२० ऑक्टोबर २००८

माझी (काही) प्रेमप्रकरणं !

का???? चमकलात का????? अश्या मथळ्याचे लेख काय फक्त अँजेलिना जोली, किंवा रिचर्डकाका हिल्टन ह्यांची कन्यका (हिचा 'पॅरीसस्पर्श' झालेले किती असतील कोण जाणे), लिंडसे लोहान, ब्रिटनी स्पीअर्स (माहितीसाठी आभारः टाईम्स ऑफ इंडिया चा "पुणे टाईम्स" वा "पुणे मिरर"), किंवा आपल्याकडचे मातब्बर म्हणजे ऐश्वर्या (ओबे)राय-खान-बच्चन (मध्ये एखादं नाव राहिलं नाही ना? ), टकल्या फिरोज खान, अगदीच ताज्या दमाचे म्हणजे इम्रान हाश्मी वा "मी नाही त्यातली" फेम तनुश्री दत्ता अश्यांनीच लिहावे काय? आता आमच्या प्रेमप्रकरणांची जाहीर चर्चा होत नसली म्हणून काय झालं. उलट कुसुमाग्रजांची 'प्रेम कोणावरही करावं' ही सूचना आमच्याइतकी कोणीच मनावर घेतली नसेल. आता प्रेम'प्रकरण' म्हटल्यावर त्याला जरा वेगळा वास येतो हे खरंय. पण आमच्या प्रेमप्रकरणांना वास असलाच तर तर तो आठवणींच्या मोगऱ्याचा आहे.
माझी पहिली आठवण आहे ती इयत्ता सहावीतली. (लगेच डोळे विस्फारू नका.... नीट आठवा... तुमचं पहिलं प्रकरण पण साधारण त्याच वयात झालं होतं). जून चा पहिला आठवडा... आणि "ती" वर्गात आली. तेव्हा पहिल्यांदा त्या गुदगुल्या झाल्या. पुढची पाच वर्षं (सहावी ते दहावी... बोटावर मोजून बघा हवं तर... शाळेत आपली कधी दांडी उडाली नाही) तिच्या (चष्म्याआडच्या) घाऱ्या डोळ्यांकडे.... पुढे आलेली बट मागे घेण्याच्या तिच्या विभ्रमाकडे (हा त शब्द देखील तेव्हा माहिती नव्हता!) चोरून बघण्यात गेली. नशीबानी (तिच्या आणि माझ्या).... हे पोटातलं ओठांवर कधी आलं नाही. आमचा पहिला "क्रश" इथेच चक्काचूर झाला!
आमचं पुढचं प्रकरण शाळेतलंच (पोरगं जामच फास्ट होतं की नाही? ). नंतरचं माझं प्रकरण म्हणजे "क्रिकेट". (का हो? आठ्या का पडल्या कपाळावर? तुम्हाला काय 'चमचमीत' वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती की काय? आंबटशौकीन कुठले!). संजय मांजरेकर आमचा तेव्हाचा आयडॉल (तो देखील "माझ्यासारखाच" तीन नंबरला खेळायचा). सच्याचं टेक्नीक तितकं साउंड नाहिये ("ग्रिपच चुकीची आहे !! " माझी तेव्हाची 'एक्स्पर्ट कॉमेंट'! ). ह्या खेळानी एक वेगळीच धुंदी दिली. आम्ही २ दिवसाच्या मॅचेस सुद्धा टेस्ट चालू असल्यागत खेळायचो. ते पांढरे कपडे, पॅडस, हेल्मेट, ग्लव्हज घालून दिमाखात बॅटिंगला जाणं.. सगळं औरच होतं! बॅटीच्या मधोमध चेंडू लागला अन चौकार मिळाला की "च्यामारी टोपी फटॅक" वाटायचं ! ह्या खेळानी एकाग्रता आणि चिकाटी शिकवली. पण थोड्याच दिवसांत ह्या खेळात आपल्याला भवितव्य नाही ह्याची जाणीव झाली (विजय हजारे करंडकाच्या निवडीला आम्ही मोजून ७३३ मुलं होतो ! ) आणि आमचं अजून एक प्रेमप्रकरण निकालात निघालं
मग जाधवसरांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलिबॉलची गोडी लागली. क्रिकेटव्यतिरिक्त जगात इतर खेळ आहेत ह्याची जाणीव झाली. त्यांनी आम्हाला केवळ तो खेळच शिकवला असं नाही... तर तो खेळ आनंद घेत, विजिगीषू वृत्तीने, जिंकण्यासाठी, खुन्नस देऊन, आक्रमकतेनं खेळायला शिकवलं. आणि त्याचबरोबर खिलाडूवृत्ती, पडेल ती कामं करण्यात कमीपणा न वाटणे आणि संघभावना असे पुढच्या आयुष्यात खूप खूप उपयोगी पडलेले गूणदेखील अंगी बाणवले.
मग दहावीच्या सुट्टीत पु. ल. नावाच एक प्रकरण झालं. लहानपणी "म्हैस", "अंतू बर्वा", "असा मी असामी", "बिगरी ते मॅट्रिक", "रावसाहेब" वगैरे ऐकून ऐकून पाठ झाले होते. पण तेव्हा "जावे त्यांच्या देशा", "अपूर्वाई", "पूर्वरंग", "वंगचित्रे" वगैरेंनी पुलंची नवी ओळख करून दिली. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि मधुर आहे त्याचा आस्वाद आणि आनंद घ्यायला पुलंनी शिकवलं. काही दिवसांतच माझा 'गटणे' झाला आणि त्यांची छापून आलेली ओळन ओळ वाचली गेली. १२ जून २००० ला पु ल गेल्याचं कळल्यावर कमिन्स मधल्या सी एन सी च्या मागे जाऊन अश्रूंना वाट करून दिली होती. हे प्रेमप्रकरण आयुष्यभर पुरणारं आहे. खरंतर कुठल्याही गोष्टीवर प्रेम करायला पु लं नीच शिकवलं ! प्रत्येक माणसाचे वा गोष्टीचे गुण बघून त्यावर 'फिदा' होण्याची गोडी पु लं वाचून लागली. माझ्या आवडी ह्या 'आवडी' च्या मर्यादा ओलांडून 'प्रेमाच्या' प्रदेशात भटकता ते कदाचित त्यामुळेच.
आज पाठीला डोळे फुटले की लक्षात येतं ह्याच प्रेमप्रकरणांनी माझं आयुष्य खूप खूप समृद्ध केलंय. मला आनंदाचे, विजयाचे, समाधानाचे, हुरहुरीचे, दुःखाचे अगणित अविस्मरणीय क्षण ह्या प्रेमप्रकरणांनी दिले. एखाद्या अस्सल खवय्याप्रमाणे आयुष्याची लज्जत चाखू शकतोय ते त्यामुळेच !
रामनाथच्या मिसळीपासून ते रिचर्ड बाखपर्यंतच्या आमच्या (काही) प्रेमप्रकरणांविषयी पुढच्या लेखात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: