२६ मे २००९

खुन्नस !

नाही हो... ही खुन्नस म्हणजे एकेरी वाहतुकीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पुणेकराकडे सिग्नल तोडणारा पुणेकर ज्या नजरेने बघतो ती खुन्नस नाही. किंवा हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांनी बिचाऱ्या श्रोत्यांवर काढतो तशीदेखील खुन्नस नाही. आपल्याला अभिप्रेत खुन्नस वेगळी आहे.
खुन्नस.... तुम्ही म्हणाल अचानक खुन्नस ह्या प्रकाराबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होण्याचं कारण? ते ही तसं इंटरेस्टिंग आहे. आठवड्याभरपूर्वी आय पी एल मध्ये मुंबई विरुद्ध राजस्थान सामना बघायला मी कचेरीतून अमेरीकेतील एका क्लायंटचा कॉल 'कोलून' लवकर पळून आलो. इच्छा एकच.... तेंडूलकर वि. वॉर्न हे द्वंद्व परत बघायला मिळावं! आणि ते मिळालंही ! साहेबांनी कव्हर्सच्या डोक्यावरून एक कडक 'इनसाईड आऊट' चौकार मारला.... आणि वॉर्ननं एका बेहतरीन 'फ्लिपर' नं त्याची परतफेड केली. एका षटकाचा सगळा खेळ... पण ह्या एका षटकाला पार्श्वभूमी १९९२ पासूनच्या "खुनशीची" होती. गेली १८ वर्षं चालू असलेल्या लढाईतली ही एक छोटी चकमक होती. ह्यावेळी ती वॉर्ननी जिंकली इतकंच.
आणि ही फक्त एक फलंदाज विरुद्ध एक गोलंदाज अशी खुन्नस नाही हो. ह्या खुनशीची बीजं खूप खोलवर रुजली आहेत. चेन्नई कसोटी... सचिन पहिल्या डावात झे. टेलर गो. वॉर्न - ४. साहजिकच दुसऱ्या डावात सचिन फलंदाजीला आल्यावर मार्क टेलर वॉर्नच्या हातात चेंडू सोपवतो. षटकाच्या चौथ्या चेडूवर सचिन-वॉर्न आमने सामने येतात.... २ स्लिप, गली, सिली पॉईंट, शॉर्ट कव्हर, फॉर्व्हर्ड शॉर्टलेग.... मागून टिपिकल "ऑझी" स्लेजिंग. वॉर्नचा लेगब्रेक.... लेगस्टंपच्याबाहेर गोलंदाजाच्या 'फूटमार्क्स' मध्ये...वाघानं सावजावर झडप घालावी तसा सचिन त्या चेडूवर झडप घालतो आणि त्याला मिडविकटवरून प्रेक्षकांत भिरकावून देतो. आणि मग सुरू होते खरी "खुन्नस". आणि खुन्नस तरी कशी? डोळ्यांचं पारणं फेडणारी! प्रत्येकवेळी दोघं समोरासमोर आल्यावर आपल्या हृदयाची धडधड वाढवणारी. आता सचिनचा फटका सणसणत सीमारेषेच्या बाहेर जातो का वॉर्नचा चेंडू सचिनचा बचाव भेदतो अशी सतत उत्सुकता वाढवणारी.
खुन्नस... शब्दातच काय धार आहे ना? खुन्नस म्हटलं की नजरेला भिडलेली नजर आली... तू मोठा की मी वरचढ ही अहमहिका आली.... पहिला वार कोणाचा ही उत्सुकता आली... डावपेच आले.... तळपणाऱ्या तलवारी आल्या.... द्वंद्वयुद्ध आलं ! हेडन - हरभजन - सायमंडस मध्ये जो किळसवाणा प्रकार घडला ती हमरीतुमरी... ती खुन्नस नव्हे. हा... ९६ च्या विश्वचषकाच्या सामन्यात आमिर सोहेलनी वेंकटेश प्रसादला दिली ती खुन्नस.. तिची जातकुळी अगदी वेगळी! खरंतर रोज शेपूची भाजी आणि सार-भात खाणाऱ्या आमच्या "अहिंसक" गोलंदाजाला सोहेलनी उगाच "हूल" दिली आणि पुढच्या चेंडूवर विकेट (आणि इज्जत) गमावून बसला. ती एक प्रासंगिक खुन्नस झाली. खरंतर खुनशीच्या प्रस्तुत व्याख्येत ती खुन्नस बसतच नाही. खुन्नस म्हणजे दोन व्यक्ती अथवा संघांतली ती ईर्षा.. ती स्पर्धा... जी दोन्ही बाजूंना आपलं सर्वस्व पणाला लावायला भाग पाडते. क्रीडांगणावर अश्या खुनशी ह्या त्या खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
खेळांमध्ये खुन्नस एक जबरदस्त प्रेरणा ठरते. मग ती वैयक्तिक असो वा सांघिक. सध्या पटकन डोळ्यासमोर येणारी खुन्नस म्हणजे रॉजर फेडरर - रफेल नदालची. एक रंगांची मुक्त उधळण करीत प्रत्येक सामन्यात एक क्रीडाशिल्प साकारणारा कलाकार, तर दुसरा ताकद आणि प्रचंड कष्टांनी कमावलेल्या कौशल्याची कास धरणारा कर्मकार ! जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम लढती ह्या दोघांत होतात. प्रेक्षक आणि टेनिस शौकीन आतुरतेनं ह्या लढतींची वाट बघत असतात.
बोर्ग - मॅकॅन्रो , एडबर्ग - बेकर, सॅंप्रास - अगासी... इतकंच काय पण फिशर - स्पास्की, कार्पोव - कास्पारोव, सचिन - वॉर्न, स्टीव वॉ - ऍंब्रोस, स्टेफी ग्राफ - मोनिका सेलेस, जो फ्रेझर - मोहंमद अली, शुमाकर - अलोन्सो, मार्शल - गावसकर .... कुठल्याही "खुनशी" जोड्या घ्या... सगळ्यांत दोन गुण समान आहेत. एक म्हणजे दोघांचा "वेगळेपणा" आणि दुसरा म्हणजे परस्परांविषयीचा आदर. म्हणूनच बोर्ग निवृत्त झाल्यावर मॅकॅन्रोच्या यशाची लज्जत कमी झाली, सेलेसला आपल्याच एका चाहत्याने जखमी केल्याचं स्टेफी ग्राफला दुःख झालं आणि सॅंप्रासच्या शेवटच्या सामन्याच्यावेळी अगासीच्या डोळ्यांत पाणी आलं.
काही वेळा तर ही खुन्नस वैयक्तिक न राहाता त्या संघाची अथवा देशाचीच होऊन जाते. मग एखादा जावेद मियाँदाद शेवटच्या चेंडूवर अविश्वसनीय षटकार मारतो किंवा एखादा जुगराज सिंग सोहेल अब्बास सारख्या कसलेल्या "ड्रॅग फ्लिकर" चा सणसणीत फटका सरळ आपल्या छातीवर झेलतो. क्रीडांगणावर तर भारत पाकिस्तानची खुन्नस नेहेमीच एक वेगळा रंग दाखवत असते. इंग्लंड - ऑस्ट्रेलिया, भारत - ऑस्ट्रेलिया, फुटबॉल मधली ब्राझील - आर्जेंटीना, आर्सेनल - चेल्सी, एसी रग्बीमधली इंग्लंड - स्कॉटलंड, बोट रेसिंग मधली ऑक्स्फर्ड - केंब्रिज .... नावं तरी किती घ्यायची? ह्या सगळ्या खुनशी एक नशा देऊन जातात! सहभागी लोकांना ११०% प्रयत्न करून सर्वोत्तम प्रदर्शन करायला भाग पाडतात. आपल्या मर्यादा ओलांडून नव्या यशाला गवसणी घालायला उद्युक्त करतात !
खुन्नस... मग ती अमेरिका - चीन मधल्या ऑलिंपिक्स वर्चस्वाची असो वा आंतरशालेय स्पर्धांत वर्षानुवर्ष अंतिम फेरीत लढणाऱ्या शाळांची.... क्रीडांगणावर ती खुन्नस नेहेमीच नवनवीन विक्रम - पराक्रम घडवीत राहील ! अश्या छोट्यातल्या छोट्या देखील खुनशीचा एक भाग बनता आलं तरी स्वतःला भाग्यवान समजावं. फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!