मारली..... माझ्या दोन्ही हातांवर..त्या थंडीत.... मेणबत्ती विझेपर्यंत जोर घुमवणाऱ्या त्या हातांनी मारलेला तो सणसणीत स्मॅश एखाद्या तोफगोळ्यासारखा आदळला..... आणि......
....आणि दुसऱ्या क्षणी तो बॉल भाऊंच्या पायात पडलेला होता.... 'service change' ! भाऊ फक्त हसले. सच्या नि सर्व्हिस केली... पुन्हा सेटरनी मुद्दाम भाऊंना बॉल सेट केला...पुन्हा एक जोरदार स्मॅश... ह्यावेळी मी एकटाच ब्लॉक साठी उडी मारली.... आणि पुन्हा मी केलेला ब्लॉक त्यांच्या कोर्ट मध्ये पडला....टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून गेलं....आम्हाला आता जास्तंच चेव चढला होता. आमचा सेटर नीलेशनी मला बॉल सेट केला..... समोरच्यांना नक्की अपेक्षा असणार की मी तो जीव खाऊन मारणार. मग कशाला मारा ??? दोन ब्लॉकर्सच्या उंचावलेल्या हातांवरून अलगद बॉल 'प्लेस' केला....मागचे कोणीच ह्यासाठी तयार नव्हते... लगेच पुढचा बॉल अमित नि 'फिनिश' केला. 'जाधव सरांची पोरं' बँकेच्या कसलेल्या खेळाडूंना जेरीस आणत होती.
बँकेच्या खेळाडूंचा अनुभव शेवटी वरचढ ठरला..... पण आम्ही त्यांना पाच सेटपर्यंत जोरदार झुंज दिली. रात्री १ : ३० ला मॅच संपेपर्यंत एकही प्रेक्षक हलला नव्हता. प्रत्येक वेळी ब्लॉक करतांना... सगळी ताकद एकवटून स्मॅश मारताना... तो जल्लोष... प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकताना... एक वेगळंच feeling येत होतं. लोकांच्या टाळ्या, शिट्ट्या..."come on तोश्या" च्या आरोळ्या... प्रत्येक वेळी ब्लॉक केल्यावर किंवा चकवून स्मॅश मारल्यावर भाऊंची होणारी चिडचिड...जणू आजूबाजूला काहीच नव्हतं... मी आणि माझा खेळ ! I saw my God ! इतकी वर्षं झाली...पण सगळा प्रसंग काल घडल्यासारखा आठवतो.. अजूनही त्या आठवणींनी अंगावर रोमांच उभे राहतात. पुन्हा ती विलक्षण अनुभूती मिळवण्यासाठी मी धडपडतोय.... एखाद्या प्रसंगाची 'किक' बसावी आणि एखादं व्यसन लागल्यासारखी ती पुनः पुन्हा हवीशी वाटावी तसं झालंय. मी वाटेल ते करायला तयार आहे ते क्षण पुन्हा जगायला !!!!

०८ फेब्रुवारी २००८

मी आणि माझी मराठी

अंतर्नाद वर हा पहिला लेख लिहीताना महाराष्ट्रात "मराठी विरुद्ध अमराठी" असा एक तथाकथित संघर्ष चालू आहे. तथाकथित अश्यासाठी, की सामान्य मराठी माणूस ह्या संघर्षात किती सामील आहे ह्याबद्दल शंका आहे.
मुळात "मराठी-अमराठी वाद"... आणि तो देखील मुंबईत निर्माण व्हावा अशी खरंच परिस्थिती आहे का? आम्ही का उत्तर प्रदेश आणि बिहार मधून आलेल्यांना असे वागवू? त्यांनी आमचा रोजगार बळकावला, किंवा ते आमची समाजव्यवस्था गढूळ करताहेत असे आरोप किती बिनबुडाचे आहेत ! हा कोण्या एक व्यक्तीचा राजकीय भयगंड आहे.
हा विचार करतानाच मनात विचार येतो मराठीच्या भवितव्याबद्दल होणाऱ्या चर्चेचा. ही मात्र नक्कीच काळजी करण्यासारखी बाब आहे. एक हजार पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेली माझी भाषा इतक्य सहज विलयाला जाऊ शकते? ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, पंत, संत आणि तंत कवींपासून ते आमच्या बहिणाबाई, कुसुमाग्रज, विंदा, वसंत बापट, पु. ल, अगदी नव्या पिढीला नादवणाऱ्या संदीप खरेपर्यंत साहित्यिक आणि कवींनी ज्या भाषेत रचना केली, ती माझी मराठी काळाच्या पडद्याआड जाईल ? कोणतीही भाषा जिवंत ठेवायला आणि वाढवायला त्या भाषेतलं साहित्य आणि त्या भाषेची रुजलेली मुळं कारणीभूत असतात. आणि नेमका हाच विचार मनाला अस्वस्थ करतो.

आमची खरंच मुळं मराठीत रुजली आहेत? आणि आताच्या आईबापांची असली तरी पुढच्या पिढीचीदेखील मुळं मराठी मातीत रुजलेली असावीत ह्याची काळजी आमच्यापैकी किती जणं घेतात? एखादा बंगाली आपल्या मुलाला झोपवताना जितक्या आत्मीयतेने "भजो गोरांगो" म्हणतो, तितक्या जिव्हाळ्यानी आम्ही "गाई गोवर्धन, हिंडे गं बारा रान - तिला संगत गं छान, गोपाळांची ।" म्हणतो ? आम्ही जर आमच्या मुलांना "येरे येरे पावसा, तुला देतो पैसा" सोडून "Rain rain go away little Johnny wants to play" शिकवणार असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. आजूबाजूला बंगाली, पंजाबी, तमीळ लोक राहात असोत वा मेक्सिकन, स्पॅनिश, जर्मन... आपली भाषा, आपली संस्कृती आपणच जपायला हवी.
आमच्या पोरांना पु. ल. वाचायला द्यायचे की जे.के रॉलिंग, लता मंगेशकर ऐकवायची की मडोना हे तर आम्हीच ठरवणार ना? आमच्या घरात डेलिया आणि कॅक्टस बरोबर एक तुळशीचं रोप जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठीला काहीही होणार नाही. पण फक्त तेवढ रोप मात्र जपायला हवं.
- आशुतोष