११ नोव्हेंबर २००९

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं !

अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू? कित्येकांना "बघणं" आमच्या नशीबात नव्हतं पण आजही क्रीडाक्षेत्रात असे कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही आमच्या नातवंडांना सांगू 'अरे आमचा सौरव गांगुली सात-सात फील्डर असताना कव्हर्समधून फोर मारायचा'...'अरे आमच्या अक्रम-वकार पुढे तुमचे आजचे बोलर्स बच्चे आहेत बच्चे... ' अरे तो बेकर बघशील तर ६ फूट ४ इंच उंच..... पण काय चित्त्यासारखा डाईव्ह मारायचा कोर्टवर' ! आणि आमची नातवंडं डोळे मोठ्ठे करून (मनातून हसत) आम्हाला विचारतील "आजोबा खरंच???"

तुम्हाला अश्याच काही "कलाकृतींची" आठवण (आणि अजाणत्यांसाठी ओळख) करून द्यायची आहे !

पहिला मान अर्थातच आमच्या साहेबांचा ! किती आणि काय बोलावं साहेबांबद्दल? मिसरूड फुटायच्या वयात साहेब भल्या भल्या गोलंदाजांना 'फोडत' होते. उणीपुरी २ दशकं झाली साहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर... पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनंदेखील जगातला कोणताही संघ त्यांना "सॉर्ट आऊट" करू शकला नाही. साहेबांनी काळानुरूप आणि संघाच्या गरजेनुसार स्वतःला असं काही बदललं की घडी घडी रूपं बदलणारा नेताजी पालकरच जणू. म्हणूनच घणाघाती हल्ला चढवून प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीची शकलं उडवणारे साहेबच कधी कधी आपले फटके म्यान करून बचावाचा असा अभेद्य किल्ला उभारतात !

त्यांचीच ही एक कलाकृती.

साहेबांचा 'स्टान्स'च असा की वाटावं आपण डोळे मिटून आण्णांचा खर्जातला षडज ऐकतोय. अतोनात स्थिरता.... बोलरवर रोखलेली नजर.... दोन्ही पायांचा 'बॅलन्स' असा की वादळ आलं तरी माणूस हलणार नाही - "रॉक सॉलिड"...... गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली - पण आवेश मात्र तो अजिबात नाही .... ब्रेट ली समोरून धावत येतोय... फलंदाजांचा कर्दनकाळ.... वेगाचा बादशहा... 'हा - ये' अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल.....अंपायरच्या जवळून झेप घेऊन ताशी १५० कि मी वेगाने ली चेंडू फेकतो.... "शॉर्ट ऑफ गुडलेग्थ" - ऑफस्टंपच्या किंचित बाहेर टप्पा....पुन्हा टप्प्यानंतर स्लिप्सच्या दिशेनी जाणारा ऑटस्विंगर.... त्यात पर्थच्या खेळपट्टीची ती जास्त उसळी.... अनप्लेयेबल - खेळायला केवळ अशक्य !

पण त्या निमिषार्धात साहेबांचा उजवा पाय किंचित मागे सरकतो.... डावा पाय ऑफस्टंपच्या बाहेर येतो...... गरुडासारखी धारदार नजर चेंडूच्या दिशा आणि टप्प्याचा अचूक अंदाज घेते... पूर्ण संतुलन राखत साहेब चेंडूच्या रेषेत येतात..... बॅट किंचित वर उचलली जाते..... आणि पापणी लवण्याच्या तलवारीच्या पात्यासारखी खाली येते.... डोकं बरोब्बर चेंडूच्या वर येतं.... आणि .... आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.

broken imagebroken imageFrom Pictures" alt="" alt='broken image' />

लाँगऑन आणि लाँगऑफचे क्षेत्ररक्षक एकमेकांकडे असहायपणे बघतात...... चूक ना बोलरची असते.... ना कप्तानाची... ना क्षेत्ररक्षकांची.... पण "साहेब" जेव्हा स्ट्रेटड्राईव्ह मारतात तेव्हा ती देवाची एक योजना असते आपलं अस्तित्त्व दाखवून द्यायची ! देवाचीच ही अजून एक कलाकृती... आणि ह्या कलाकृतीखाली देवाची सही असते....

broken imageFrom Pictures

"सचिन रमेश तेंडूलकर" !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: