२९ एप्रिल २००८

ससा की कासव?

नाही नाही.... मी ते गोष्ट किंवा तिच्या अनेक आवृत्त्यांपैकी एक अजिबात सांगत नाहीये. आपण ही गोष्ट लहानपणापासून हजारो वेळा वाचली, ऐकली आणि ऐकवली असेल. आणि त्या गोष्टीचं तात्पर्य समजावून सांगितलं असेल "स्लो अँड स्टेडी विन्स द रेस'. हे तात्पर्यच इतक्या वेळा आपल्या मनावर ठसवलेलं असतं की 'स्लो अँड स्टेडी' होण्याचा नादात आपण 'फास्ट अँड फ्यूरियस' होणं विसरून जातो. अर्थात ह्यात कासवाला अजिबात कमी लेखण्याचा हेतू नाही. पठ्ठ्यानी कष्टांने, श्रमाने, जिदीने आणि चिकाटीच्या बळावर सशाला 'फेअर अँड स्क्वेअर' म्हणजे निर्विवाद हरवलं होतं. पण त्या सशाचा जरा विचार करा की राव! एका चुकीबद्दल बिचारा शतकानुशतकं आपले टोमणे ऐकतोय ! खरंतर धावण्याची कला, वेग, दमसास, चपळता ह्या सर्वच बाबतीत ससा कासवापेक्षा कितीतरी सरस असतो.
सांगायची गोष्ट - जिद्द, कष्टाळूपणा, चिकाटी हे श्रेष्ठ गूण आहेत ह्यात वादच नाही. पण कौशल्य, प्रतिभा, प्रज्ञा, कसब, कला ह्या पण काही गोष्टी असतात की राव! मी तर असं म्हणेन की कष्टानी, महत्प्रयासानी मिळवलेल्या यशापेक्षा अंगभूत गुणांच्या, प्रतिभेच्या आणि कौशल्याच्या जोरावर जिंकलेल्या यशाची मजाच काही और असते. सरळच सांगायचं तर कष्टाळूपणा, चिकाटी वगैरे गुणांपेक्षा मला अंगभूत कौशल्य, प्रतिभा हे गूण श्रेष्ठ वाटतात. गोंधळलात? माझं म्हणणं स्पष्ट करायला आपण एक उदाहरण घेऊ.
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा एक खडूस (रन देण्याच्या बाबतीत) गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. 'षटकानुषटकं' एका विशेष्ट दिशा - टप्प्यावर मारा करून फलंदाजाला जेरीस आणून बाद करण्यात ह्याचा हातखंडा. झोपेतून उठवला तरी तो त्या टप्प्यावर गोलंदाजी करेल अशी त्याची ख्याती. कारकीर्दीत अत्यंत यशस्वी असा हा गोलंदाज. इतकी वर्षं झाली पण ह्या अचूकतेत काही फरक नाही (आय पी एल मध्ये बघतोच आहोत). असं वाटतं ह्याच्या गोलंदाजीला मरण नाही.
आणि दुसरा इसम म्हणजे पाकिस्तानचा वकार यूनुस. वेगवान गोलंदाजीचा दादा. 'स्विंग चा सुलतान'. थोडा बेभरवशाचा. कदाचित तो मॅकग्रा इतका यशस्वी नसेलही. पण तो गोलंदाजी करायला धावत आला की भल्या भल्या फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. पुढचा चेंडू डोकं फोडणारा बाऊन्सर असेल की चवड्याची हाडं मोडणारा यॉर्कर ही उत्सुकता असायची. छातीत तलवार खुपसावी तसा फलंदाजाला भोसकणारे त्याचे 'इनकटर्स', बॅटीशेजारून सणसणत जाऊन यष्टिरक्षकाच्या हातांवर आदळणारे ते 'आऊटस्विंगर्स' आणि स्टंप्स उखडून टाकणारे त्याचे भयानक यॉर्कर्स अजूनही क्रिकेटरसिकांच्या आठवणींत ताजे आहेत.
आता मला सांगा की तुम्हाला फलंदाजाच्या बॅटीची आतली कड घेऊन यष्टींवर आदळलेला चेंडू बघायला आवडेल की बंदूकीच्या वेगाने फलंदाजाला चकवत त्याच्या यष्ट्या उधळणारा ? मॅकग्राची गोलंदाजी जर गणित असेल तर वकारची गोलंदाजी कविता होती. आणि गणित कितीही 'उपयोगी' असलं तरी त्याला कवितेचं सौंदर्य कधीच येत नाही.
आणि हाच कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या गुणांना प्रतिभा, कौशल्य आणि कसब ह्यांपासून वेगळं करणारा घटक आहे. "सौंदर्य". मेकअप करून ऐश्वर्या राय 'आकर्षक' वाटते पण बिना मेकअपच्या मधुबालाची सर तिला कशी येणार? लोकांची 'तान क्र.१', 'तान क्र. २' करत बसवलेली गाणी वेगळी आणि लताबाईंचं 'अल्ला तेरो नाम' वेगळं. राहूल द्रविड (ह्याचं तोंड म्हणजे सतत भात खाताना खडा दातांत आल्यावर होतं तसं असतं) चा जीव खाऊन मारलेला फटका वेगळा आणि आमच्या साहेबांचा बेदरकारपणे भिरकावलेला षटकार वेगळा. "
राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे ।
म्हणोनी काय कवणे । चालोचि नये ? ।"
हे कितीही खरं असलं तरी शेवटी राजहंस तो राजहंस हे आपण मान्य करतोच ना? तुम्हांला तुमच्या वाढदिवसाला छान नियोजन करून, निमंत्रित पाहुणे रावळ्यांवरोबर पार्टी करणं आवडेल की अनपेक्षित आणि तुम्हाला कळू न देता जवळच्या मित्र-मैत्रिणींना जमवून केलेला जल्लोष? तुमची पहिली कार केवळ "जास्त लोकं बसतात" म्हणून मारुती ओम्नी घेणार की खिशाला थोडी जड असली तरी छान दिसणारी सँट्रो ? आपण सगळेच सौंदर्याचे रसिक असतो आणि कीटस नि म्हणल्याप्रमाणे "A thing of beauty is a joy forever". त्यामुळे हे सौंदर्याचे विविध आविष्कारच आपलं आयुष्य खास बनवून जातात. कष्टांनी साध्य होणारे यश, सोय, उपयोगिता, नियोजन, वगैरे निश्चितच स्पृहणीय... पण एखाद्या जिगरबाज, मस्तमौला कलाकार वा खेळाडूच्या अपयशाची सर त्याला नाही. "इटस लव्हलीनेस इंक्रीझेस, इट विल नेव्हर पास इंटू नथिंगनेस" हेच खरं.
तेव्हा पुढच्या वेळी ती ससा कासवाची गोष्ट वाचाल तेव्हा त्या सशाला त्या एका चुकीबद्दल माफ करा. कारण कासवालाही ठाऊक आहे की तो सशाला धावण्याच्या शर्यतीत परत कधीच हरवू शकणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: