२४ मार्च २०१०

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३

आज कचेरीत माश्या मारताना आमच्या अजून एका साहेबांची ही इनिंग बघण्यात आली आणि पुन्हा लिहिण्याची खुमखुमी आली. बरेच वर्षांपूर्वीच लक्षात आलं होतं की आपल्याला ह्या खेळाचं व्यसन लागलंय. अधूनमधून सोडायची हुक्की येते पण संध्याकाळी जसे अट्टल दारुड्याचे पाय गुत्त्याकडेच वळतात तसे आमची नजर ईएसपीनच शोधणार ! मैत्रीणीला (तेव्हाच्या) "डेट"ला म्हणून मुंबई - महाराष्ट्र मॅच दाखवायला गेऊन गेलो होतो... तो आता आमची परिस्थिती सुधारून सुधारून किती सुधारणार? असो !

ह्या लेखातला पहिला कलाकार हा खरोखरच क्रिकेटचा "प्रिन्स" ! ह्याची बॅटिंग तर त्याच्या देशाच्या कॅरिब बीयरसारखी फेसाळती आणि त्तिच्यापेक्षा कितीतरी अधिक झिंग आणणारी. ह्याचा उल्लेख खरंतर खूप आधी यायला हवा होता पण देर आये दुरुस्त आये ! ९१ च्या विश्वचषकात आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात आक्रमक शतक ठोकणारा शैलीदार फलंदाज ही माझ्यासाठी "ब्रायन चार्ल्स लारा"ची पहिली आठवण. नंतर त्याने एकदा अक्रम, वकार आणि आकिब जावेदला शारजामध्ये फोड फोड फोडला आणि हे पाणी वेगळं आहे ह्याची जाणीव झाली. कसोटीमध्ये तब्बल ९ द्विशतकं (त्यातले दोन स्कोर्स म्हणजे ३७५* आणि ४००*), विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनेक संस्मरणीय खेळी (त्यातली १५३*ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी विस्डेनच्या सर्वकाळच्या सर्वोत्कृष्ट खेळींमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे), ११,००० पेक्षा जास्त कसोटी आणि १०,०००+ एकदिवसीय धावा.... अनेक विक्रम लाराने प्रस्थापित केले.

लाराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पदन्यास आणि बॅटचा 'स्विंग'. खाली वाकून केलेला ड्राईव्ह किंवा पुल अथवा फिरकी गोलंदाजाला पुढे येऊन लाँगऑनवरून मारतानाचा त्याचा पदन्यास बघून आपण क्रिकेट बघतोय का भरतनाट्यम असा संभ्रम पडावा. एखाद्या ब्रेकडान्सरसारखा एक पाय वर घेऊन उंच बॅटलिफ्ट घेऊन मास्तरांनी अतरंगी पोराच्या कानफटात मारावी तसा लारा चेंडूच्या थोतरीत द्यायचा. लाराचा ऑन ड्राईव्ह पण असाच बेहतरीन.

ऑन ड्राईव्ह हा क्रिकेटमधला बहुधा सर्वांत अवघड फटका. आणि लारा इतका देखणा ऑनड्राईव्ह क्वचितच कोणी मारू शकत असेल. टप्प्याच्या अगदी जवळ जाऊन टिपिकल उंच बॅटलिफ्टने लारा मिडविकेट आणि मिडऑन मधली गॅप वारंवार काढू शकायचा. भारताच्या सुदैवानी लारा आपल्याविरुद्ध फारसा कधी 'चालला' नाही... पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड.. .अगदी आपल्या मुरलीला विचारा. लाराबद्दल बोलताना भल्या भल्या बोलर्सचे कान चिमटीत जातील !

ह्यानंतरचा आमचा कलाकार म्हणजे आमचा लाडका "जंबो". अनिल "ऑल टेन" कुंबळे ! ह्याला बघून मला राजा ब्रूस (?) आणि कोळ्याची गोष्ट आठवते. इतक्या वर्षांनी त्या कोळ्याची मनुष्य जन्म घ्यायची वेळ आली आणि तो अनिल कुंबळे म्हणून बंगळूरूमध्ये जन्माला आला. ह्याच्याइतका मेहेनती आणि प्रामाणिक प्रयत्न करणारा - कमिटेड खेळाडू भारतीय क्रिकेटनी पाहिला नसेल. शिरीष कणेकरांनी म्हटल्या प्रमाणे "कुंबळेचा लेगब्रेक खरंच वळला ....... (तरी) घड्याळाला शॉक नाही ! !" अशी शॉकप्रूफ घड्याळाची जाहिरात करायला खरंच हरकत नव्हती. अहो ही अ‍ॅक्शन बघून कोन ह्याला स्पिनर म्हणेल???

पण परिस्थिती कितीही वाईट असो..... पठ्ठ्या षटकानुषटकं न थकता चिवटपणे बोलिंग करायचा. एकदा तर एका डावात तब्बल ७२ ओव्हर्स टाकल्या आहेत त्यानी ! त्याचा फ्लिपर मोठमोठ्या फलंदाजांना झेपायचा नाही (फक्त अरविंदा डिसिल्व्हानं त्याचा "सोर्स कोड" चोरला असणार). भारतातच नव्हे तर परदेशातही कुंबळेला खेळणं सोपं नसायचं. पीटर रोबक नावाचा समीक्षक त्याच्याबद्दल म्हणतो - Kumble more closely resembles Glenn McGrath than Warne or Murali because he does not so much baffle batsmen as torture them with precisely-pitched deliveries. ३० पेक्षा जास्त वेळा डावात ५ वा अधिक बळी मिळवणार्‍या ४ गोलंदाजांत एक कुंबळे आहे (इतर हॅडली, वॉर्न आणि मुरली), ह्यावरूनच भारताच्या प्रत्येक कसोटी विजयात त्याचं योगदान किती मोलाचं होतं हे लक्षात येईल. खालच्या एका फोटोत कुंबळेचं वेगळेपण दिसून येतं.

कुठला खेळाडू जबड्याला फ्रॅक्चर झालेलं असताना केवळ आपल्या संघासाठी बँडेज बांधून बोलिंग करेल??? ओव्हलवरची त्याची पहिली टेस्ट सेंच्युरी आठवा. जंबो मिळालेल्या लहान मुलासारखा जंबो निखळ आनंदानी नाचला होता. कष्टाळू गोलंदाज ते शेवटी खंबीर कर्णधार हा कुंबळेचा प्रवास ही त्याचे अपार कष्ट, कमिटमेंट आणि क्रिकेटवरच्या अलोट प्रेमाची पावती आहे.

आता वर उल्लेख आलाच आहे तर "पिज" ला आपण कसे विसरू? म्हणतात ना "love him or hate him, but you can't ignore him". कबुतरासारख्या काटकुळ्या पायांमुळे त्याला "पिजन" नाव पडलं. तो रिटायर झाल्यानंतर म्हणे त्याला कोणीतरी पळवलं आणि त्याचं ऑपरेशन केलं. त्यांना त्याच्या कवटीत 3.6 ghz pentium 4 प्रोसेसर, नजरेत high calibration parabolic reflectors असलेलं radar आणि हृदयाच्या जागी 0.25 HP ची मोटर सापडली म्हणे. Newton Raphson method प्रमाणे हा फॉर्म्युला वापरून मनगटातल्या trajectory control robotic manipulator च्या साहाय्याने तो ऑफस्टंपच्या बाहेर ९.३७९३४ इंच आणि पॉपिंग क्रीझपासून ६६.३८० इंच ह्या co-ordinates वर ९९.२७ च्या accuracy नी सलग गोलंदाजी करू शकायचा ! सगळं परत जागच्या जागी बसवलं आणि गडी IPL खेळायला आला !

अचूकतेच्या बाबतीत हा कुंबळेचा थोरला भाऊ (आणि इतरांचा बाप - आजोबा - पणजोबा). प्रत्येक सीरीजच्या आधी "आम्ही ५-० जिंकणार" आणि "सचिन /लारा /आथरटन / कॅलिस हाच माझं मुख्य लक्ष्य असेल" ही दोन विधानं ठरलेली. 'नाकी नऊ आणणे' ह्या वाक्प्रचाराचा आयुष्यात उपयोग मॅक्ग्राइतका कोणीच केला नसेल. स्लेजिंग म्हणजे ह्याच्या गोलंदाजीचं अविभाज्य अंग. तो IIM सिडनी च्या "Advanced PG diploma in verbal abuse" च्या १९९३च्या बॅचचा टॉपर होता. फलंदाजाला असभ्य, प्रसंगी वैयक्तिक टोमणे मारून आणि उचकवून त्याला बाद करण्यात ह्याला काहीच गैर वाटत नसे. पण तेच जर फलंदाजाने जिभेने वा बॅटीने उत्तर दिले तर ह्याला खपत नसे. सचिन आणि लारासारखे ईन मीन दोन फलंदाज ह्याला पुरून उरले. मैदानावरच्या अनेक कुप्रसिद्ध बहुधा वाचिक द्वंद्वयुद्धांना त्याने सुरुवात केली होती. आता क्रिकेट खेळच असा की गोलंदाजाची एक चूक झाली तर फारतर एका चेंडूवर षटकार बसतो. पण तेच जर फलंदाज एकदा चुकला तर तो बादच होतो ! ह्याच गोष्टीचा मॅक्ग्राने फायदा घेतला आणि पोत्याने विकेट्स घेतल्या. पण फक्त स्लेजिंगमुळे तो इतका यशस्वी ठरला असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. एरवी असं बोलणार्‍या वागणार्‍या गोलंदाजाला सचिन / लारा / पीटरसन / स्मिथ सारख्यांनी आयुष्यातून ऊठवला असता (मायकेल कास्प्रोविक्झ आठवतो?). पण मॅक्ग्राला कोणीच ते करू शकलं नाही हाच त्याचा मोठेपणा.

ह्यानंतर साक्षात lazy elegance. पाकिस्तान ची पहिली विकेट पडली की सकाळी सकाळी मारून मुटकून शाळेत पाठवलेल्या पोरासारखा बॅट जमिनीवर घासत, दीनवाणा चेहरा करून त्यांचा धिप्पाड ढोल्या कर्णधार यायचा. हात पुढे केल्यावर मास्तरांनी छडी मारण्याच्या तीन सेकंद आधी मुलाच्या चेहेर्‍यावर जे भाव असतात ते आमच्या इंझीच्या चेहेर्‍यावर. पण हाच आळशी इंझी वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी होता. इंझी आणि हत्तीमध्ये विलक्षण साम्य होतं. निवांतपणा हाच खरा स्थायीभाव. फोर सिक्स हाणायचा तो पण "शक्यतो पळायला लागू नये" ह्या एकाच भावनेतून.

हा... पण त्याच्या appearance वर गेलात तर फसलातच म्हणून समजा. कारण बॅटिंग करताना त्याची हालचाल विलक्षण चपळ असायची. भेदक नजर आणि लाजवाब hand - eye coordination च्या जोडीला टायमिंगची नैसर्गिक साथ होती. त्याच्या दिवशी जगातल्या महत्तम गोलंदाजीची पिसं काढण्याची ताकद होती इंझीमध्ये. आणि तो तशी काढायचा देखील. एकहाती सामने जिंकून देण्याची क्षमता असलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये इंझी होता.

त्याच्या फटक्यांमध्ये विलक्षण ताकद असायची. क्षेत्ररचनेचा अचूक अंदाज घेऊन तो रिकाम्या जागांमध्ये बॉल मारत असे. आपण बाळाला नजर लागू नये म्हणून तीट लावतो ना.... तशी ह्याच्या एरवी गोंडस फलंदाजीला एक तीट होती.... "रनिंग बिट्वीन द विकेट्स". एकवेळ कामना कामतेकर बिकिनीमध्ये बरी दिसेल पण इंझीला पळताना पहाणं म्हणजे अत्याचार होता. वन डे सामन्यात गडी तब्बल ४० वेळा धावबाद झालाय (आणि समोरच्याला कितीवेळा आऊट केलं असेल ह्याला तर गणतीच नाही). मध्ये अक्रमनी त्याचा एक किस्सा संगितला होता. शेवटच्या षटकांत फलंदाजी करत असताना इंझी यॉर्करवर तोल जाऊन पडला. शेवटचं षटक असल्यामुळे अक्रम धावला. तोपर्यंत इंझीने उठायचे तर सोडाच, वर बघायचे पण कष्ट घेतले नाहीत. दोघे एकाच बाजूला आले आणि अक्रम धावबाद झाला. चिडलेल्या अक्रमला शेजारी बघितल्यावर इंझी शांतपणे त्याला म्हणाला... "अरे वसीमभाई... .आप यहाँ क्या कर रहे हो?" एकंदरच "कुठे उगाच उन्हात खेळायचं" असाच त्याच्या खेळण्याचा सूर असायचा.

ह्यानंतरचा कलाकार म्हणजे गोलंदाजीच्या शिखरावर बसलेला गडी ! बॉलइतकेच मोठे डोळे करून.. तोंडाचा आ वासून बोलिंग करणारा मुरली हा प्रथमदर्शनी कोलंबोच्या समुद्रकिनार्‍यावर शहाळी विकत असेल असंच वाटतं. किंचित सुटलेलं पोट... दाढी वाढवलेली आणि डोळ्यांत सतत एक मिश्किल भाव. पण हातात चेंडू आला की हा माणूस जादूचे प्रयोग सुरू करतो. त्यात श्रीलंकेत खेळत असाल तर विचारूच नका. इंग्लंड, विंडीजचे फलंदाज तर त्याला खेळताना 'एकदा करून टाक बाबा आऊट... असा त्रास नको देऊस' अश्या भावनेनी खेळत असतात. अ‍ॅक्शनमध्ये विशेष बदल न करता चेंडू उलट्या दिशेला ऑफब्रेक इतकाच वळवणे हे जादूगारालाच शक्य असतं.

आपल्या हाताच्या वेगळेपणाचा (त्याची knuckles त्याच्या हाताच्या मागच्या बाजूला लागतात) पुरेपूर फायदा घेऊन हा बॅट्समनला भंडावून सोडतो. सकलेन मुश्ताकने "दूसरा" शोधला आणि मुरलीनी त्याला एक नवा आयाम दिला. श्रीलंकेत तर आपल्या संघाच्या एकूण षटकांच्या एक तृतीयांश षटकं मुरली टाकतो. ऑफब्रेक, स्ट्रेटर वन, दूसरा ह्यांचं बेमालूम मिश्रण करून मुरली फलंदाजाला नेहेमी बुचकळ्यात टाकतो. प्रत्येक कसोटीमागे जवळपास ६ विकेट्सच्या सरासरीने मुरलीने जवळपास ८०० विकेट्स घेतल्या आहेत. विडियो कॅमेरा आणि 'स्पिन व्हिजन' च्या जमान्यात देखील मुरलीला कोणी 'सॉर्ट आऊट' करू शकलेलं नाही ह्यातच सगळं आलं.

पुढच्या (शेवटच्या) लेखात अजून काही अफलातून खेळाडूंबद्दल....

(सर्व छायाचित्रे जालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: